Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टीत धस-धोंडेंसह आजबेंची; वडवणीत मुंडे-आंधळे-सोळंकेंची केजमध्ये खा. रजनीताई, बजरंगबप्पा, हारुण इनामदार तर...

आष्टीत धस-धोंडेंसह आजबेंची; वडवणीत मुंडे-आंधळे-सोळंकेंची केजमध्ये खा. रजनीताई, बजरंगबप्पा, हारुण इनामदार तर शिरूर, पाटोद्यात आष्टीच्या लोकप्रतिनिधीची प्रतिष्ठा पणाला

वडवणी वगळता अन्य चारही शहरात मतदान प्रक्रिया शांततेत, वडवणीत राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने, पोलिसांचा सौम्य लाठीमार
वडवणी/आष्टी/पाटोदा/शिरूर/केज (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत वडवणी 45 टक्के, आष्टी 41 टक्के, पाटोदा 42 टक्के, शिरूर 42 टक्के, केज 38 टक्के मतदान झाले असून मोठ्या पोलिस बंदोबस्तीत मतदान प्रक्रिया सुरू आहे. या पाचही नगरपंचायतींसाठी मातब्बरांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येते. वडवणी वगळता इतर चार ठिकाणी मतदान प्रक्रिया एक वाजेपर्यंत शांततेत सुरू होती.
   आष्टी नगरपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीने ज्या पाचशे बोगस मतदारांवर आक्षेप घेतला होता त्या नावाचे मतदान प्रशासनाने जागरुक राहून करून घेतल्याचे दिसून आले. आष्टीत भाजपा आमदार सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी राष्ट्रवादी आमदार आणि भाजपा आमदार वार्डा वार्डात फिरून मतदान केंद्रांवर भेटीगाठी देत आहेत. इकडे केजमध्ये खा.रजनीताई पाटील, राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि जनविकास आघाडीचे हारुण इनामदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाटोद्यात आणि शिरूरमध्ये आष्टीच्या लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठा पणाला लावून येथील नगरपंचायत आपल्याच ताब्यात याव्यात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे. वडवणीत शाब्दीक चकमक आणि भाजपा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनेक वेळा अनेक ठिकाणी आमने-सामने आले. काही ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागला. येथे राजाभाऊ मुंडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आ. केशवराव आंधळे यांनी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 

Most Popular

error: Content is protected !!