Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबर्दापूरजवळ एसटी बस-ट्रकची समोरासमोर धडक भीषण अपघातात ४ ठार, २० जखमी

बर्दापूरजवळ एसटी बस-ट्रकची समोरासमोर धडक भीषण अपघातात ४ ठार, २० जखमी


धुके पडल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटले; वाहकाच्या बाजुने ट्रक बसची धडक,
मयतांमध्ये एसटी वाहकाचा समावेश, मुख्य रस्त्यावर दुभाजक नसल्याने घडला अपघात
सलीम गवळी| अंबाजोगाई


भरधाव वेगात जाणार्‍या एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर २० जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी अंबाजोगाई-लातूर रोडवर घडली. सकाळी धुक्याचं वातावरण असल्याने एसटीच्या वाहकाला अंदाज आला नाही. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्या एकमेकांमध्ये अडकून पडल्या होत्या. क्रेनच्या सहाय्याने कटरच्या सहाय्याने गाडी कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघात घडल्यानंतर यातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही काळ या रस्त्यावरची वाहतूकही ठप्प झाली होती.

औरंगाबाद आगाराची एसटी बस (क्र. एम.एच. २० बी.एल. ३०१०) सकाळी सात वाजता लातूर येथून औरंगाबादकडे परत जाण्यासाठी निघाली असता बर्दापूर जवल असलेल्या नंदगोपाल दूध डेअरीजवळ अपघातग्रस्त झाली. धुके मोठ्या प्रमाणावर असल्याने आणि हलक्या पावसाच्या सरी पडत असल्यामुळे धुके अधिक गडद झाले होते. त्यामुळे रस्त्यावर काहीच दिसत नव्हते. बस अंबाजोगाईकडून लातूरकडे जाणार्‍या ट्रकवर डाव्या बाजुने जोराने आदळली. समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अख्खा चुराडा झाला. ट्रक आणि बस भरधाव वेगात असल्याने तेवढ्या वेगात धडक बसल्याने दोन्ही गाड्या एकमेकांमध्ये गुंतून बसल्या होत्या. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले तेव्हा समोरचा अपघात पाहून आणि रस्त्यावर रक्तमांस पाहून अनेकांना भुरळ आली. अशा परिस्थितीत तेथील नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले. तोपर्यंत चार जण जागीच ठार झाले होते र २० जणांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. लातूर ते औरंगाबाद जाण्यासाठी बनवण्यात आलेल्या महामार्गावर बर्दापूर ते अंबा साखर कारखान्यापर्यंत दुभाजक बसवण्यात आले नसल्याने हा अपघात झाला, असे उपस्थितांचे म्हणणे होते. अपघाताची तीव्रता आणि अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी क्रेनसह कटरचा वापर करावा लागला. यातील मयतांमध्ये वाहकासह अंबाजोगाई येथील एका तरुणाचा समावेश आहे.

अपघातातील मयत
चंद्रशेखर पाटील (वाहक) वय ३६ वर्ष
आदिल शेख सलीम शेख (रा सदरबाजार अंबाजोगाई)
नलिनी देशमुख, महंमद सादीक पटेल

जखमींची नावे
योगिता भगवान कदम रा लातूर सुभाष भगवान गायकवाड (वय ४३ वर्ष रा केज,संगीता बजरंग जोगदंड वय ४४ वर्ष रा लातूर) बळीराम सभाजी कराड (वय २३ वर्ष रा खोडवा सावरगाव) अय्यान फहीम पठाण (वय १३ वर्ष बीड) असमतबेगम फहीम पठाण (वय ३० वर्ष रा बीड) निहाल फहीम पठाण १२ वर्ष बीड, हरिनाम रघुनाथ चव्हाण वय ४७ रा लातूर भागवत निवृत्ती कांबळे (वय ५५ वर्षे लातूर) प्रकाश जनार्धन ठाकूर ५५ वय ५५ रा केज,दस्तगीर पठाण (वय २० वर्ष निलंगा),अल्लदिन अमीर पठाण (वय २० वर्ष निलंगा), माधव पठारे (वय ६५ वर्षे निलंगा)

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!