Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeसंपादकीयरोखठोक- स्वबळाचा नारा, निकालात पसारा अन एकसंघातले ढोंग

रोखठोक- स्वबळाचा नारा, निकालात पसारा अन एकसंघातले ढोंग

निवडणूक कुठलीही असो, मुंडे बंधू भगिनींच्या यश अपयशाचा निकाल याच निवडणूकीतून लागतो. काल पाच नगरपंचायतींच्या निवडणूकीचा निकाल लागला. अन या निकालात पुन्हा मुंडे बंधू भगिनींच्या यश अपयशाचे वर्गीकरण सुरू झाले. भलेही मुंडे बंधू भगिनी ज्या विधानसभा मतदार संघातून येतात त्या मतदार संघात या निवडणूका नसल्या तरी राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व करत असल्याने या निवडणूकीच्या जय पराजयाचे दायित्व हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या पदरी पडते. कालच्या नगरपंचायत निवडणूकीमध्ये आष्टी पाटोदा शिरूर या तीन नगरपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्या. तर भाजपाच्या ताब्यात असलेली वडवणी नगरपंचायत ही राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात खेचून आणली. केजमध्ये भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स पहायला मिळाला नाही परंतू राष्ट्रवादीने त्याठिकाणी बर्‍यापैकी फाईट दिली. हे साधे आणि सोपे चित्र कालच्या निकालातून समोर आले. मुंडे बंधू भगिनी या निवडणूकीसाठी जाहिर सभा घेतल्या असल्या तरी स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून मतदारांनी केलेले मतदान आणि त्यातून आलेला निकाल हा स्थानिक नेतृत्वाच्या जय पराजयाचा असून त्यांचे कतृत्व हे त्यांच्या पदरी मांडता येते. परंतू या निवडणूकीत राष्ट्रवादीला आलेले अपयश हे झाकता येत नसले तरी मित्र पक्षाच्या स्वबळ हट्टापायी निकालातून काँग्रेसचा जो पसारा झाला तो उभ्या जिल्ह्याने पाहिला. या निकालानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष एकसंघ असल्याचा जो दावा केला तो निव्वळ हास्यास्पद म्हणावा लागेल. कारण भाजप एकसंघ असते तर वडवणीत माजी आ.केशव आंधळे राष्ट्रवादीच्या सोबत गेले नसते. केजमध्ये विद्यमान आमदार असताना भाजपाला पॅनल टाकता असता.

पाटोद्यात पंकजाताई, सुरेश धस यांचे समर्थक म्हणून निवडणूक लढवली गेली नसती, स्वतंत्र नेतृत्वाची जी भूमिका राष्ट्रवादीची आहे तीच भूमिका भाजपाच्या तालुका पातळीवरील नेत्यांचीही असल्याचे पून्हा एकदा या निवडणूकीतून स्पष्ट झाले. तालुकास्तरीय नेता हा स्वबळाचा नारा देत गेला आणि काहींचा निकालातून पसारा पहावयाला मिळाला. दिल्लीचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या पाटील दाम्पत्यांना आपली गल्लीही सांभाळता आली नसल्याचे या निकालातून जेव्हा समोर येते तेव्हा मुंडे बंधू भगिनींच्या दावित्वाचा भागाकार करणे भाग पाडते. राज्याच्य राजकारणामध्ये बीडच्या राजकारणाला आणि राजकारण्यांना अनन्य साधारण महत्व आहे. राज्यात जेव्हा केव्हा चांगल्या वाईट घडामोडी घडून येतात तेव्हा त्या घडामोडींमध्ये बीडचा कुठे ना कुठे संबंध असतो. राजकारणातले थोरले घर म्हणून त्या क्षीरसागर घराकडे आपण पाहतो त्या क्षीरसागरांपासून स्व.मुंडे, पंडित, आडसकर, सोळंके हे राजकारणातले मातब्बर राज्याच्या राजकीय सारीपाटावर नेहमीच खेळताना दिसून येतात. त्या पाठोपाठ धसांचे नेतृत्वही या दोन दशकामध्ये राज्याच्या राजकारणात छाप टाकून आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही निवडणूकीत मुंडे बंधू भगिनींचे दायित्व पणाला लावण्याचे धोरण बीडपासून राज्याच्या राजकारणात होतं त्यावर काहीसे भाष्य व्हायला हवे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार म्हणून पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याचे नेतृत्व सुरू केले. धनंजय मुंडे जेव्हा मुंडेंपासून वेगळे झाले आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणूकीत आपले अस्तित्व दाखवून राज्याचे नेतृत्व करताना विरोधीपक्षनेते पद गाजवले तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाची झळाळीही उभ्या महाराष्ट्राने पाहिली. त्यामुळे ग्रामपंचायत वा नगरपंचायत, या निवडणूकीच्या यश अपयशाचे मानकरी हे मुंडे बंधू भगिनीच ठरतात. काल आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, केज या नगरपंचायत निवडणूकीचा निकाल हाती आल्यानंतर राज्यपातळीवर मुंडे बंधू भगिनींचे यश अपयशाचे बेरीज वजाबाकीचे गणित महाराष्ट्रात दाखवले गेले. परंतू या दोघांच्या मतदार संघात या निवडणूका नव्हत्या. हे सत्य स्विकारताना आणि त्या निवडणूकातले बाजीगर स्थानिक नेतृत्वच होते हे सांगताना पक्षीय आणि मित्र पक्षातले वांदे या दोन्ही नेत्यांच्या कशे अंगलट आले हे ही या निवडणूकीतून दिसून आले. या निकालाने दोन्ही नेत्यांना स्थानिक नेतृत्व बलशाली अथवा शक्तीहीन असू शकते हे ही यातून उमजले. त्यामुळे आगामी अन्य निवडणूकात त्यांना कुशल राजकारण करता येईल. ना.मुंडेंनी मित्र पक्षासोबत या निवडणूका लढवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र दिल्लीचे तख्त सांभाळतो या अविर्भावात असलेल्या पाटील दाम्पत्यांनी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याचे धोरण न आखता स्वबळाचा नारा दिला. एकतर बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा औषधाला सापडत नसताना आणि केवळ केज नगरपंचायतीत एकमेव सत्ता असताना पाटील दाम्पत्याला खरेतर मित्र पक्षासोबत हि निवडणूक लढवायला हवी होती. परंतू त्याठिकाणी स्वबळाचा नारा देत स्वत:हून निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर केजच्या नागरिकांनी दिल्लीचे तख्त राखतो म्हणणार्‍या पाटील दाम्पत्यांचे पूर्णत: गर्वहरण केले आणि केवळ तीन जागांवर यश मिळवून दाम्पत्यांनी आपली इभ्रत गल्लीला तर दाखवलीच, दिल्लीलाही दाखवावी लागली. या उलट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात लढलेली निवडणूक ही पाच जागा यश घेवून लढता आली असली तरी दस्तुरखुद्द बजरंग सोनवणेंच्या मुलीचा पराभव सोनवणेंच्या नेतृत्वावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण करते. याचठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रीत लढली असती तर केजचा निकाल वेगळा काही दिसून आला असता परंतू केजमध्ये पाटील दाम्पत्यांचा स्वबळाचा होरा ‘आ बैल मुझे मार’सारखा निघाला. आणि दिल्लीच्या नेत्यांना आपण गल्लीचे नेतेही आहोत की नाही याचे आत्मपरिक्षण करावयास लावले. जे केजमध्ये झाले या उलट आष्टीतला जो ‘धस’का बीड जिल्ह्यातल्या जनतेनेच नव्हे तर राज्यातल्या स्वपक्षीय आणि विरोधी पक्षांना बसला तो गृहीतच म्हणावा लागेल. विधानपरिषदेचे आमदार सुरेश धसांच्या नेतृत्वात आष्टी पाटोदा शिरूर या तीन नगरपंचायतीच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये एकतर्फी भाजपाचे बहुमतातले उमेदवार निवडून आले आणि तीनही ठिकाणी सुरेश धस यांचा दबदबा कायम राहिला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना आपल्या होमपिचवर पराभव स्विकारावा लागला. हा पराभव स्विकारताना राष्ट्रवादीने सुरेश धसांचे नेतृत्व हे बलशाली असल्याचे कबूल केलेच असेल परंतू आजबे, शेख यांनी या निवडणूकीच्या निकालातून आत्मचिंतीत होणे निश्‍चित गरजेचे आहे. इथेही शिरूर नगरपंचायतीची निवडणूक पाहिली तर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांनी इथे महाविकास आघाडीसोबत जाणे पसंत केले असते अन राष्ट्रवादी शिवसेना एकत्रीत लढली असती तर नक्कीच निकाल वेगळा पहावयास मिळाला असता. परंतू याठिकाणी शिवसेनेला पूर्ण 17 उमेदवार मिळाले नाहीत, केवळ 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरून 2 जागांवर समाधान माननार्‍या शिवसेनेलाही स्वबळाचा नारा अंगलट आला. आष्टीमध्ये एकतर्फी धसांचे वर्चस्व कायम पहायला मिळाले ते धसांच्या कार्यप्रणालीमुळे, पाटोद्यात विविध अंगाचे भाजप पहायला मिळाले. इथे पंकजाताई समर्थकांचे वेगळे, धसांचे वेगळे, भिमराव धोंडेंचे वेगळे उमेदवार होते. परंतू एक छत्रीखाली त्यांना आणण्याचे काम धसांनी केले आणि त्यातून भाजपासाठी पाटोद्यातून सत्ता मिळवली. हे कौतुकास्पदच आणि या तीन्ही निवडणूकीतले निकाल हे राष्ट्रीय नेत्यांच्या कतृत्वाचे अथवा पक्षाच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे नक्कीच नाहीत ते केवळ आ.सुरेश धस यांच्या कार्यप्रणालीचे यश आहे. हे उमजून घ्यावाच लागेल. भाजप एकसंघ मग हे ढोंग वडवणी,केज, पाटोद्यात का पहायला मिळाले? पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यात केवळ भाजप हाच एकसंघ असल्याचा दावा केला. तो दावा कितपत बंद्या नाण्याइतका खणखणीत आहे. याचे उदाहरण आपल्याला वडवणीत पहायला मिळाले. राजाभाऊ मुंडे यांच्या सोबत निवडणूक न लढवता स्व.मुंडेंचे खंदे समर्थक असलेले माजी आ.केशवराव आंधळे यांनी हीच निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासोबत लढवून वडवणीत भाजपाची असलेली सत्ता ही हिसकावून घेतली. मग कुठय एकसंघ भाजप? केज मतदार संघामध्ये भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा असताना रमेश आडसकरांसारखा भाजपाचा नेता असताना या ठिकाणी भाजपाच्या तिकीटावर लढणारा एकही माणूस केज नगरपंचायतीमध्ये नसू नये हे एकसंघ भाजपाचे लक्षण आहे का? पाटोद्यामध्ये स्वतंत्र सुरेश धस यांच्या विचाराचे पाच उमेदवार उभे राहतात हे एकसंघ नेतृत्वाचे लक्षण आहे का? इथे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष यांच्यातले इदुष्ट उभ्या जिल्हयाने पाहिले आहे. तरीही भाजप एकसंघ असल्याचा दावा करणं हास्यास्पद नव्हे काय? असे कित्येक एकसंघ नसल्याचे पुरावे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला सांगता येतील. असो, भाजपाच्या एकसंघ असलेल्या ढोंगाचे इथे पोस्टमार्टम करायचे नाही. विषय एवढाच आहे, नगरपंचायत निवडणूकीने पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी पक्षीय सिम्बॉलपेक्षा स्थानिक नेतृत्वाच्या कर्मकतृत्वाला नागरिकांनी महत्व दिल्याचे समोर आले आहे. इथे मुंडे बंधू भगिनींच्या यश अपयशाचे बेरीज वजाबाकी करता येणार नाही. तर इथे स्थानिक नेतृत्वाच्या कतृत्वाचा हिशोब मात्र नक्कीच मांडता येईल आणि त्या कतृत्वाच्या हिशोबाला केवळ आणि केवळ सुरेश धस हे शंभर टक्के सोनं म्हणून समोर आलं असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सुरेश धसांचे हे यश भारतीय जनता पार्टीच्या देशपातळीवर नेतृत्वाला प्रमाणपत्र देण्यासाठी सर्वाधिक आहे. आधीच धसांना भाजपाच्या अन्य नेतृत्वाकडून अनेकवेळा अनेकप्रकारची रसद मिळत आली आणि त्या रसदीच्या बळावर धसांनी आपलं कतृत्व सिध्द केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!