नगरपालिकेकडून वेळोवेळी दिशाभूल; नागरिकांत संताप
बीड (रिपोर्टर) नगरपालिकेकडून विकासाचा नुसताच बोलबाला केला जातोय. शहरातील अनेक प्रभागात रस्ते, नाल्याचा प्रश्न असून या नागरि सुविधा सोडवण्यास न.प.ला अपयश आले. पेठ बीड भागामध्ये रस्त्याचे प्रचंड प्रमाणात दुरावस्था आहे. रस्ते खराब असल्यामुळे वाहनधारकांना मणक्याचा त्रास जाणवून लागला. नगरपालिका रस्ते करण्याकडे का दुर्लक्ष करते? असा प्रश्न उपस्थित होत असून रस्त्यावर नुसताच धुराळा उडत असल्याने येणार्या न.प.निवडणूकीत या भागातील नागरिक नक्कीच मतदानातून आपला रोष व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही.
बीड नगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. प्रत्येक निवडणूकीच्या वेळी विकासाचे मोठमोठे दावे केले जातात. प्रत्यक्षात अनेक प्रभागात नाल्या आणि रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत आहे. काही ठिकाणी तर इतकी वाईट अवस्था आहे की पावसाळ्यात रस्त्याने चालणे मुश्कील होते. शहरातील एन.के.कॉलनी भागात काही दिवसापूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र नाल्या करण्यात आल्या नाही. पावसाळ्यात नाल्याअभावी रस्त्यावर पाणी जमा होते. अक्षरश: घरासमोर तळ्याचे स्वरूप निर्माण होत असल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वेळोवेळी मागणी करूनही न.प.प्रशासन नाल्या करत नसल्याने येथील नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान ज्या नगरसेवकाला या वार्डातून निवडून दिले ते नगरसेवकही विकासाच्या बाबतीत भ्र शब्द काढत नाहीत. दरम्यान पेठ बीड भागातील रस्त्याबाबत नुसतीच चर्चा होत आलेली आहे. मात्र रस्त्याचे काम पाच वर्षात नगरपालिकेला पूर्ण करता आले नाही. खराब रस्त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. येथील नागरिक नगरपालिकेच्या या अनागोंदी कारभाराला प्रचंड प्रमाणात वैतागले असून नागरिक निवडणूकीत आपला संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही.
चारवेळा नारळ फोडूनही कामाला सुरूवात झाली नाही
हिरालाल चौक भागामध्ये रस्ता अत्यंत खराब आहे. रस्ता नवीन करण्यासाठी नगरपालिकेने आतापर्यंत चारवेळा नारळ फोडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले. आताही काही दिवसापूर्वी कामाचा शुभारंभ होणार म्हणून नारळ फोडण्यात आले. आतातरी या कामाचा शुभारंभ होईल का? निवडणूकीच्या पूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणार का? नुसतेच आश्वासनावर बोळवण होणार? असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.