Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात बॉम्ब?

जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात बॉम्ब?


शहरात खळबळ, बॉम्बशोध पथकाने एक तास कार्यालय परिसर पिंजून काढला, श्‍वानाला फिरवले, शेवटी काहीच न मिळाल्यानंतर सुटकेचा नि:श्‍वास, निनावी फोन करणार्‍याचा शोध सुरू
बीड (रिपोर्टर) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब असल्याची माहिती बीड कंट्रोलला निनावी फोनद्वारे आल्यानंतर पोलीस दलासह जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर बॉम्बशोधक यंत्राद्वारे तपासून काढला. कायझर नावाच्या श्‍वानाला जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासह अख्ख्या इमारतीत फिरवलं. एक तासाच्या शोधानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मात्र निनावी फोन करणार्‍या व्यक्तीचा शोध आता पोलीस घेत आहेत.
आज दुपारी बारा वाजता पोलीस कंट्रोलला एक निनावी फोन आला. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले आणि फोन करणार्‍याने फोन कट केला. घटनेचे गांभीर्य ओळखून आणि प्रजासत्ताक दिनाची तारीख जवळ येत असल्याचे पाहून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी तात्काळ घटनास्थळी दोन पीएसआय आणि बॉम्बशोध पथक यंत्रासह पाठवले. जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा श्‍वानासह दाखल झाल्याने उपस्थितात उलटसुलट चर्चा सुरू झाली. अनेकांना नेमके काय होत आहे हेच कळत नव्हतं. जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली तेव्हा काही काळ परिसरात भिती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. बॉम्बशोध पथकाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या दालनासह इमारत आणि परिसर बॉम्बशोध यंत्राने पिंजून काढला. श्‍वानालाही सर्वत्र फिरवले. मात्र कुठेही बॉम्ब अथवा बॉम्बसदृश्य संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यावेळी कुठे पोलीस यंत्रणेसह उपस्थितांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. निनावी फोन करणार्‍या व्यक्तीचा नेमका हेतू काय? आणि प्रजासत्ताकदिनाच्या महिन्यातच हा फोन का आला ? यासह अन्य बाबी तपासण्यासाठी पोलीस फोनकर्त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळावर बॉम्बशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक कांबळे यांनी ही कारवाई पुर्णत्वास नेली.

Most Popular

error: Content is protected !!