Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रभीमाकाठी धनंजयांची ललाटी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांतता व उत्साहात; सामाजिक न्याय विभाग...

भीमाकाठी धनंजयांची ललाटी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांतता व उत्साहात; सामाजिक न्याय विभाग व पुणे जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन

धनंजय मुंडे यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक
कुठेही वाहतूक कोंडी नाही

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचा बसमधून प्रवास आणि सुरेख नियोजन
पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, जयस्तंभाकडे आत व बाहेर जाण्यासाठी तिहेरी व्यवस्था!म

पुणे (रिपोर्टर) – १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची जबाबदारी यावर्षीपासून सामाजिक न्याय विभागाने घेतली असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्याप्रमाणे सामाजिक न्याय विभाग व पुणे जिल्हा प्रशासनाने मिळून या कार्यक्रमाचे सुरेख नियोजन केल्याने अत्यंत शांततापूर्ण वातावरणात व भीम अनुयायांच्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.


सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकारातून साकारलेला अभिवादन कार्यक्रम त्याचबरोबर या परिसरात येणार्‍या नागरिकांसाठी सोयी-सुविधा व सुशोभीकरण करून हे प्रेरणा स्थळ विकसित केले जाणार असल्याने एक वेगळाच उत्साह जमलेल्या अनुयायांमध्ये यावर्षी दिसून येत होता.
प्रथमच व अत्यन्त कमी वेळेत केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पुणे जिल्हा प्रशासनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांसह अन्य संबंधित सर्वच अधिकार्‍यांनी नेमलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी स्वतः पीएमपीएलच्या बसमधून प्रवास करत सुविधा व सुरक्षेची पाहणी केली. यावर्षी कुठेही वाहतूक कोंडी झाल्याचे आढळून आले नाही. दरम्यान पहाटे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. डॉ. अमोल कोल्हे आदींनी जयस्तंभास मानवंदना दिली. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचित आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना व हजारो भीम अनुयायांनी अभिवादन केले. भीमा नदीचे कठडे देखील फुलांनी सजवले होते. तर येणार्‍या भीम अनुयायांचे आकर्षक रांगोळीने स्वागत केले गेले. प्रशासनाने पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी सर्वच सुविधांचे बारकाईने नियोजन केले होते. जयस्तंभाच्या आसपास गर्दी होऊ नये, यासाठी आत जायला व बाहेर पडायला तिहेरी व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान शौर्य, समता व न्यायाचे प्रतीक असलेला जयस्तंभ व परिसराचा विकास व सुशोभीकरण करण्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून, या परिसराचे रूप पालटणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच अत्यंत कमी वेळेत सामाजिक न्याय विभागाने पुणे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले, पुढील वर्षी यापेक्षाही उत्कृष्ट नियोजन करू, असा विश्वास श्री. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!