Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमराशनचा तांदूळ काळ्या बाजारात जाताना पकडला, 23 लाखांच्या मुद्देमालासह आरोपीच्या आवळल्या मुसक्या,...

राशनचा तांदूळ काळ्या बाजारात जाताना पकडला, 23 लाखांच्या मुद्देमालासह आरोपीच्या आवळल्या मुसक्या, तांदळाचे 482 कट्टे जप्त; माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई


बीड (रिपोर्टर) माजलगाव येथील गोडाऊनमधून राशनचा तांदुळ भरून तो लातूर येथील धोंगडे उदय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कडे घेऊन जात असताना माजलगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. या वेळी साखरेच्या गोनीमध्ये भरलेल्या तांदळाचे एकूण 482 कट्टे आणि अशोक लिलॅन्ड कंपनीचा बाराचाकी ट्रक असा एकूण 23 लाख 37 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल माजलगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई रात्री दीडच्या दरम्यान परभणी टी पाईंट येथे करण्यात आली.

truck 1


माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परभणी टी पॉईंटच्या पाठिमागे शासकीय गोडाऊनमधून एक ट्रक तांदुल घेऊन लातूरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. जोनवाल, जायभाये, कागणे यांनी सदरील ठिकाणी जावून त्या ट्रकची चौकशी केली असता त्यात तांदुळ मिळून आला. याबाबत वाहन चालक शेख इस्माईल शेख मतीन (रा. पिंपळा धायगुडा ता. अंबाजोगाई) यास तांदळा संदर्भात कागदपत्राची विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठलेही कागदपत्र मिळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सदरील ट्रक माजलगाव ग्रामीण ठाण्यात आणून लावला. आज सकाळी साडेसहा वाजता जोनवाल यांनी या ट्रकबाबत तालुका पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार कुंभार यांना पत्र व्यवहार केल्यानंतर ते स्वत: पोलिस स्टेशनमध्ये आल्याने ट्रक चालक याला तांदळाबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरचा तांदुळ हा अनिस शेख, मोहसीन काझी, शोएब काझी, नूर अत्तार, बाबा शेख (सर्व रा. माजलगाव) यांचा असून तो तांदुळ त्यांनी लातूर येथील धोंडगे उदय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजला विक्री केला आहे. रात्री परभणी टि-पाईंटच्या बाजुला असलेल्या गोडाऊनवरून रेशनचा पलटी मारलेला तांदुळ ट्रकमध्ये भरला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यावरून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात 311/2021 कलम 3, 7 अत्यावश्यक वस्तू कायदा 1995 नुसार शेख इस्माईल शेख मतीन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. जोनवाल हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!