बीड (रिपोर्टर): पेटलेल्या आरक्षणाच्या मुद्यावरून बहुचर्चित असलेले समता परिषदेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांची आज दुपारी चारनंतर बीडच्या श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जाहीर सभा हाते असून या सभेत भुजबळ काय बालेणार याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. बीडमधील जाळपोळ प्रकरण अधिक तीव्रतेने लावून धरत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्या या भूमिकेत असलेले भुजबळ आज आरक्षणासह जरांगेंच्या आंदोलनावर काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे सुरक्षतेच्या कारणावरून बीड पोलिसांनी काही मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्या या भूमिकेत समता परिषदेचे छगन भुजबळ आहेत. या दोन्ही समाजाच्या नेत्यात टोकाचे वक्तव्य होताना दिसून येत आहे. बीडमधील जाळपोळ प्रकरण ना. भुजबळांनी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर लावून धरले होते. त्यानंतर ते प्रथमच बीडमध्ये जाहीर सभा घेत आहेत. आज सायंकाळी 4 नंतर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर भुजबळांची सभा होत आहे. सभेची जय्यत तयारी झाली असून या सभेसाठी सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट करण्यात आली आहे. एक एसपी, तीन डिवायएसपी, बारा पोलीस निरीक्षक, चाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षक, 300 पोलीस, 500 महिला पोलीस, पाच आरसीपीच्या तुकड्या बंदोबस्तासाठी असणार असून पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव येण्याची शक्यता आहे. या जाहीर एल्गार सभेतून छगन भुजबळ नेमके काय बोलणार, काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे.