गेवराई (रिपोर्टर) चकलांबा परिसरातील चंदन चोरी करून ते एका गोडाऊनमध्ये छाटत असताना रात्री पंकज कुमावत यांनी छापा टाकून १७ चंदन तस्करांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून ३२८ किलो चंदनासह चार मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल असा एकूण ९ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पहाटे तीन वाजता चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उक्कडपिंप्री येथे करण्यात आली.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. रोज वाळुचा अवैध उपसा आणि त्याची वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोरून होते मात्र हप्ते बांधून बसलेले चकलांबा पोलीस याकडे डोळेझाक करतात. आता तर या परिसरात चंदन तस्करांचीही टोळी सक्रिय असल्याचे रात्रीच्या कारवाईवरून उघड झाली. काल पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी चकलांबा परिसरात चंदनाची तस्करी होत असून एका पत्र्याच्या शेडमध्ये ते चंदन ठेवले असून त्याची छाटणी सुरू असल्याचे त्यांना कळाल्यानंतर याची माहिती त्यांनी सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना दिली. त्या माहितीवरून स्वत: पंकज कुमावत आणि त्यांच्या पथकाने पहाटे तीन वाजता उक्कडपिंप्री येथे छापा टाकला असता एका पत्र्याच्या शेडमध्ये १७ चंदन तस्कर चंदन छाटत असताना मिळून आले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेत तेथील ३२८ किलो चंदन जप्त केले. त्या चंदनाची किंमत ७ लाख ८७ हजार रुपये आहे. या वेळी त्याठिकाणी ४ मोटारसायकल, मोबाईल आणि इतर असा ९ लाख ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. चंदन तस्करांमध्ये विष्णू बांगर हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह इतर सोळा जणांवर चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी सुरू होती. सदरील कारवाई सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, एपीआय संतोष मिसळे, पोलीस हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, महादेव सातपुते, संजय टुले, इनामदार यांच्यासह आदींनी केली.
अवैध धंद्यांकडे चकलांबा पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. चकलांबासह परिसरात मोठमोठे क्लब, जुगार अड्डे सुरू आहेत. या जुगार अड्ड्यांची माहिती बिट अंमलदारापासून ठाणेप्रमुखांपर्यंत सर्वांना आहे, तरी देखील याकडे दुर्लक्ष केले जाते. परिसरातील अवैध धंद्यांची तक्रार अनेक वेळा नागरिकांनी येथील ठाणेप्रमुखांकडे केलेली आहे मात्र याकडे ते अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. आता नागरिक आपल्या तक्रारी थेट कुमावतांकडे करताना दिसतात. जे कुमावतांना दिसतं ते चकलांबा पोलिसांना का दिसत नाही? असाही प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.