Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमनेकनूर-जवळा बसवर दगडफेक वाहक-चालकाने केला पाठलाग, दगड फेकणारा एसटी कर्मचारी

नेकनूर-जवळा बसवर दगडफेक वाहक-चालकाने केला पाठलाग, दगड फेकणारा एसटी कर्मचारी


नेकनूर (रिपोर्टर) कळंबवरून मांजरसुंब्याकडे जाणार्‍या बसवर आज सकाळी नेकनूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एकाने दगडफेक केली. या वेळी बस चालकासह वाहकाने बस थांबवून दगडफेक करणार्‍या व्यक्तीचा पाठलाग केला. मात्र तो उसाच्या शेतात पळून गेला. या दगडफेकीत बसचे नुकसान झाले नसले तरी दगडफेकीच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. दगड फेकणारा हा एसटी कर्मचारी असल्याचे वाहक चालकाने ओळखले. याची माहिती नेकनूर पोलिसांना देण्यात आली.

गेल्या दीड-दोन महिन्यापासून एसटी कर्मचार्‍याच्या संपामुळे बस वाहतूक पुर्णत: ठप्प आहे. अशा परिस्थितीत काही कर्मचारी हे कामावर रुजू होत असल्याने काही ठिकाणी बसची त्रोटक सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कळंब डेपोने ही सेवा सुरू केली असून आज सकाळी कळंब-मांजरसुंबा बस (क्र. एम.एच. २०-३७२३) ही गाडी कळंबवरून मांजरसुंब्यासाठी निघाली. ११ वाजण्याच्या सुमारास ती नेकनूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आली असता रस्त्यावर थांबलेल्या एकाने एसटीच्या दिशेने दगडफेक केली. तीन ते चार दगड मारल्याने चालकाने बस जागेवर थांबवून वाहकासह चालकाने दगडफेक करणार्‍या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला मात्र तो रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात निघून गेला. याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दगड मारणारा व्यक्ती हा एसटी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येते. त्याला संबंधित वाहक आणि चालकाने ओळखले आहे. केवळ सुरू झालेली एसटी बंद करण्या हेतू संपकर्‍यातील काहींकडून असे उपद्व्याप सुरू असल्याने संपकर्‍यांविरोधात आता संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!