Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- वेदांचा तो अर्थ आम्हांसी ठावा म्हणू द्यायचंय की नाही

अग्रलेख- वेदांचा तो अर्थ आम्हांसी ठावा म्हणू द्यायचंय की नाहीगणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

भुगोला बरोबर इतिहास असलेल्या अखंड हिंदुस्तानात हजारो वर्ष वर्ण व्यवस्थेच्या जोखडात आमची ज्ञानगंगा तथाकथित कर्मठांनी कोंडून ठेवली. मुठभर लोकांना वाचण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार, बाकी सर्व बेकार या भूमिकेत शेकडो हजारो वर्ष कित्येक पिढ्या वाघिनीच्या दुधाला वंचित राहिल्या. मनगट आणि मस्तक चुस्त आणि दुरुस्त असताना वर्णव्यवस्थेतील क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र म्हणून ज्यांची गणना केली गेली त्यांना शिक्षण घेण्याचा तेव्हा अधिकार नव्हता. या तीन वर्णातील कुठल्याही व्यक्तीने शिक्षण घेतले अथवा वेद पठण केले तर धर्म बाटल्याची बोंब ठोकली जायची. तथाकथीत धर्म मार्तंडांच्या अप्पलपोटी भूमिकेमुळे हिंदुस्तानच्या मातीचे आणि त्यात निपजणार्‍या कित्येक पिढ्यांचे जे नुकसान झाले, त्याची गोळाबेरीज करणे कठीण आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञान युगाच्या काळात त्या वर्णव्यवस्थेतील परंपरेचा विचार केला आणि इतर देशांशी तुलना केली तर आपली हानीच झाल्याचे निश्‍चितपणे समोर येते. इथल्या पिढ्या किती बरबाद झाल्या, त्याचा लेखाजोखा मांडता येतो. आश्‍चर्य याचे वाटते, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यानंतरही त्याकाळी याच वर्णव्यवस्थेतल्या लोकांनी जे लिहिले, जे मांडले तेच धर्म मार्तंडांनी आपल्या पोटपुजेचे साधन बनवले. क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांच्या वेद पठणाने आणि शिक्षण घेण्याने धर्म बाटत असेल तर मग सर्वांना पवित्र वाटणारा गायित्री मंत्र हा क्षत्रियांनी लिहिलेला आहे. विश्‍वमित्र ऋषींनी तो मंत्र निर्माण केला आहे जे जन्माने क्षत्रिय होते, तपस्या करून ते ऋषी पदावर गेले होते तेव्हा धर्म का बाटला गेला नाही. महाभारतकाळ आणि सर्व वेदांचे वर्गीकरण करणारे ऋषी व्यास यांचे वडल पराशर ऋषी आणि आई कोळीराजाची मुलगी होती. हे वर्ण व्यवस्थेच्या खालच्या फळीचे होते. रामायणकर्ते वाल्मिक हे कोळी होते हे उदाहरण आम्ही एवढ्यासाठी देतोय, धर्माच्या आड या देशातल्या कित्येक पिढ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याने जगाच्या पाठीवर अखंड हिंदुस्तानाची जी हानी झाली ती भरून येणारी नाही. तत्पूर्वी भगवान गौतम बुद्धांनी शिक्षणाबाबत आणि उच-निच-जात,पात, भेद-भावांना बौद्ध धर्मात थारा दिला नाही आणि शिक्षण हे सर्वांचे अधिकार असल्याचे सांगितले. १६ व्या शतकात जगद्गुरू संत तुकोबांनी ‘वेदाचा अर्थ आम्हाशी ठावा, इतरांनी भारावा माथा’ म्हणत तथाकथीत धर्म मार्तंडांना आव्हान दिले. त्यांच्या शब्दाचे रत्न आणि शस्त्र असणार्‍या गाथेला जलदिव्याची शिक्षा दिली मात्र तुकोबांनी ‘आम्हा घरी शब्दाची रत्ने’ म्हणत शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. पुढे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले, शाहू महाराज यांच्यासह कित्येक समाजसुधारकांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. तेव्हा कुठं आज आम्हाला वर्णव्यवस्थेतल्या तथाकथीत बुद्धीजीवींना आव्हान देता येतं. हे आव्हान देण्यासाठी कित्येक पिढ्यांना अशिक्षित होऊन खपावं लागलं हेही तेवढच खरं. आज पुन्हा आमच्या सृजनशील
मनगट आणि मस्तकाला
दाबण्याचा प्रयत्न

केला जातोय का? हा सवाल आजच्या युगातील आणि लोकशाहीतल्या देशाच्या सरकारला विचारावासा वाटतो. गेल्या तीन वर्षांपासून अखंड भारतासह महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात केवळ कोरोना महामारीचे कारण पुढे करत आमची शिक्षणाची गंगा जी बंद पडली आहे त्यातून भविष्याचे नुकसान दिसून येते. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर मार्चमध्ये शाळा बंद करण्यात आल्या. त्यानंतरचे शैक्षणिक वर्ष (२०२०-२१) ऑनलाईनच सुरू झाले. वर्षभरात त्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसर्‍या लाटेने पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अनेक भागांत अवलंबावा लागला. गेल्या वर्षीही दुसर्‍या सत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी मुंबई, पुण्यासह अनेक भागांत शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. हे शैक्षणिक वर्षही (२०२१-२२) ऑनलाईन सुरू झाले. मात्र त्यानंतर शासनाने जुलैमध्ये परवानगी दिल्यानंतर ग्रामीण भागांतील काही शाळा सुरू झाल्या. मुंबईतील शाळा त्यावेळीही सुरू करता आल्या नाहीत. त्यातही माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे वर्ग म्हणजे नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. प्राथमिकचे वर्ग बंद सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतर लगेच दिवाळीची सुट्टी लागली. दिवाळीनंतर माध्यमिकचे वर्ग सुरू झाले आणि डिसेंबरपासून पहिलीपासून सर्व वर्ग प्रत्यक्ष भरवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, त्यानंतर अनेक भागांतील रुग्णसंख्या वाढू लागली होती. मुंबईतून तिसर्‍या लाटेची सुरुवात झाली होती. झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या पाहून पुन्हा एकदा प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन बंद करण्यात आले. या शिक्षण नसलेल्या पिढ्या भविष्यात जगासोबत ज्ञानिक, बौद्धीक स्पर्धा करू शकणार आहेत का? हा सवाल आता करावा लागणार आहे. नक्कीच
कोरोना महामारी

जातीय व्यवस्थेतले शस्त्र नाही, धर्म मार्तंडांचा डाव नाही, किंवा वर्ण व्यवस्थेतील एखाद दुसर्‍या वर्ण जातीतल्या लोकांना शिक्षण दिले जाते, असेही नाही. महामारी ही महामारीच आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. जो देश कित्येक वर्ष शिक्षणापासून दूर असताना ज्या देशातला माणूस शिक्षणापासून वंचित असताना, कुठलेही विद्यापीठ नसताना ज्ञानेश्‍वरांसारखे, तुकोबांसारखे जिते जागते विद्यापीठ जिथे जन्माला आले त्या महाराष्ट्राने कोरोनासारख्या परिस्थितीशी लढताना, त्याच्याशी दोन हात करताना जो लढा उभारला तो नक्कीच कौतुकास्पद म्हणू. मात्र जेव्हा ही लढाई प्रदीर्घ सुरू राहते. तेव्हा ही लढाई लढताना रसद येणे गरजेचे असते. मात्र गेल्या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ज्ञानार्जन बंद पडले आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, देशाच्या भावी पिढीसाठी जी प्रमुख रसद हवी आहे तीच बंद पडली, मग भविष्याशी लढताना आमची पिढी दोन हात कशी करेल? याचा विचार शिक्षण क्षेत्र बंद ठेवू पाहणार्‍या शासन-प्रशासन व्यवस्थेने नक्कीच करायला हवा. तथा कथीत धर्म मार्तंडांच्या वर्ण व्यवस्थेने हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पातक केले. धार्मिक बंदुका मस्तकाला लावून धार्मिक दहशतवाद तेव्हा पोसला गेला. आता
कोरोनाच्या
दहशतवादापुढे

आजच्या व्यवस्थेने झुकणे बंद करायला हवे, अखंड जगामध्ये कोरोनाला मारक अशी लस हिंदुस्तान बनवत असेल, भारताचे शास्त्रज्ञ आणि भारतीय आरोग्य विभाग त्याच्याशी दोन हात करत असेल तर अशा वेळी शासन-प्रशासन व्यवस्थेने आव्हान स्वीकारत ज्ञानार्जनाचे दारे उघडे करायला हवे, स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही आमची शिक्षण व्यवस्था दुबळी असेल, एखादा महारोग आला म्हणून अख्ख्या पिढीचे भविष्य धोक्यात जात असेल तर हे दुर्दैव नव्हे तर व्यवस्थेतला षंडपणा म्हणावा लागेल पंच्याहत्तर वर्षांमध्ये आम्ही अशी शिक्षण व्यवस्था तयार करू शकलो नाहीत, की ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे मन-मनगट आणि मस्तक आबाधित ठेवू शकूत. वर्ण व्यवस्थेने आमच्या बापजाद्यांची शिक्षणाची मुस्कटदाबी केली. धर्म मार्तंडांच्या तथाकथीत ‘धर्म बाटला हो…’च्या आवईने आमच्या कित्येक पिढ्या बरबाद झाल्या. धार्मिक दहशतवाद्याने आमचे बौद्धीक अस्तित्व अंधारमय होत राहिले आणि आजच्या परिस्थितीमध्ये कोरोनासारख्या महामारीच्या आडून आमच्या पिढीचे बौद्धीक अस्तित्व अस्ताला जातय, हे व्यवस्थेने लक्षात घेऊन कोरोनाचं आव्हान स्वीकारत काय करायचं ते करून राज्यातली शिक्षण व्यवस्था सुरळीत ठेवायला हवी. आजच्या पिढीचा बुद्ध्यांक घटला तर पुढचे पन्नास वर्षे त्याचे तोटे या राज्याला आणि या देशाला सहन करावे लागतील आणि तेव्हा ती पिढी आणि येणारी पिढी आजच्या व्यवस्थेला माफ करणार नाही, त्यामुळे आम्हाला वेदाचा अर्थ तो ‘आम्हीशी ठावा’, हे ठणकावून सांगण्यासाठी व्यवस्थेने शिक्षण व्यवस्था सुरू ठेवुन बळ द्यावं, एवढीच अपेक्षा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!