Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeशेती‘शेतकरी एकजूट जिंदाबाद’च्या घोषणा देत तालुक्यातील ५१ गावात शेतकर्‍यांचा ठिय्या

‘शेतकरी एकजूट जिंदाबाद’च्या घोषणा देत तालुक्यातील ५१ गावात शेतकर्‍यांचा ठिय्या


२०२०-२१ च्या पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, प्रथमच एकाच दिवशी ५२ गावात ठिय्या आंदोलन
बीड (रिपोर्टर)- बीड तालुक्यातील शेतकर्‍यांना २०२०-२१ चा पीक विमा मिळाला नसल्याने वेळोवेळी मागण्या करून, आंदोलन करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याचे पाहून आज तालुक्यातील शेतकर्‍यांनी तब्बल ५२ गावांमध्ये ठिय्या आंदोलन करून शासन-प्रशासन व्यवस्थेचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. पीक विमा आमच्या हक्काचा, सांगत जोपर्यंत आमच्या विम्याचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. आज दिवसभराच्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने शेतकर्‍यांचे पैसे दिले नाही तर पुढे रस्ता रोको, मोर्चासारखे तीव्र आंदोलन करू, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व धनंजय गुंदेकर यांच्यासह गावागावातील शेतकर्‍यांनी केले आहे.


बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीचा सामना करून देखील ४ लाख शेतकर्‍यांना २०२० या सालचा पीक विमा मिळाला नाही. २०२१ साली जिल्ह्यात १३ वेळा अतिवृष्टी झालेली असताना हजारो शेतकर्‍यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले. यामध्ये बीड तालुक्यातील शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून शेतकर्‍यांनी २०२०-२१ चा पीक विमा मिळावा यासाठी वेळोवेळी शासन-प्रशासन दरबारी निवेदन-आंदोलने करूनही अद्याप त्यांचा पीक विमा खात्यावर जमा झाला नसल्याने आज बीड तालुक्यातील तब्बल ५२ गावांमध्ये ठिय्या आंदोलन कोरोनाचे नियम पाळून केले जात आहे. बीड तालुक्यातील अंबेसावळी, घाटसावळी, वांगी, काळेगाव, मानकूरवाडी, शिवणी, कुटेवाडी, नाळवंडी, बोरफळी, मैंदा, पोखरी, कारळवाडी, निर्मळवाडी, ढेकणमोहा, जरुड, बाभळखुंटा, मौजवाडी, चिंचोलीमाळी, वायभटवाडी, कोल्हारवाडी, लिंबारुई देवी, खापर पांगरी, कुक्कडगाव, पाटेगाव, सुर्डी, पिंपळनेर, बाभुळवाडी, बेडकुचीवाडी, सांडरवण, शहाजानपूर, लोणी, ब्राह्मणपूर, लोळदगाव, पारगाव जप्ती, पोखरी लिंबागणेश, अंजनवती, बोरखेड, सफेपूर, तांदळवाडी याठिकाणी एकाच दिवशी शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कुठे सभागृहात तर कुठे मंदिरात, कुठे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी आपला ठिय्या सुरू ठेवला आहे. जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल, ठिय्या आंदोलनानंतरही शेतकर्‍यांचे पैसे जमा न झाल्यास रास्ता रोको, मोर्चासारख्या आक्रमक आंदोलनाचा इशारा या वेळी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी देऊन शेतकरी एकजुट जिंदाबादचे नारे दिले.

Most Popular

error: Content is protected !!