बिंदुसरा पात्रावरील बंधार्याचे सर्वेक्षण सुरू; आ. संदीप क्षीरसागरांनी दिलेला शब्द पाळला
उपस्थित नागरिकांकडून आमदाराचा जयघोष,पुलाच्या उभारणीनंतर बीडकरांना मोठा फायदा
बीड (रिपोर्टर) शहराच्या पाणी पातळीसह लोकांच्या रहदारीस यथायोग्य गरज असलेल्या बिंदुसरा नदी पात्रावरील बंधारा कम पुलाचे आज प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू झाले. आ. संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हे सर्वेक्षण झाले असून या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांसह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळातील अधिकारी, जलसंपदा विभागातील अधिकारी व परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. या भागातील जनतेची नदी पात्र ओलांडण्याची सर्वात मोठी अडचण या पुलामुळे दूर होणार आहे. या पुलासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रस्तावातील बारीक-सारीक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर या कामाला अंतिम स्वरुप येण्यात यश आल्याने या भागातील जनता आ. क्षीरसागरांच्या कर्तव्य कर्माचे स्वागत करत आहेत.
बीड शहरातील बिंदूसरा नदी पात्रात बंधाराकम पुल बांधण्यात यावा ही मागणी घेवून आ.संदिप भैय्या क्षीरसागर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अनेक वेळा भेटले. पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडेंचेही यांच्या माध्यमातूनही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या बिंदूसरा प्रस्तावाबाबत बारीक-सारीक त्रुटींची पुर्तता करत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून विशेेष बाब म्हणून या प्रकल्पास मंजुरी आणली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद अंतर्गत शासनास सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावास शासनस्तरावरून शासनपत्र क्र.संकिर्ण २०२१/१८४/२१ भाग १ जसंअ दि.१०.११.२०२१ अन्वये बीड शहरासाठी पाणी पुरवठा करण्याकरिता बिंदूसरा निम्न पातळी बंधार्यासाठी ०.३५ दलघमी पाणी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. त्यानुसार मुख्य अभियंत, जलसंपदा विभाग औरंगाबाद यांनी पत्र क्र.ताशा बिंदूसरा निम्न पातळी बंधारा २४७ अन्वये प्रकल्पाच्या सर्वेक्षण व अनुशेष करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली असून विभागीयस्तरावर सर्वेक्षण व अनुशेषची कामे हाती घेतलेली आहे. या कामाचा शुभारंभ आज आ. संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये झाला. या वेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुनिल धांडे, माजी आ. उषाताई दराडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. सदरचे काम हे या भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने मोठ्या संख्येने लोक कामाच्या सर्वेक्षण शुभारंभ प्रसंगी उपस्थित होतेे. या वेळी संदीप क्षीरसागरांच्या जयघोषाच्या प्रचंड घोषणा उपस्थितांनी देत आ. क्षीरसागर दिलेल्या शब्दाची पुर्तता करतात अशी समाधानी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी दिल्या.