पणजी (रिपोर्टर) आघाडी सरकारमधले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेना आमदारांचे काम करत नव्हते. ज्याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडणूकांमध्ये दोन नंबरवर आहे त्याठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण केले जात होते. याची सातत्याने माहिती उध्दव ठाकरे यांना दिली जात होती. मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होत होते. असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केले नाही. ठाकरेंना दुखवावे असे आमची भूमिका नव्हती आणि आजही नाही. अशी स्पष्ट भूमिका बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मांडून यापुढे महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
बंडखोर आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्यानंतर शिंदे हे मुंबईकडे रवाना झाले तर या बंडखोर आमदारांचे प्रवक्ते असलेले दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिवसेनेतून बंड का केले? यावर अधिक भाष्य केले. उध्दव ठाकरे यांना दुखवावे अशी आमची भूमिका नव्हती. हे सांगतानाच उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केले नसल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या दिड वर्षापासून आम्ही आमची भूमिका उध्दव ठाकरे यांना सांगतोय, अनेक मतदार संघामध्ये खासदार आमदारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून अडीअडचणी आणण्यात येत आहेत. आमच्या मागणीचा वेळेवर निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आताही संजय राऊत जेवढे बोलतील ते वादाचे होईल. त्यांनी कमी बोलावे. आता मंत्रीमंडळाबाबत जे बोलले जात आहे, नावे दिली जात आहेत, कोण मंत्री होणार? हे सांगितले जात आहे. हे साफ झुट आहे, अद्याप असा निर्णय झालेला नाही. गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही निर्णय घ्यायचे आहे ते एकनाथ शिंदे यांनाच घेण्याचे अधिकार आहेत. असेही केसरकर यांनी यावेळी म्हटले.
बंडखोरांनी गटनेता म्हणून माझी निवड केली -एकनाथ शिंदे
पणजी (रिपोर्टर) आज सकाळी बंडखोर आमदारांची गोव्यातील हॉटेलमध्ये महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे हॉटेलबाहेर पडताना माध्यमाशी बोलले. ते म्हणाले की, बैठकीमध्ये उपस्थित पन्नास आमदारांनी गटनेता म्हणून माझी निवड केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांनी राजीनामा दिला, याचा आनंद आम्हाला नाही. यावर भाष्य करतानाच आपण आता मुंबईला निघालेलो आहोत, तिथे राज्यपालांची भेट घेणार आहोत, फडणवीसांची भेट घेणार आहोत, त्यानंतर आपल्याशी बोलेल, असे माध्यमांना सांगितले.