नागपूर (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व सरसकट कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने थेट नागपुरात उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येत असून याचे नेतृत्व छावा संघटनेचे गंगाधर काळकुटे हे करत आहेत.
नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकर्यांच्या प्रश्नांसह मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण गरमागरमीचे होत असतानाच इकडे छावा संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणासाठी नागपुरात उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून 50 टक्क्याच्या आत आरक्षण द्यावे आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ मिळावे यासाठी हे आंदोलन होत असून राज्य आणि केंद्राने हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत कायदा करावा यासाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने आजपासून उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात राष्ट्रीय छावा संघटनेचे गंगाधर काळकुटे, महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष तिरोतम्माताई शिरके, संघटक शाम गायकवाड व इतर पदाधिकार्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.