Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमतहसीलदाराने स्मशानभूमीला जागा देवूनही अंत्यविधी रोखला नातेवाईकांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला

तहसीलदाराने स्मशानभूमीला जागा देवूनही अंत्यविधी रोखला नातेवाईकांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणला


केज (रिपोर्टर) केजच्या तहसीलदाराने सुर्डी सोनेसांगवी येथील दलित समाजासाठी माळेगाव शिवारातील गायरान जमीनीतील दोन एकर जागा स्मशानभूमीसाठी दिलेली आहे. मात्र तरी देखील माळेगाव शिवारातील नागरिक अंत्यविधी रोखतात. वारंवार सुर्डी सोनेसांगवी आणि माळेगाव शिवारातील नागरिकांचे स्मशानभूमीवरून वाद होत आहेत.

काल माळेगाव शिवारातील नागरिकांनी एका महिलेचा अंत्यविधी रोखल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट केज तहसील कार्यालयातच मृतदेह आणून ठेवला. त्यानंतर तब्बल चार तासांनी तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मीबाई शहाजी कसबे (वय ८० वर्षे, रा. सुर्डी सोनेसांगवी) यांचे काल निधन झाले होते. रात्री अंत्यविधीसाठी नातेवाईक माळेगाव शिवारातील गायरान जमीनीत गेले असता माळेगाव शिवारातील नागरिकांनी येथे अंत्यविधी करू नका म्हणून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना अंत्यविधी करू दिला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सकाळी तहसील कार्यालयात मृतदेह आणून ठेवला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर माळेगाव शिवारातील गायरान जमीनीतच त्या महिलेच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!