सतिष गायकवाड | कुक्कडगाव
बीड तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी फळपिकांसह भाजीपाला आणि फुलाची शेती सुरू केली. शेतीत वेगळ्या प्रयोगामुळे शेतकर्यांना फायदा होतो. त्यामुळे शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. जिल्ह्यात फुलांचे उत्पादन जास्त घेतले जात नाही. मात्र बोटावर मोजण्याइतके शेतकरी फुलाचे उत्पादन घेवून फुलांची बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांच्या मार्केटमध्ये विक्री करत असतात. बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील एका शेतकर्याने पाऊण एक्कर क्षेत्रात झेंडूची लागवड केली. या झेंडूपासून त्यांना सध्या उत्पन्न सुरू झाले. ते आपले फुल मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवत आहेत.
बीड तालुक्यातील शेतकरी पारंपारिक पिके घेत आली. तालुक्याचा बहुतांश परिसर हा डोंगराळ आहे. तर काही भाग सुपिक असला तरी त्या परिसरात सिंचनाचे तितके क्षेत्र नाही. शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी अर्ध्या ते पाऊण एक्करमध्ये हजारो रूपयाचे उत्पन्न घेणारे बहुतांश शेतकरी तालुक्यामध्ये आहेत. या शेतकर्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. बीडपासून काही अंतरावर असलेल्या उमरद खालसा येथील रोहिदास महादेव सालगुडे या शेतकर्याने नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊण एक्कर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड केली. लागवड झाल्यानंतर एक ते दिड महिन्यामध्ये उत्पादनाला सुरूवात झाली. त्यांनी आतापर्यंत निघालेले झेंडूची फुले मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवले आहेत. झेंडूला एकदा फुले येण्यास सुरवात झाल्यानंतर त्याला काही दिवस नेहमी फुलं येत असतात. सालगुडे यांनी झेंडूची लागवड करून आपल्या शेतीत आगळावेगळा प्रयोग केला आहे.