बीड (रिपोर्टर) गेवराई येथील जिल्हा परिषद कन्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जवंजाळ यांनी आपल्या शाळेतीलच दोन शिक्षिकांचे आठ लाख रुपये परस्पर उचलले होते. सोबतच समग्र शिक्षा अभियानांतर्गत आलेला नऊ लाखांचा निधीही कोणतेही काम न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी, गेवराई आणि जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी दोन स्वतंत्र चौकशी समितींमार्फत जवंजाळ यांची चौकशी केल्यानंतर अखेर त्यांना सेवेतून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबीत केलेले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी या शाळेतील दोन महिला शिक्षिका यांचे जीपीएफचे पैसे जवंजाळ यांनी परस्पर बनावट कागदपत्रांआधारे उचलले होते. या शिक्षिकांना ही बाब माहित झाल्यानंतर त्यांनी रितसर तक्रार शिक्षण विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने अगोदर गट शिक्षणाधिकारी गेवराई यांच्यामार्फत त्यांची स्वतंत्र चौकशी केली. त्यानंतर समग्र शिक्षण विभागांतर्गत कन्या शाळेच्या इमारत डागडुजी आणि इतर शाळा परिसर विकासासाठी आलेला निधीही जवंजाळ यांनी काम न करताच हाडप केल्याची बाब समोर आली. याचीही चौकशी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केली. दोन्ही चौकशी मुख्याध्यापक जवंजाळ हे दोषी असल्याचे दिसून आल्यानंतर शिक्षण विभागामार्फत गेल्या चार दिवसांपुर्वीच त्यांना सेवेतून निलंबीत करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.