2023-24 चा शंभर टक्के निधी खर्च करा; दुष्काळात चारा-पाण्याची कमतरता भासणार नाही त्यादृष्टीने निधी वाढवा
बीड (रिपोर्टर): दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा, पाणी इत्यादी गोष्टींची कमी भासणार नाही, याची गंभीर दखल घेत त्या त्या विभागाचा निधी वाढवा, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत यासाठी लागणार्या निधीचे तात्काळ सुयोजन करा, यासह जिल्ह्यातल्या अन्य विकास कामांबाबत आढावा घेत पालकमंत्री राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी 2023-24 चा निधी शंभर टक्के खर्च करण्यासाठी तातडीने निर्णय घ्या, शासनाच्या प्रत्येक रुपयाचा फायदा इथल्या सामान्य माणसाला मिळावा यासाठी अधिकचे प्रयत्न करा, अशा सूचना दिल्या.
जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक आज राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, खा. प्रितम मुंडे, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, सीईओ अविनाश पाठक, अॅडीशनल एसपी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हाभरातील विकास कामांचा आढावा घेत 2023-24 चा निधी शंभर टक्के खर्च करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या. 2024-25 च्या आराखड्यात जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी यावा यासाठी गेल्या वर्षीचा निधी खर्च करणे अधिक महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले. 2024-25 मध्ये शाळा दुरुस्ती, वर्ग खोल्या बांधणे आदी कामांना अधिकचा निधी या आराखड्यामध्ये मागविण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या. त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती पाहता चारा आणि पाणी इत्यादी गोष्टींची कमतरता भासणार नाही, त्या दृष्टीने संबंधित विभागाचा निधी वाढवण्याच्या सूचना देत यावर्षी ऊसक्षेत्र कमी असल्याने स्थलांतरीत मजूर लवकर परत येणार त्या अनुषंगाने पाणी आणि रोजगाराबरोबर अन्न-धान्य या सगळ्याबाबत अधिकचा निधी व या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याबाबतची तयारी करावी, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी निधीचे सुयोजन करावे, असे म्हणत परळी व बीड येथील आगामी आर्थिक वर्षात महिला बचत गटांना बचतगट भवन उभारणी व तयार मालाला विक्रीसाठी मॉल उभा करण्यासाठी निधीचे नियोजन आणि परळीत जागा उपलब्ध यावर तात्काळ काम करावे, एकूणच शासनाच्या प्रत्येक रुपयाचा फायदा इथल्या सामान्य माणसाला मिळावा यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा सूचना देत बीड जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा ना. मुंडे घेत होते. दुपारी दीड वाजेपर्यंत बैठक सुरुच होती.