गेवराई (रिपोर्टर)ः- शहरातील चिंतेश्वर नगर गृहनिर्माण सहकारी संस्थेची सर्व्हे नं.330 मधील जमीन कायद्यातील पळवाटांचा आधार घेवून विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. मुळ सभासद नसलेल्यांनी थेट चेअरमनपदी विराजमान होवून आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून अधिकार्यांशी संगणमत करत मुळ तक्रारदारांबरोबर हात मिळवणी करून सहकारी संस्थेची करोडो रुपये किंमतीची जमीन विक्री केली आहे. या प्रकरणात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गेवराई, मुद्रांक जिल्हाधिकारी बीड, दुय्यम निबंधक गेवराई व तहसिलदार यांच्यासह अनेक अधिकारी अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. आ.लक्ष्मण पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र राक्षसभुवनकर यांचा या जमीन विक्री व्यवहारात थेट संबंध असल्यामुळे दोषीविरुध्द कारवाई होणार का ? असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला आहे.
चिंतेश्वर नगर गृहनिर्माण सहकारी संस्था या संस्थेची दि.7.9.1989 रोजी नोंदणी झाली. मुख्य प्रवर्तक शंकर पोटे यांनी 1988 ते 1990 दरम्यान संस्थेसाठी गेवराई शहरालगत सर्व्हे नं.330 मधील 1 हेक्टर 21 आर जमीन खरेदी केली. संस्थेकडील जमीनीवर सभासदांच्या नावे प्लॉट करणे, अकृषी परवाना घेणे अथवा सभासदांच्या घर बांधकामासाठी संस्थेकडून कोणत्याही हालचाली नोंदणीपासून आजपर्यंत झालेल्या नाहीत. दि.22.10.2014 रोजी तत्कालीन सहाय्यक निबंधक, गेवराई यांनी ही संस्था अवसायानात काढण्यासाठी अंतरीम आदेश पारीत केले. दरम्यान गेवराई शहरालगतच्या बायपाससाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 23 आर जमीन संपादीत करून मावेजापोटी संस्थेला 9 लाख 13 हजार 353 रुपये अदा केले. एवढी मोठी रक्कम संस्थेला मिळाल्याचे लक्षात येताच गेवराई नगर परषदेचे उपनगराध्यक्ष पद भुषविलेल्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्याने या संस्थेत मागच्या दाराने प्रवेश केला. दि.13.02.2016 रोजी हा पदाधिकारी थेट गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन झाला.
मुळ जमीनीचे मालक रमेश लाड व दत्ता लाड यांनी या प्रकरणात सातत्याने तक्रार अर्ज देवून जमीन आपल्या नावे ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या तक्रारीवरून झालेल्या चौकशीत लेखापरिक्षक, सहकारी संस्था, नेकनूर एम.एन.काकडे यांनी दि.06.06.2022 रोजी दिलेल्या अहवालात राजेंद्र राक्षसभुवनकरसह 26 नव्याने झालेले सभासद बेकायदेशीर असल्याचे नमुद केले. विशेष लेखा परिक्षक वर्ग 2 डी.के.कराड यांनीही या प्रकरणाची चौकशी केली. शेवटी उपलेखापरिक्षक, सहकारी संस्था, आष्टी बी.ए.मोरे यांना चौकशी करण्याचे काम सहकार विभागाने सोपविले. त्यांना संस्थेने दप्तर न दिल्यामुळे कलम 80 अन्वये पोलिस संरक्षणात दप्तर उपलब्ध करण्याची विनंती तहसिलदार, गेवराई यांना सहकार विभागाने केली होती. प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच तक्रारदारांबरोबरच हात मिळवणी करून जमीन विक्री करण्याचा निर्णय करण्यात आला. शेवटी दि.30.11.2023 रोजी राजकुमार बन्सीलाल भुतडा, राधेशाम आसाराम खंडागळे आणि प्रमोदकुमार सिताराम सोमानी यांना ही जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विक्री करण्यात आली. याप्रकरणात फेरफार होवू नये म्हणून संस्थेचे सभासद जगन्नाथ कामटे आणि प्रकाश आतकरे यांनी आक्षेप नोंदविला आहे.
जिल्हा उपनिबंधकांसह वरिष्ठ अधिकार्यांकडे जमीन विक्रीची परवानगी मागणार्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गेवराई यांच्याकडे साधा अर्ज दिला. त्यांनी संस्थेची उपविधी, कायदा व नियम यातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी असे मोघम उत्तर देवून आपली जबाबदारी झटकून टाकत एक प्रकारे विक्री करणार्यांना मदत केली. मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांनी कोणतीही खात्री न करता राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कोट्यावधी रुपये बाजारभावाच्या जमीनीचे अभिनिर्णय करून मुद्रांक शुल्क कमी करत नोंदणीकृत दस्त करून दिला. तहसिलदार, गेवराई यांनी सातबारा वरील नावामध्ये अनेकांचे आक्षेप असतानाही बदल करून दिला. अनेक कर्मचारी व अधिकारी यांच्या बरोबर संगणमत करून कोट्यावधी रुपयांची सहकारी संस्थेची जमीन अखेर विक्री करण्यात आली. मुळ सभासद नसलेले राजेंद्र राक्षसभुवनकर यांनी स्वतः या जमीनीचा विक्री व्यवहार केला आहे. या व्यवहारात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य झालेले आहेत. सत्तेचा गैरवापर करत अनेकांशी संगणमत करून भुमाफियांनी अखेर चिंतेश्वर नगर गृहनिर्माण सहकारी संस्थेची जमीन गिळंकृत केल्याची चर्चा गेवराई शहरातील नागरीक मोठ्या चवीने करत आहेत. या प्रकरणात दोषीविरुध्द शासन कारवाई करणार का ? या बाबतची उत्सुकता नागरीकांमध्ये आहे.