Friday, January 28, 2022
No menu items!
HomeUncategorizedरोख-ठोक -कॉंग्रेसच्या मृत्यूशय्येवर मै जिंदा हू…!

रोख-ठोक -कॉंग्रेसच्या मृत्यूशय्येवर मै जिंदा हू…!इ.स.२०१४ साली देशात आलेल्या मोदी नावाच्या त्सुमानीने कॉंग्रेसला अक्षरश: उध्वस्त केले. देशातल्या बोटावर मोजण्याइतक्या राज्यात कॉंग्रेस कशीबशी तग धरून राहिली. मोदी नावाची त्सुमानी ही मंदिर,मस्जिदसह भावनिक मुद्दे घेवून आली होती. त्यात जे मंदिर मस्जिद आणि हिंदुत्वाला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत राहिले ते तरले, बाकी सैरावर झाले. २०१९ची निवडणूकही त्याच त्सुमानीच्या जोरावर भाजपाला जिंकता आली. इथेही कॉंग्रेस भुईसपाट झाली. त्सुमानीची ताकद ही जात पात धर्म पंथ आणि एकाधिकार शाहीचे वर्चस्व हीच आहे. हा जो अजेंडा भाजपाने आत्मसात केला त्या अजेंड्याला गेल्या काही दिवसापासून तडे जावू लागले आणि मोदी नावाच्या त्सुमानीची लाट काही प्रमाणात ओसरताना दिसून येवू लागली. त्या लाटेच्या ओसरण्याचा भाग आपण शेतकर्‍यांचे तीन कायदे मागे घेतले. यात पाहू शकतो. गेल्या ७ वर्षाच्या कालखंडात जिथे ’हम करे सो कायदा‘ या भूमिकेत भाजप असायचे तिथे शेतकर्‍यांच्या करो या मरो या आंदोलनामुळे भाजपाला नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन पावले मागे सरकावे लागले. हे दोन पावले उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणासह अन्य राज्यातल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मागे सरकून घेतले. असे म्हटले जात असले तरी भाजपाविरोधात असलेल्या शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या, बेरोजगारांच्या, विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला कॉंग्रेस आपलंसं करू शकली नाही. अथवा मृत्यूशय्येवर पडलेल्या कॉंग्रेसला अद्यापही उभे ठाकण्याचे टॉनिक शेजारी असताना घेता आले नाही. या उलट परिस्थितीचे गांभिर्य पाहून भारतीय जनता पार्टी ज्या पध्दतीने निवडणूका तोंडावर असलेल्या राज्याराज्यात कॅम्पियन करते ती मार्केटिंग पाहून भाजपाचे कौतुक करावं तेवढे थोडच म्हणावे लागेल. परंतू हे करत असताना भाजप असो या कॉंग्रेस यांच्या राजकारणात देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा होता कामा नये याची दक्षता राजकारण्यांनी घ्यायला हवी होती. परंतू काल पंजाबमधल्या घटनेने


सुरक्षेचा खेळखंडोबा
उभ्या देशाने नव्हे तर जगाने पाहिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काफिला एका पुलावर १५ ते २० मिनीट थांबतो, दस्तुरखुद्द पंतप्रधान केवळ बुलेटप्रुफ गाडीमध्ये बसलेले असतात. पुढे शेतकर्‍यांनी रस्ता रोखून धरलेला असतो. शेवटी पंतप्रधानांना परतावे लागते. ही गोष्ट भारतीयांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे. जिथे देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये अडथळे निर्माण होतात तिथे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? हा सवाल देशात नव्हे तर जगाच्या पातळीवर विचारला जाईल. भारतीय सुरक्षा यंत्रणेकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाईल. पंतप्रधान कुठल्या एका पक्षाचे नसतात, पंतप्रधानांचे पद हे सार्वभौम आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वस्व आहे. मग अशा व्यक्तीच्या सुरक्षेमध्ये एवढा गाफीलपणा होतोच कसा? जी एसपीजी यंत्रणा आहे ती काय करत होती? पंजाब सरकारचे आणि केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? याचे उत्तर देण्याची जबाबदारी जेवढी पंजाब सरकारची आहे तेवढीच केंद्र सरकारच्या गृहविभागाचीही आहे. १३३ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येच्या या भारत देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत हा गाफीलपणा होत असेल तर जगाच्या पाठीवर भारताची प्रतिमा ती कशी जाईल? काल जे पंजाबमध्ये झाले ते गंभीरच.


काय झाले पंजाबमध्ये?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता. गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांची सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था पंजाब सरकारला करावी लागणार होती. त्यामुळे पंजाब सरकारला रस्त्याने पंतप्रधानांचा दौरा सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतूक रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती. मात्र, तसेच घडले नाही. मंत्रालयाने सांगितले की, या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. हे झाले घटनाक्रम आणि सुरक्षेतील त्रुटीबाबतचे कागदी घोडे नाचवणे. जगाच्या पाठीवर भारतीय सुरक्षा एजन्सी असलेल्या स्पेशल स्यिुक्युरिटी ग्रुप म्हणजेच एसपीजी ही सर्वउत्कृष्ट सुरक्षा एजन्सी आहे. मग ती एजन्सी गाफिल कशी राहिली? याचेही उत्तर देशाला हवे आहे.


एसपीजी ची निर्मिती
सुध्दा भारताच्या पंतप्रधानांच्या शहादतातून झाली. नव्हे नव्हे तर सांडलेल्या रक्तातून झाली. इ.स.१९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा रक्षकाने गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. मग पंतप्रधानांना सुरक्षा देण्यासाठी १९८५ साली स्पेशल सिक्युरिटी ग्रुप म्हणजेच एसपीजी ची स्थापना झाली. १९८८ सालापासून एसपीजी विद्यमान पंतप्रधानांसह माजी पंतप्रधानांना सुरक्षा व्यवस्था पुरवू लागली. या एजन्सीचा वार्षिक खर्च हा ३७५ कोटी एवढा आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी पुर्णत: एसपीजी वर असते. पंजाबमध्ये दौरा करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुरक्षा पुरवण्याबाबत एसपीजीसह अन्य सुरक्षा यंत्रणेने असा कुठला गाफीलपणा केला आणि त्या गाफीलपणातून देशाच्या पंतप्रधानांना दहा ते पंधरा किमी वर पाकिस्तानची बॉर्डर असलेल्या ठिकाणी वीस मिनीट थांबावे लागले. याचे उत्तर आता मागावेच लागेल. आपल्याकडे जात,पात,धर्म,पंथ, मंदिर,मस्जिद यावरून सातत्याने राजकारण होते. शहिद झालेल्या जवानांवरूनही राजकारण केले जाते. इतिहासातल्या महापुरूषांसह देवदेवतांवरून, पुतळ्यांवरून मोठे राजकारण होते. मात्र आता गेल्या ३६ तासापासून देशात सत्ताधारी आणि विरोधकात जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ते राजकारण जिवंत माणसांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे नव्हे तर एखाद्याला मृत्यूच्या दाढेत रोखून त्यावर सत्तेच्या पोळ्या भाजण्यासारखे म्हणावे लागेल. पंतप्रधानांची सुरक्षा आणि त्या सुरक्षेपूर्वी केलेली तजबीज ही वाखण्यांजोगी असते. सुरक्षा यंत्रणा चप्पाचप्पा धुंडाळत असतात. मग नेमकं काल झालं काय? याचा शोध घेतला गेला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काफिला अडकला इथपर्यंत ही गोष्ट साधी आणि सोपी वाटत असली तरी हा


काफिला रोखलाच कसा जावू शकतो?
हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. पंतप्रधान हे जेव्हा कुठल्या राज्यामध्ये दौर्‍यावर जात असतात तेव्हा तो दौरा राजकीय आहे का? सामाजिक आहे का? अन्य कुठला आहे? या सर्व बाबी तपासून त्या त्या नुसार सुरक्षा यंत्रणा लावली जात असते. पंतप्रधानांची सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी ८ ते १५ दिवसाअगोदरच एसपीजीची टिम त्या त्या राज्यात जाते. त्या राज्यातल्या गुप्तचर अधिकार्‍यांकडून माहिती घेते. त्या भागातली सुरक्षा व्यवस्था कशी असायला हवी? पंतप्रधानांनी कुठल्या मार्गावर जायला हवे? कुठे रहायला हवे? एखाद्या रस्त्यावर अडचणी आल्याच तर त्यासाठी पर्यायी रस्ता कुठला असावा? पंतप्रधानांना नेमके कुठं रहायचे आहे? कुठे जायचे आहे? याची इत्यनभूत माहिती सोबत ठेवून हा दौरा करण्यात येतो. मग पंजाबमध्ये पंतप्रधानांचा जो दौरा झाला त्या दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखाद्या पुलावर वीस मिनीट थांबावे लागले, हे झालेच कसे? आरोप प्रत्यारोप करताना भाजपाकडून थेट पंतप्रधानांच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले गेले तर कॉंग्रेसकडून अचानक रूट बदलल्यामुळे हे सर्व झाल्याचे सांगण्यात आले. परंतू पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत धाडसी निर्णय घेतले जातात. ते पंजाब सरकारने का घेतले नाही? हा सवाल नक्कीच आता उपस्थित करावा लागेल. या सवालाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भटिंडा विमानतळावर गेल्यावर


‘मै जिंदा हू…’
ची प्रतिक्रिया का द्यावी लागली? जेव्हा पंतप्रधान त्या पुलावरून परतले आणि विमातळावर पोहोचले तेव्हा उपस्थित अधिकार्‍यांना ते असे म्हणाले ‘आपके सीएम को थँक्यू कहना, मै एयरपोर्ट जिंदा पहूंचा हू..’ पंतप्रधानांना यातून नेमके काय सांगायचे होते? त्यांच्या जिवाला कोणाकडून धोका होता? पंजाब सरकारकडून? कॉंग्रेसकडून? की गेली वर्ष दिड वर्षापासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांकडून? की ही प्रतिक्रिया पुन्हा एक राजकारणाचा भाग म्हणावा? असे एक अना अनेक प्रश्‍न या प्रक्रियेच्या निमित्ताने उपस्थित होत असले तरी आम्ही पुन्हा पुन्हा पंतप्रधान यांच्या सुरक्षेमध्ये झालेला पंजाबमधील गाफिलपणा हा अत्यंत गंभीर आहे. सुरक्षा यंत्रणेचे लख्तरे वेशीला टांगणारा आहे. त्या राज्याच्या पोलिस यंत्रणेसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणा एसपीजी सुरक्षा यंत्रणा यांनाही जबाबदार धरावे लागेल. पंतप्रधान हा सार्वभौम आहे. तो एका पक्षाचा नसतो हे कालच्या प्रकरणावरून निव्वळ राजकारण करणार्‍या सत्ताधारी आणि विरोधकांनीही समजून घ्यायला हवे. कालच्या प्रकरणातून भारतीय सुरक्षा यंत्रणेचे लख्तरे वेशीला जरी टांगले गेले असले तरी भाजपाला मात्र यातून मृत्यूशय्येवर असलेल्या कॉंग्रेसच्या समोर जावून छातीठोकपणे ‘मै जिंदा हू..’चा नारा देण्याची संधी या प्रकरणातून नक्कीच मिळाली. मात्र राजकीय दृष्टीकोन सत्ताकारणातील फायदे तोटे पाहण्यापेक्षा पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुट्यांची गोळाबेरीज करत यातील दोषींवर कारवाई होणे नित्तांत गरजेचे. त्यापेक्षा हे जर राजकारण म्हणून कॉंग्रेस अथवा भाजपाची योजना असेल तर देशाचे भवितव्यच धोक्याचे असल्याचे आम्ही स्पष्ट म्हणू. कालच्या प्रकरणात राजकारण होत असले तरी


त्या रिकाम्या खुच्यार्चे काय?

याबाबतही संशयकल्लोळ असल्याने त्या रिकाम्या खुर्च्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजीत दौरा ज्यापध्दतीने होता त्या नियोजीत दौर्‍यात रस्ते मार्गाने जाण्याची योजना नव्हती. मात्र वातावरण खराब असल्यामुळे पंतप्रधानांना नियोजीत दौर्‍यापासून वेगळे होवून मोटारीने जाण्याचा निर्णय झाला आणि त्याच दरम्यान शेतकर्‍यांनी रस्ता रोखून धरला. अशावेळी एक तर पंजाब पोलिसांनी तो रस्ता बळाचा प्रयोग करून रिकामा करायला होता तो त्यांनी केला नाही. हा जेवढा कॉंग्रेसचा गुन्हा आहे हे भाजप पटवून सांगत तेवढच लाखाच्या दहा लाखाच्या जर समुदायासमोर जाणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील कार्यक्रमात ज्या रिकाम्या खुर्च्या दिसल्या त्या रिकाम्या खुर्च्याही वेगळंच ओरडून सांगत आहेत आणि त्याची री कॉंग्रेसने खुर्च्या रिकाम्या दिसल्या म्हणून पंतप्रधान वापस गेले या प्रतिक्रियेतून ओडली. परंतू काहीही असो काल झालेली पंजाबमधील घटना अत्यंत संतापजनक आणि सुरक्षा यंत्रणेच्या भोंगळेपणाचे लक्षणच.

Most Popular

error: Content is protected !!