Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeशेतीऊसाचे क्षेत्र वाढले, संपूर्ण गाळप होईल का?

ऊसाचे क्षेत्र वाढले, संपूर्ण गाळप होईल का?


बीड : बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या दोन वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले. यंदा सर्व ऊसाचे गाळप होईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कालावधी संपल्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या ऊसाने तुरा टाकला. तरीही त्यांच्या ऊसाची तोड झाली नाही. ऊस घेवून जा अशी विनवणी करण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकर्‍यावर आली. बीड जिल्ह्यात जवळपास ३४ हजार हेक्टरमध्ये ऊसाची लागवड झाली आहे. सर्व ऊसाचे गाळप व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
गेल्या तीन वर्षापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगला पाऊस पडत असल्याने सिंचन वाढले. जिल्हा ऊसतोड मजुरांचा असला तरी ऊसाचे क्षेत्र दोन वर्षापासून वाढल्याने यंदा ऊस गाळपाचा प्रश्‍न निर्माण झाला. गेल्या वर्षी सर्व शेतकर्‍यांच्या ऊसाचे गाळप झाले होते. यंदा ऊस उत्पादकात धास्ती निर्माण झाली. बहुतांश शेतकर्‍यांच्या ऊसाने तुरा टाकला. तुरा टाकण्याआधी ऊसाची तोड व्हायला हवी पण ती झाली नाही. लवकर ऊस तोडला नाही तर ऊसाचे वजन घटून त्याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसतो. जिल्ह्यात जवळपास ३४ हजार हेक्टरमध्ये ऊसाची लागवड झालेली आहे. गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी अतिरिक्त ऊसाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. काही शेतकर्‍यांनी ऊस जात नसल्याचे पाहून ऊसाच्या फडाला आग लावून शासनाचा निषेध केला होता. तर काही शेतकर्‍यांनी ऊस तोडून बांधावर फेकून दिला होता. यंदा अशी काही परिस्थिती निर्माण होवू नये याची दक्षता आतापासून जिल्हा प्रशासनाने घेवून जिल्ह्यात एकाही शेतकर्‍याचा ऊस गाळपाविना राहू नये याची काळजी घ्यायला हवी नसता ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर आत्महत्याची वेळ येईल.

ऊस गाळप झाला नाहीतर त्याची नुकसाान भरपाई मिळू शकते-आपेट
बीड जिल्ह्यातील सर्व सहकारी कारखाने सुरू असते तर आज ऊसाचा अतिरिक्त प्रश्‍न निर्माण झाला नसता. ऊस संपूर्णपणे गाळप होवू शकतो, जर झाला नाही तर शेतकर्‍यांनी मंत्र्यांच्या दारासमोर बसायला हवे. सहकार कायद्यानुसार एखाद्या शेतकर्‍याचा जर ऊस गाळप झाला नाही तर त्या शेतकर्‍याला १९९९ च्या कायद्यानुसार नुकसानभरपाई मिळू शकते. असे शेतकरी नेते कालिदास आपेट यांनी म्हटले आहे.

कारखान्यांनी बाहेरचा
ऊस आणू नये

अतिरिक्त ऊसाचा प्रश्‍न निर्माण झाला असला तरी बीड जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांनी आपल्या हद्दीतील ऊसाचे आधी गाळप केले तर नक्कीच अतिरिक्त ऊसाचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. माजलगाव तालुक्यातील कारखानदार बाहेरून ऊस आणु लागले. जय महेश कारखाना सर्रासपणे बाहेरचा ऊस आणत असल्याने इथल्या शेतकर्‍याचे नुकसान होवू लागले. याबाबत साखर आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे नसता शेतकर्‍यासमोर मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

बीड तालुक्यात अडीच हजार क्षेत्रात ऊस
बीड तालुक्यामध्ये कापूस, सोयाबीन या पिकाची जास्त प्रमाणात लागवड होते. पाऊस चांगला झाल्यामुळे दोन वर्षापासून बीड तालुक्यातही ऊसाची लागवड झाली. सध्या अडीच हजार हेक्टरमध्ये ऊस आहे. तालुक्यात एकही सहकारी साखर कारखाना नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना इतर तालुक्यातल्या कारखान्यांना ऊस पाठवावा लागतो. काही शेतकर्‍यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्याकडे नोंद केली तर काही शेतकरी इतर जिल्ह्यातील कारखान्याकडेही ऊस पाठवत आहे. यंदा तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकर्‍यांची चांगलीच फरफट होणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासनाने जबाबदारी घ्यावी
ऊसाचा प्रश्‍न निर्माण झाला असला तरी त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. जिल्ह्यात ऊसाचे गाळप किती होवू शकते? याचे नियोजन करत ऊस जर अतिरिक्त ठरत असेल तर तो ऊस इतर कारखान्याकडे पाठवण्याचे नियोजन जिल्ह्याच्या प्रशासनाने करायला हवे. जेणेकरून ऊस अतिरिक्त ठरणार नाही असे उध्दव घोडके यांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!