Wednesday, May 18, 2022
No menu items!
HomeUncategorizedफळांचा गोडवा वाढला जिल्ह्यात मोसंबी १६४, आंबा ८९, पेरू ९९ हेक्टरमध्ये

फळांचा गोडवा वाढला जिल्ह्यात मोसंबी १६४, आंबा ८९, पेरू ९९ हेक्टरमध्ये


मजीद शेख | बीड

बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा आणि आवर्षनग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात पूर्वी पारंपारिक पिके घेतली जात होती. मात्र या पारंपारिक पिकातून शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावत नसल्याने आता शेतकर्‍यांनी पिकामध्ये बराच बदल केला. सर्वात जास्त जिल्ह्यात दरवर्षी कापसाची लागवड होत असली तरी बहुतांश शेतकरी फळपिकाकडे वळले. गेल्या दहा वर्षामध्ये फळपिकाच्या लागवडीत मोठी वाढ झाली. गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगला पाऊस पडत असल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढले आणि याचा परिणाम चांगला दिसून आला. जिल्ह्यात आंबा, पेरू, मोसंबी, केळी इ. फळपिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. मोसंबी १६४ हेक्टरमध्ये असून केशर आंबा ८९ हेक्टरमध्ये आहे. तसेच ९९ हेक्टरमध्ये पेरूची लागवड झालेली आहे. फळपिकांची वाढती लागवड पाहता हे चित्र नक्कीच आशादायक आहे. शेतकर्‍यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी असे शासनाकडून आवाहन केले जात असतानाच शेतकरी बदलत असल्याचे दिसून येत आहे.


पारंपारिक शेती ही तोट्याची ठरते. शेतकर्‍यांनी आधुनिक शेती करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे असे नेहमीच केंद्र आणि राज्य सरकारकडून आवाहन केले जात असते. शेती करण्यासाठी प्रथम पाण्याची गरज असते. पाणी असेल तर शेती चांगली पिकते, पाणी नसेल तर निव्वळ निसर्गावर अवलंबून रहावे लागते. गेल्या तीन वर्षापासून मराठवाड्यावर निसर्गाची चांगलीच अवकृपा राहत आली. सलग तीन वर्ष चांगला पाऊस पडल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढले. शेतकर्‍यांनी फळपिके मोठ्या प्रमाणात लावली. बीड जिल्हा तसा आवर्षनग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मार्च महिन्यानंतर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी मारामार होत असते. मात्र चांगला पाऊस पडत राहिला तर शेतकर्‍यांना उन्हाळी पिकासह फळपिकांच्या लागवड करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. बीड जिल्ह्यात मोसंबी, आंबा, पेरू, सिताफळ, कागदी लिंबू, बोर यासह इतर फळपिकांची लागवड आहे. काही शेतकरी फळपिकातून दरवर्षी चांगले उत्पादन घेतात. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त कापसाची लागवड होत असते. त्यानंतर सोयाबीन व इतर पिकांची लागवड होते. मात्र पूर्वी फळपिकाची तितकी लागवड जिल्ह्यात होत नव्हती. आता फळपिकाच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने ही बदलाची नांदी म्हणावी लागेल.
मोसंबीने आर्थिक उत्पन्नात भर घातली


मोसंबी हे पिक पाणीदार भागामध्ये घेतले जात होते. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये मोसंबीची सर्वाधिक लागवड होत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी ही मोसंबी लागवडीकडे गेल्या तीन वर्षापासून वळले आहेत. काही शेतकर्‍यांनी तर दोन ते तीन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात मोसंबीची लागवड केली. दुष्काळी परिस्थितीत टँकर पाणी घालून मोसंब्याच्या झाडांची जोपासना करण्यात आली. ज्यांनी झाडांची चांगली जोपासना केली आज त्यांच्या मोसंबीच्या बागातून चांगले उत्पादन निघू लागले आहे. काही शेतकरी बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये मोसंबी विक्री करून हेक्टरी लाखो रूपयांचे उत्पादन काढत असल्याने त्या शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नात चांगलीच भर पडली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!