Thursday, January 20, 2022
No menu items!
HomeUncategorizedनाव स्पोर्ट क्लबचे खेळ जुगाराचा! ...

नाव स्पोर्ट क्लबचे खेळ जुगाराचा! भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केवर गुन्हा; जुगारी शिक्षक पकडले


आयपीएस कुमावंतांचा छापा, पाऊन कोटीचा मुद्देमाल जप्त; ४७ जुगार्‍यांना रंगेहाथ पकडले, जागा मालकासह
दोन किरायदारावरही गुन्हा, जुगार्‍यांमध्ये शिक्षकांसह शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा सहभाग
बीड (रिपोर्टर):- शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांच्यावर गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा भाजपाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के यांच्या विरोधात जुगार अड्‌ड्याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. स्पोर्टस क्लबच्या नावाखाली राजरोस सुरू असलेल्या जुगार अड्‌ड्यावर रात्री केजचे सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस पंकज कुमावत यांनी छापा टाकून तब्बल ४७ जणांना रंगेहाथ पकडले. यावेळी थोडाथिडका नव्हे तर तब्बल पाऊन कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जुगार खेळणार्‍यांमध्ये अनेक शिक्षक, प्राध्यापकांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकार्‍यांना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

267174079 945127226390736 7624457570182411438 n

केजचे सहाय्यक पोलीस अधिक्षक आयपीएस पंकज कुमावत यांचा अवैध धंद्याविरोधात आक्रमक पवित्रा स्वागतार्ह असल्याचे बीडच्या जनतेतून बोलले जात आहेत. गेल्या काही दिवसात पंकज कुमावत यांनी गुटखा माफियांवर छापे मारले. करोडो रूपयांचा गुटखा ताब्यात घेतला. त्याचवेळी गुटखा प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कुमावत जिल्ह्यात बहुचर्चित झाले. काल रात्री आकरा ते सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास चर्‍हाटा रोडवरील तळेगाव शिवारात स्पोटर्स क्लबच्या जागेत जुगार अड्‌ड्यावर कुमावत यांनी छापा टाकला. यावेळी ४७ जणांना तिर्रट नावाचा जुगार खेळतांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी रोख १ लाख ५१ हजार ९४० रूपयांसह २ चार चाकी गाड्या, जुगार साहित्य, दुचाकी गाड्या असा एकूण पाऊन कोटीचा म्हणजेच ७५ लाख ६२ हजार २७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून जुगार खेळतांना आढळलेले ४७ जणांसह स्पोर्ट क्लबचा मालक कल्याण पवार, जागा किरायाने घेणारा भाऊसाहेब सावंत व जागेचा मुळ मालक भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, हवालदार बालाजी दराडे, सचिन अहंकारे, बाबासाहेब बांगर, राजु वंजारे, रामहरी भंडारे, हुंबे मेजर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे आवारे व कर्मचारी, आरसीपीचे कर्मचारी यांनी केली.

ग्रामीण पोलीस
झोपली होती का?

आयपीएस पंकज कुमावत यांना जे जमतं ते स्थानिक पोलीसांना का जमत नाही हा सवाल आता विचारावाच लागेल? बीडपासून काही अंतरावर असलेल्या तळेगाव जवळ स्पोर्ट क्लबच्या नावाखाली सर्रास तिर्रट नावाचा जुगार खेळला जातो यामध्ये जुगार खेळण्यासाठी शिक्षकांसह मातब्बर थाटात येतात, याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना का नसावी? की ग्रामीण पोलीस अथवा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय अवघ्या पाच -सात कि.मी.अंतरावर असतांना त्यांनाही एवढा मोठा जुगारअड्डा सापडू नये, मुळात हमाम में स नंगे असल्यागत बीडमध्ये पोलीस यंत्रणेचे काम सुरू आहे. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीसांना दोषी धरायला हवे.

जुगार्‍यांमध्ये शिक्षकांसह संघटनेच्या
पदाधिकार्‍यांचा समावेश

तिर्रट नावाचा जुगार खेळणार्‍यांच्या रात्री पोलीसांनी मुसक्या बांधल्यानंतर यात अनेकजण वेगवेगळ्या हुद्यावर असल्याचे निदर्शनास आले. प्रामुख्याने ज्ञानार्जनासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक प्राध्यापक यात असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारीही जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले गेल्याने शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला या जुगारी गुरूजींनी काळीमा फासल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हे आहेत जुगारी
स्पोर्ट क्लबच्या आडून तिर्रट नावाचा जुगार खेळतांना पकडण्यात आलेल्या जुगार्‍यांमध्ये आनंत उर्फ बाळु शंकरराव शिंनगारे (वय ४५ रा.येळंबघाट), प्रल्हाद शंकरराव चित्रे (वय ३६ रा.पालवण), अभिमान अर्जुन बागलाने (वय ५९ रा.काकडहिरा), आनंद विठ्ठलराव ढास (वय ५५ रा.घारगाव), बाळाचार्य मनोहर घोलप (वय ४६ रा.तळेगाव), बिभीषण महादेव उदबत्ते (वय ३१ रा.काळा हनुमान ठाणा), मोहन नारायण शिनोरकर (वय ५२ रा.काळा हनुमान ठाणा), तात्यासाहेब आंबादास बहिर (वय ४५ रा.रूई पारगाव ता.वाशी), प्रदिप तुकाराम थोरात (वय ३५ रा.कामखेडा), एकनाथ बाळनाथ खांडे (वय ४१ रा.अंकुशनगर), चत्रभुज भवानी वाघमारे (वय ३८ रा.हिवरापहाडी), पंडित आश्रुबा परभणे (वय ३४ रा.खालापुरी ता.शिरूर), हनुंमत बाजीराव बहिर (३३ रा.रूई पारगाव ता.वाशी जि.उस्मानाबाद), हरिदास जनार्धन घोगरे (रा.५५ रा.नंदनवन नगर,बालेपीर बीड), राहुल विठ्ठल वंजारे (वय ४२ रा.येळंबघाट ता.बीड), कल्याण ज्ञानोबा पारखे (वय ३२ रा.हिवरापहाडी), भगवान आश्रुबा पवार (वय ४५ वर्षे रा.काळेगाव हवेली), सुरेश ज्ञानोबा काकडे (वय ३७ रा.जरूड), ज्ञानेश्‍वर पांडुरंग जगताप (वय ४५ रा.एकनाथ नगर), सय्यद जमिरोद्दीन कमरोद्दीन (वय ५५ रा.शिरापुर धुमाळ), उमेश चंद्रकांत जाधव (वय ३८ रा.शिरापुर धुमाळ), भास्कर विठ्ठल जायभाय (वय ४९ रा.काकडहिरा), अशोक रामचंद्र सानप (वय ४७ रा.कालिकानगर), राजु चॉंदमियॉ पठाण (वय ३९ रा.पारगाव), शेख एकबाल शेख हाजी (वय ४८ रा.राजुरीवेस कटकटपुरा), लक्ष्मण पांडुरंग शिंदे (वय ४५ वर्षे रा.गिरामगल्ली बीड), उद्धव अभिमान घोलप (वय ३२ रा.तळेगाव), नितीन भागवत शिनगारे (वय ३२ रा.येळंबघाट), चंद्रकांत भिवाजी त्रिमुखे (वय २९ रा.नांदुरघाट ता.केज), श्रीराम रावसाहेब मुंजाळ (वय ५० रा.निगडी पुणे), निलेश तुळशीराम सवासे (वय २६, रा.शुक्रवार पेठ), रमेश गुलाब औसरमल (वय ४५, रा.शिरापुर धुमाळ), त्र्यंबक संतोष वीर (वय ५२,रा.सुर्डीथोट), सुधीर आबासाहेब सुपेकर (वय ५९, रा.शिवणी), धनंजय मिठ्ठु कसपटे (वय ३२ रा.नवगण राजुरी), पारसनाथ मनोहर रोहिटे (वय २३ रा.आहेरवडगाव), संतोष चंद्रसेन बहिर (वय २९ रा.नवगण राजुरी), संतोष सर्जेराव गावडे (वय ३५ रा.नवगण राजुरी), बाळु कारभारी कावळे (वय ३६ रा.बावीकापसी ता.आष्टी), बापुराव विठ्ठल घोडके (वय ४२ रा.लोळदगाव), नामदेव प्रल्हाद लाटे (वय ३२ रा.बेलुरा), दुषांत रोहिदास ससाने (वय ३४ रा.पालवण), विकास अशोक मस्के (वय ३४ रा.पालवण), अशोक भिमराव बुटके (वय ३८ रा.आर्धामसला ता.गेवराई), संभाजी श्रीधर गिराम (वय ३८ रा.पारगाव ता.वाशी), मोहन मधुकर सुर्यवंशी (वय ३० रा.पाथरी ता.पाथरी जि.परभणी), बंडु किसन काळे (वय ३९ रा.कालीकानगर) या ४७ जुगार्‍यांसह जागा मालक, क्लब चालक कल्याण ज्ञानोबा पवार (वय ४९ रा.दगडी शहाजानपूर), भाऊसाहेब हनुमान सावंत (वय ४९ रा.नवी मुंबई), राजेंद्र तुकाराम मस्के (वय ५० रा.बीड) यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरायाची जागा
तळेगाव शिवारातली ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची आहे. कल्याण पवार दगडी शहाजानपूर ता.बीड यांनी स्पोर्ट क्लबसाठी ती किरायाने घेतली होती. पत्र्याचे शेड उभारून त्यात स्पोर्ट क्लब तयार केले होते. मात्र नंतरही जागा भाऊसाहेब सावंत रा.नवी मुंबई यांना किरायाने दिली. तेथे स्पोर्ट क्लबच्या आडून जुगार खेळला जात होता. त्यामुळे तिघांनाही आरोपी करण्यात आले असून पार्टी विथ डिर्फन्सीची शेखी मिरवणार्‍या भाजप पदाधिकार्‍याचे जुगारात आल्याने खळबळ उडाली आहे.

तथाकथीत क्लबशी माझा
संबंध नाही-राजेंद्र मस्के

चर्‍हाटा फाट्यावरील सदरील जागा मदन मस्के यांच्या मालकीची असून त्यांनी इतरांना भाडे तत्वावर दिलेली आहे. संबंधित भाडेकरूने रितसर जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक विभागा मार्फत सार्वजनिक मनोरंजन प्लेइंग कार्ड करिता परवाना काढलेला आहे. सदरील मनोरंजन पत्ता क्लब हा माझा नसून भाडेकरूनी जागा
भाड्याने घेऊन टाकलेला आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलीस प्रशासनासमोर मांडलेली आहेत. या कागदपत्रात कुठेही माझ्या नावाचा उल्लेख अथवा संबंध नाही. याची पडताळणी पोलिस प्रशासनाने केलेली आहे. कृपया अर्धवट माहितीच्या आधारावर पत्ता क्लबच्या संदर्भातील कोणत्याही बातमीमध्ये माझे नाव गोवण्यात येऊ नये अशी आग्रहाची विनंती सर्व वर्तमानपत्र व प्रसिद्धी माध्यमांना केली. बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चालू केलेली अवैध धंद्या विरोधात सुरु केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे. परंतु ही मोहीम राबवत असताना वैध व अवैध धंद्याची पूर्ण माहिती घेऊनच कारवाई करणे उचित होईल. जिल्ह्यात अनेक प्रकारचे अवैद्य धंदे चालू असून सर्व धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. पोलिस प्रशासनाच्या या मोहिमेला पूर्ण समर्थन आहे अवैध धंद्या विरुद्धची मोहीम अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी आमचे पोलिस प्रशासनाला सहकार्य असेल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!