Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाधक्कादायक! कोरोना मृतांच्या यादीत २१६ जिवंत लोकांची नावं

धक्कादायक! कोरोना मृतांच्या यादीत २१६ जिवंत लोकांची नावं


अंबाजोगाईत जिवंत व्यक्तीलाच विचारलं तुमचा मृत्यू झालाय का? आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
आंबाजोगाई (रिपोर्टर):- कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयाची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. ही मदत देण्यासाठी शासनाकडून मृत व्यक्तींच्या नावाची खातरजमा करणे सुरू आहे. याच कामांमध्ये अंबाजोगाई शहरात चक्क २१६ जिवंत माणसांचा समावेश हा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या यादीत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.यापूर्वीच अनेक कोरोना मृतांची नाव शासनाच्या पोर्टलला नोंदवण्यात आली नसल्याचे उघड झाले होते. आता मात्र जिवंत व्यक्तीचे नाव नोंदवले गेल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे.


कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची जमवाजमव करायचे काम शासन स्तरावर सुरू आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची माहिती हे आरोग्य विभागांतर्गत असलेल्या पोर्टलवर उपलब्ध आहे. मात्र याच पोर्टलवर असलेल्या मृत व्यक्तींच्या संख्येपेक्षा जास्त नावं ही महसूल विभागाच्या हातात पडलेल्या यादीत आहेत. त्याचं झालं असं की अंबाजोगाई तहसीलदारांकडे कोरोनामुळे मृत झालेल्या ५३२ व्यक्तींच्या नावाची यादी आली आणि त्यानंतर कर्मचार्‍यांनी या नावाची खातरजमा करण्यासाठी या मृत व्यक्तींच्या घरी चौकशी केली. नागनाथ वारद यांच्याकडे कर्मचार्‍याने जाऊन तुमच्या घरातील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यांची माहिती द्या असे सांगितले. संतापजनक बाब ही होती की नागनाथ वारद यांच्याकडेच या कर्मचार्‍यानं त्यांच्याच मृत्यूची खातरजमा करण्यासाठी चौकशी केली, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. अंबाजोगाईच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या यादीमध्ये एकूण मृत व्यक्तींच्या नावाची नोंद ही ३१६ इतकी आहे. मात्र तहसीलदारांच्या हाती लागलेल्या यादीमध्ये मात्र एकूण ५३२ नावे आहेत. त्यामुळे ही वाढलेली २१६ नावे आली कुठून आणि असा प्रश्न मात्र आता समोर आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!