महामंडळाच्या योजना सुरू होण्यासाठी
राज्यव्यापी आंदोलन करणार -चांदणे
बीड (रिपोर्टर) युती शासनाच्या काळापासून सामाजिक न्याय विभागांतर्गत मातंग समाज आणि इतर पोट जातींसाठी असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजना बंद आहेत. एनएफडीसी अंतर्गत गेल्या सात वर्षांपासून एकही योजना चालू नाही.
त्याचा निषेध म्हणून डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्रभर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कार्यालयांना कुलूप ठोकण्याचे आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आज बीड येथील अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.
मातंग समाज आणि त्यांच्या पोटजातीतील व्यक्तींचा आर्थिक विकास व्हावा, या महामंडळा अंतर्गत बिज भांडवल योजना, बँक सहाय्य करणार्या योजना आणि एनएफडीसीच्या योजना अशा तीन योजना राबविल्या जातात. बँकेची नाममात्र योजना सोडता इतर सर्व योजना बंद असल्यामुळे मातंग समाजाची दिशाभूल करण्याचे काम राज्य सरकारकडून होत आहे. तसेच कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अगोदरच युवकांना रोजगार नाही, त्यामुळे महामंडळाच्या वतीने गेल्या सात वर्षांपुर्वी लाभार्थ्यांना दिलेले कर्ज माफ करावे व महामंडळ तात्काळ सुरू करावे, महामंडळास एक हजार कोटींची तरतूद करावी, महामंडळास अध्यक्ष नियुक्त करावा या व इतर मागण्यांसाठी आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महामंडळाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आला. या वेळी डीपीआयचे सुभाष लोणके, सुनिल पाटोळे सह आनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.