Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईबीडच्या भ्रष्ट पुरवठा विभागाविरुद्ध आ.संदीप आक्रमक, गहाळ पाच हजार राशन कार्डांचा अपहार...

बीडच्या भ्रष्ट पुरवठा विभागाविरुद्ध आ.संदीप आक्रमक, गहाळ पाच हजार राशन कार्डांचा अपहार झाल्याचे उघड


तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी मंदे, अव्वल कारकून हंगे, नायब तहसीलदार राऊत यांच्यासह आदींची
विभागीय चौकशीसह ऍन्टी करप्शनकडून चौकशी होणार दोषींवर कठोर कारवाई करणार -भुजबळ

मुंबई (रिपोर्टर)- बीडच्या पुरवठा विभागातील ५ हजारापेक्षा जास्त गहाळ झालेल्या राशन कार्डाचा विषय आ. संदीप क्षीरसागरांनी विधानसभेत उचलून सदरचा प्रकार हा अपहाराचा असल्याने दोषींवर कारवाई होणार का? असा सवाल केल्यानंतर अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी मंदे, अव्वल कारकून हंगे, नायब तहसीलदार राऊत यांची विभागीय चौकशी करून ऍन्टी करप्शन मार्फत खुली चौकशी करणार असल्याचे सांगत दोषी आढळल्यास संबंधितांचे निलंबन करण्याचे सुतोवाच केले तर गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेले जिल्हा पुरवठा अधिकार्‍याचे पद तात्काळ भरण्याचे आश्‍वासन दिले. या प्रकरणात तत्कालीन तहसीलदारही गोत्यात येणार असल्याचे दिसून येते.
गोरगरिबांच्या तोंडचे अन्नधान्य खुशाल काळ्या बाजारात बोगस राशन कार्डाच्या आधारे विकणार्‍या भ्रष्टाचारी महसूलमधील अधिकारी, कर्मचार्‍यांसह माफियांविरोधात आ. संदीप क्षीरसागरांनी आज विधानसभेत आवाज उठवला. ५ हजार ४९८ राशन कार्ड बीडच्या पुरवठा विभागातून गायब झाले होते. ते अवैध पद्धतीने बाहेर गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही दोषींवर याबाबत कुठलीच कारवाई होत नाही अणि बीड जिल्हा पुरवठा अधिकार्‍याचे पद रिक्त असल्याची बाब तारांकित प्रश्‍नाद्वारे आ. क्षीरसागरांनी आज समोर आणली. यावर उत्तर देताना अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ५ हजार ८९८ राशन कार्ड ऑगस्ट २०२१ मध्ये गैर मार्गाने कार्यालयाबाहेर गेल्याचे कबूल करत यातील दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई आणि विभागीय चौकशी प्रस्तावीत करण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले. मात्र यावर आ. संदीप क्षीरसागर समाधानी झाले नाहीत. त्यांनी तात्काळ या प्रकरणात दोषी अधिकार्‍यांना निलंबीत केव्हा करणार, आणि पुरवठा अधिकारी पदाचं पद कधी भरणार हा प्रतिप्रश्‍न केला. त्यावर ना. भुजबळ यांनी दोषी अधिकार्‍यांची विभागीय चौकशी बरोबर ऍन्टी करप्शन विभागामार्फत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास निलंबनाची कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. त्याचबरोबर बीडचे जिल्हा पुरवठा अधिकार्‍याचे रिक्तपद तात्काळ भरणार असल्याचे सांगून अन्न रिक्त पदे भरण्यासाठी महसूल खात्याकडे आम्ही कर्मचार्‍यांची मागणी केलेली आहे. वैयक्तिक मंत्री महोदयांना भेटून हा प्रश्‍न सोडवणार असल्याचे सांगितले. आ. क्षीरसागरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बीडच्या पुरवठा विभागातील अधिकार्‍यांची झोप उडाली असून या प्रकरणात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी मंदे, अव्वल कारकून हंगे, नायब तहसीलदार राऊत यांची विभागीय सह ऍन्टी करप्शन मार्फत चौकशी होणार. यामध्ये तत्कालीन बीडचे तहसीलदारही गोत्यात येणार.

बीड-जवळा-पिंपळनेर
रस्त्यासाठी १५ कोटी मंजूर

बीड-जवळा-पिंपळनेर हा रस्ता गेल्या कित्येक दिवसांपासून खराब झाल्याने आठ ते दहा मोठ्या गावांसह ५० ते ६० छोट्या गावांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील विविध गावच्या नागरिकांनी आ. संदीप क्षीरसागरांकडे रस्त्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली होती. शेवटी आ. संदीप क्षीरसागरांनी हा रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला. बीड-जवळा-पिंपळनेर रस्त्यासाठी तब्बल १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्‍न आता सुटणार आहे. क्षीरसागरांच्या प्रयत्नामुळे सदरचा रस्ता आता चांगला होरार आहे.
बीड-जवळा-पिंपळनेर हा रस्ता आठ ते दहा मोठ्या लोकसंख्येच्या गावासह पन्नासपेक्षा जास्त अन्य गावांना बीड शहराशी जोडणारा प्रमुख रस्ता आहे. पिंपळनेर, नाथापूर, जवळा सह अन्य मोठे गावे या रस्त्यावर असल्याने वाहतुक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असते. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सदरचा रस्ता करावा यासाठी या भागातील नागरिकांनी आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेल्या काही दिवसांपासून मागणी लावून धरली होती. आ. क्षीरसागरांनीही संबंधितांना या रस्त्याबाबत वेळोवेळी सांगितले होते. मात्र रस्त्याचा प्रश्‍न सुटत नव्हता. अखेर संदीप क्षीरसागरांनी मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्‍न नेला. अखेर संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना आज यश आले आणि या रस्त्यासाठी तब्बल १५ कोटी रुपये मंजूर झाले. सदरच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर या भागातील नागरिकांना प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्या नाथापूर, पिंपळनेरसह अन्य २५ ते ३० गावे बीडसाठी घाटसावळी मार्गाचा अवलंब करत असल्याने नऊ किलोमीटर अतिरिक्त प्रवास करत आहेत. वेळेबरोबर इंधन खर्चही यामुळे वाढत आहे. हा रस्ता पुर्णत्वाकडे गेल्यानंतर या भागातील मोठ्या गावांसह ५० ते ६० छोट्या गावांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे. आ. क्षीरसागरांनी या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करून आणल्याने या भागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Most Popular

error: Content is protected !!