Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या इशार्‍यानंतर केंद्राला खडबडून जाग

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या इशार्‍यानंतर केंद्राला खडबडून जाग


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा महामानावांच्या यादीत समावेश करण्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनला निर्देश


मुंबई (रिपोर्टर) थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव केंद्र सरकारच्या महामानावांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्राला अण्णाभाऊंच्या कार्याचा अहवाल राज्य सरकार मार्फत पाठवू व त्यांचे नाव यादीत घ्यायला भाग पाडू, असा सज्जड इशारा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारला खडबडून जाग आली असून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव केंद्राच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे असे निर्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले आहेत.


अंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा केंद्र सरकारकडून नियुक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने महामानावांच्या यादीत समावेश करण्यास नकार दिला होता व उलट अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध नाहीत असे म्हणत त्यांचा अवमान होईल अशा शब्दात उत्तर दिले होते. यावरून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.एका चळवळीतल्या महामानवाचा, कामगार नेत्याचा अपमान, केंद्र सरकारने केलेला आहे. कदाचित केंद्र सरकार मध्ये बसलेल्या एकाही व्यक्तीने, अण्णाभाऊंचे साहित्य वाचलं असतं, तर अण्णाभाऊ साठे यांनी, या उपाशीपोटी राहणार्‍या माणसांची व्यथा, उपाशी राहून आपल्या लेखणीतून कशी लिहिली ? आपल्या शैलीतून गरीबांची आणि कामगारांची व्यथा कशी मांडली? हे भारतीय जनता पार्टीला माहीत नसेल, तर नक्कीच महाराष्ट्रातला सामाजिक न्याय विभागाचा मंत्री या नात्याने, ज्या महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला, तोच महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंची खरी ओळख भारतीय जनता पार्टीला करून दाखवेल. असा सूचक इशारा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे दिला होता.


धनंजय मुंडे यांच्या सह राज्यभरातून विविध नेते व संघटनांकडून केंद्राच्या या कृतीबद्दल नाराजीचा सूर पसरला होता, त्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय विभागाला जाग आली असून, या बाबीची गंभीर दखल घेतली गेली आहे. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन या केंद्र सरकार नियुक्त संस्थेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव केंद्राच्या महापुरुषांच्या यादीत घेण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!