Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकोरोना वाढीवर मुख्यमंत्र्यांची टास्कफोर्स बैठक मोठे निर्बंध लागण्याची शक्यता; शाळांबाबतही निर्णय होणार

कोरोना वाढीवर मुख्यमंत्र्यांची टास्कफोर्स बैठक मोठे निर्बंध लागण्याची शक्यता; शाळांबाबतही निर्णय होणार


मुंबई (रिपोर्टर) राज्यात गेल्या सात दिवसांच्या कालखंडात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत असून ओमायक्रॉनच्या रुग्णातही वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लादले जाण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक रद्द करून तातडीने कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवे निर्बंध येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मुंबई महापालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

राज्यात काल ३९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात २५१० रुग्ण तर एकट्या मुंबईतून आढळले आहेत. तसंच ओमायक्रॉनचे देशातील सर्वात जास्त रुग्ण दिल्लीनंतर महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे तिसर्‍या लाटेची सुरुवात ओमायक्रॉनमुळे होऊ शकते असं मत देखील तज्ज्ञांनी याआधीच व्यक्त केलं आहे. दिल्लीत ओमायक्रॉनचे २६३ तर महाराष्ट्रात २५२ रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही अधिक वेगानं ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार होतो. त्यामुळे कमीत कमी कालावधीत कोरोना पुन्हा एकदा थैमान घालू शकतो याचा अंदाज घेत सरकार सतर्क झालं आहे. त्याअनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कोरोना टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये कोरोनावर चर्चा होत नवे निर्बंध लागण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमध्ये ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा आदेश लागू आहे. आज शाळांबाबत महत्वपुर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याने सतर्क राहण्याची गरज
कोरोनाच्या सुरुवातीला केवळ एक रुग्ण बीड जिल्ह्यात सापडल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडात तीच रुग्णसंख्या २ हजाराच्या पुढे गेली. तो अनुभव पाहता सध्या १ हजार तपासण्यांमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण मिळून येत असले तरी जिल्ह्याने गाफील राहणे चुकीचे आहे. जनतेसह जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने राज्यातील अन्य भागात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आधीच उपाययोजनांसह सतर्क राहणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात ओमायक्रॉनचा अद्याप एकही रुग्ण नाही.

Most Popular

error: Content is protected !!