Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडनंबर एकला कोण? भाजपा, राष्ट्रवादीत संघर्ष

नंबर एकला कोण? भाजपा, राष्ट्रवादीत संघर्ष


राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर १९ जानेवारीला मतमोजणी झाली. यामध्ये महाआघाडीच्या जागाची बेरीज अधिक आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले, तरी या तिन्ही पक्षांची चांगली कामगिरी राहिली. शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिला. शिवसेनेचं अधिक वारं हे मुंबई, ठाणे सारख्या शहरात जास्त आहे. त्यामुळे शिवसेना नगरपंचायतीच्या निवडणुकीत मागे राहिली. कोकणात शिवसेनेने बाजी मारली. त्या ठिकाणी भाजपाला शिवसेनेला रोखता आलं नाही. नगर पंचायतीच्या निवडणुकीत पुढील निवडणुकीचं भवितव्य बरचं अवलंबून असतं. कोणाच्या पाठीमागे किती जनमत आहे, हे स्थानिक निवडणुकीतून समोर येत असतं. जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीची पध्दत महाआघाडी सरकारने बंद केल्याने आता नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांना जास्तच ‘भाव’ राहणार. राज्यातील चार प्रमुख पक्षांच्या व्यतिरिक्त इतर पक्षांची काही सरस कामगिरी दिसून आली नाही. स्थानिक पातळीवर आघाड्यांना मात्र चांगली संधी मिळाली. काही वेळा पक्षाचं राजकारण बाजुला ठेवून स्थानिक पुढारी आघाडी करुन निवडणुकीला समोरे जातात. अशा आघाड्यांना ८२ जागेवर यश मिळाले. मनसेला फक्त चार जागावर विजय मिळवता आला. माकपाने ११ जागा जिंकल्या. वंचीत बहुजन आघाडी, एमआयएम सारख्या पक्षांची विशेष काही कामगिरी दिसून आली नाही.
आता काय पोटात दुखतयं!
शिवसेना पक्ष राष्ट्रवादी संपवेल, शिवसेनेचं काही खरं राहिलं नाही, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस करत असतात. जेव्हा शिवसेना भाजपाच्या सोबत होती. तेव्हा भाजपाला चांगल्या गुदगुल्या होत होत्या. एक काळ असा होता. राज्यात भाजपाचं काहीच नव्हतं. तेव्हा शिवसेनेने भाजपाच्या बोटाला धरुन साथ दिली होती. आज भाजपाचं वर्चस्व वाढलं म्हणजे भाजपाने जास्तच नाकाने वांगे सोलायचे काय? विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेनेचं फाटलं. दोघांची पंचवीस वर्षाची युती केवळ मुख्यमंत्रीपदामुळे तुटली. भाजपाला इतकचं शिवसेने बद्दल प्रेम असतं, तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला काय हारकत होतं? पाच वर्ष फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं. साधं उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिलं नाही. भाजपाने उपमुख्यमंत्रीपदच आपल्या काळात गुंडाळून ठेवलं. तेच उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यास फडणवीस राजी झाले आणि जनता झोपेत असतांना त्यांनी व अजित पवारांनी शपथविधी घेतला. या राजकारणाला काय म्हणायचं? ही दगलबाजी नाही का? हे कुठल्या तत्वात बसलं होतं, याचा विचार चंद्रकांत पाटील, फडणवीस का करत नाहीत? आज राज्यात महाआघाडीचं सरकार आहे. मुख्यंमत्री शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे आहेत. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने भाजपाची पोटदुखी वाढली. उठसुठ ते शिवसेनेवर तोंडसुख घ्यायला विसरत नाहीत. भाजपाचे राज्यात १०५ आमदार निवडून आलेले आहेत. सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे असतांना नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने पाचशेच्यापुढे जागा जिंकायला हव्या होत्या. भाजपाला ३८४ जागा मिळाल्या. ह्या जागा आमदार, खासदारांच्या संख्येनूसार खुपच कमी आहेत, याचं आत्मचिंतन भाजपावाले का करत नाहीत?
राष्ट्रवादीची ताकद वाढली

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या निवडणुकीच चांगली कामगिरी केली. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टिका करत म्हटलं होतं की, राष्ट्रवादी हा अडीच जिल्हयाचा पक्ष आहे. या टिकेला काही दिवस होत नाही तोच नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादीला आलेलं यश पाहता, फडणवीस यांची बोलती बंद झाली असेल. अडीच जिल्हयातील पक्षाच्या नेत्याला फोडून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा त्यांना अडीच जिल्हयाच्या पक्षाबद्दल काहीच अक्षेप नव्हता? मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं मुळ ग्रामीण भागात आहे. खा. शरद पवारांना मानणारा वर्ग राज्यात मोठा आहे. राष्ट्रवादीत बड्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील दुसर्‍या एकाही पक्षात इतके बडे आणि अनुभवी नेते नाहीत, ते राष्ट्रवादीत आहेत. या नेत्यांचं आप, आपल्या जिल्हयात, तालुक्यात चांगलं वजन आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचा दबदबा आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षाची विश्रांती पाहता. गेली पंधरा वर्ष राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची राज्यात सत्ता होती. या सत्तेच्या काळात राज्यात बर्‍याच राजकीय घडामोडी घडल्या. राज्यात कित्येक कार्यकर्ते राष्ट्रवादीशी जोडले गेले. भाजपाला सर्वाधिक जागा जिंकून ही मुख्यमंत्रीपद कायम ठेवता आलं नाही, भाजपाची अहंकारी भुमिका भाजपाला धोकादायक ठरली. राजकारणात ‘चाणक्यपणा’ असला की, राजकारण यशस्वी होतं. राष्ट्रवादीत सर्वात मोठे ‘चाणक्य’ आहेत. त्यामुळे राज्यात भाजपाला जास्त जागा असून ही बाजुला बसावा लागलं आणि कमी जागा असतांना शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं हे विशेष आहे.
कॉंग्रेसची कामगिरी
कॉंग्रेस पक्ष मरणासुन्न अवस्थेत होता. कॉंग्रेसमध्ये काही प्रमाणात बदल होत असल्याचे दिसुन येऊन लागले. कॉंग्रेस पक्षाचे जे काही बडे नेते आहेत ते आपल्या बाले किल्ल्यात आब राखण्याचा प्रयत्न करत आहेत ही जमेची बाजु ठरत आहे, मध्यंतरी कॉंग्रेसची अवस्था खुपच वाईट झाली होती. गेल्या काही महिन्यापुर्वी विधानपरिषदेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात कॉग्रेसची चांगली कामगिरी राहिली. नगर पंचायतमध्ये कॉंग्रेस तिसर्‍या क्रमांकावर राहिला. विदर्भात कॉंग्रेसने चांगल्या जागा मिळवल्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उर्जामंत्री नितीन राऊत, महिला, बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर अशी बडी मंडळी विदर्भातील असल्यामुळे या विभागात कॉंग्रेसला यश मिळवता आलं. ३१६ जागा कॉंग्रेसच्या पदरात पडल्या. राज्याच्या राजकारणात कॉग्रेस पक्ष तितक्याच महत्वाच्या भुमिकेत आहे. कॉंग्रेस पक्ष राज्यातून संपतो की काय असं काहींना वाटत होतं. स्वबळावर निवडणुका लढवण्या इतका हा पक्ष मजबूत नव्हता. काही ठिकाणी कॉंग्रेसची खराब कामगिरी झाली. ज्या ठिकाणी कॉंग्रेस पुर्णंता हारली त्या ठिकाणच्या नेत्यांना विचार विनीमय करावा लागणार आहे.
येत्या निवडणुकीत कस
नगर पंचायतीच्या निवडणुका ह्या ट्रेलर होत्या. नगर पालिका,महानगर पालिका, जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसांनी होवू शकतात. ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे ह्या निवडणुका लांबल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न निकाली लागताच निवडणुका घोषीत होवू शकतात. नगर पंचायतच्या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वबळावर लढले. त्यात जास्तीच्या जागा भाजपाच्या आल्या, दोन नंबरला राष्ट्रवादी पक्ष राहिला आहे. राज्यात आम्हीच क्रमांक एकवर राहिलोत असा दावा भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी केला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी ही आपणच नंबर एकवर राहिलो आहोत असं म्हटलं आहे. राज्यातील जनतेने भाजपाला नाकारले असल्याचे मलीक यांनी सांगितले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात नेहमीच सत्ता संघर्ष होत आहे. भाजपाचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जावून आरोप, प्रत्यारोप करत असतात. त्यामुळे दोन्ही पक्षातील मतभेद अगदी टोकला जात असतात. निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकमेकांना धडा शिकवण्याची भाषा करत असतात. अगदी साध्या, साध्या निवडणुकीवरुन पक्षीय चर्चा झडत असतात. येणार्‍या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका महत्वाच्या आहेत. मुबंई महापालिकेवर भाजपाचा डोळा आहे. मुबंईत भाजपा जोर लावल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून मुबंई ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई हिसवण्याचा प्रयत्न होवू शकतो. मुंबईत भाजपा किती यशस्वी होईल याकडे लक्ष लागून आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका सगळेच पक्ष स्वबळावर लढले. येत्या स्थानिकच्या निवडणुका महाआघाडी स्वतंत्र लढणार की, तिन्ही पक्ष एकत्रीत येणार हे येत्या काळात समोर येईल. तीन्ही पक्षाची ताकद नगर पंचायतच्या निवडणुकीत वाढलेली दिसली. भाजपा स्वतंत्र लढणार की, मनसेला सोबत घेणार हे ही ज्या, त्या वेळीच समोर येईल. भाजपा हा राष्ट्रवादीसह शिवसेनेला हारवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल हे तितकचं खरं आहे. भाजपाला जशास तसे उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आक्रमक भुमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. येणार्‍या निवडणुकीत भाजपा विरुध्द राष्ट्रवादी, शिवसेना असाच सामना पाहावयास मिळेल. यात कोण जिंकणार आणि कोण हारणार हे दिसेलच, मग समोर येईल नंबर एकला कोणता पक्ष आहे.

Most Popular

error: Content is protected !!