Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीड५ महिन्यात राज्यात १०७६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

५ महिन्यात राज्यात १०७६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या


जिल्हा समितीने ४११ शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र ठरवल्या तर २१३ प्रकरणं अपात्र ठरवले
मुंबई (रिपोर्टर) राज्यात गेल्या काही दिवसांतली शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी विधानसभेत सादर करण्यात आली आहे. त्यानुसार जून २०२१ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत तब्बल १०७८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती सभागृहाला दिली. विशेष म्हणजे या प्रकरणातील ४११ प्रकरणं जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

आस्मानी आणि सुल्तानी संकटामुळे डबघाईला आलेल्या शेतकर्‍यांनी नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या कारणांमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात सरकारने काय उपाययोजना केल्या असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता. यावेळी उत्तरामध्ये वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती चिंताजनक आहे. यावर्षी जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत १०७६ शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलं. जिल्हापातळीवरील समितीने यातील ४११ घटनांना पात्र ठरवलं असून इतर २१३ प्रकरणं अपात्र ठरली आहेत. तर ३७२ प्रकरणांची चौकशी अजून सुरू आहे.

बीड जिल्ह्यात वर्षभरात १९३ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले
कर्जबाजारी, नापिकी आणि शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होऊ लागल्या. मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या या बीड जिल्ह्यात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चालू वर्षात आतापर्यंत १९३ शेतकर्‍यांनी मृत्युला कवटाळले आहे.

Most Popular

error: Content is protected !!