मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष अधिक गडद होत शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आल्याने राज्यपालांनी उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरेंना दिले. ठाकरे सरकारचा हा शेवटचा दिवस आहे की अन्य काही घडामोडी घडतात याचे काऊंटडाऊन सुरू झाले असून राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. सायंकाळी पाच वाजता या याचीकेवर सुनावणी होणार असल्याने राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या सत्ताकारणाकडे लागले आहे.
शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. आठ दिवसांच्या राजकीय अस्थिरतेनंतर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्याबरोबर रात्री उशीरा राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना उद्या गुरुवार (दि. 30) रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. तत्पुर्वी पक्षादेश मानत नसलेले बंडखोर आमदार यांना पक्षांतर्गत कायद्यानुसार बडतर्फीची कारवाई शिवसेनेकडून होत आहे, ते प्रकरण 11 जुलैपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करत राजकीय संधी उचलून भाजपाने राज्यपालांच्या माध्यमातून शिवसेनेसह ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे पत्र काढून अडचणीत आणले. हे उघड असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या बहुमत सिद्धीच्या आदेशाला शिवसेना सुप्रीम कोर्टात आव्हान देत आहे. आज संध्याकाळी पाच वाजता यावर सुनावणी होणार आहे. 3 वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टात कागदपत्र दाखल करावयाचे आहेत.
सिलव्हर ओकवर
काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक
राष्ट्रवादीकडून सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला 30 जून गुरुवार रोजी तात्काळ विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिल्यानंतर अल्पमतात आलेली महाविकास आघाडी हरकतमध्ये आली. सिलव्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीने राज्यातील सर्व आमदारांना तत्काळ मुंबईत येण्याचे आदेा दिले.
आसाममधील पूरग्रस्तांना शिंदे गटातील आमदारांकडून मोठी मदत, एकनाथ शिंदेंची घोषणा
आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या आसाममधील गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांकडून आसाममधील पूरग्रस्तांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यपालांनी याआधीही
अनेकदा घटनेचं उल्लंघन केलंय
कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची भूमिका!
राज्यात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपानं पहिल्यांदाच या सगळ्या वादामध्ये उडी घेत थेट राज्यपालांची भेट घेत राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यापाठोपाठ राज्यपालांनी 30 जूनला विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन पाचारण केलं आहे. मात्र, राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.सध्याची स्थिती स्पष्ट आहे. 163 कलमाखाली मंत्रिमंडळ आणि मुखमंत्री यांच्या सल्ल्यानुसारच राज्यपाल काम करतील. फक्त यात त्यांना काही विशेष अधिकार असतात. मात्र ते अधिकार घटनेनं दिलेले असतात, ते व्यक्तिगत नाहीत, असं उल्हास बापट म्हणाले आहेत.
बंडखोर गुवाहाटी सोडणार, गोव्याला येणार
बंडखोरांनी घेतले कामख्या देवीचे दर्शन
देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग येत राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सरकारचं बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर बंडखोरांनीही आता गुवाहाटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सर्व बंडखोर एका बसने आसाममधील कामख्या देवीचे दर्शन घेतले. ते आज गोव्याला येणार असून या आमदारांसाठी गोव्यातील एका आलिशान हॉटेलमधील 71 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. उद्या हे आमदार मुंबई महानगरीत येण्याची शक्यता आहे.