Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeक्राईमखळबळजनक -अपहरण , नंतर मारहाण ,हातपाय बांधून तरुणाला गाडीतून फेकले

खळबळजनक -अपहरण , नंतर मारहाण ,हातपाय बांधून तरुणाला गाडीतून फेकले

गेवराई : (रिपोर्टर)तालुक्यातील मादळमोही येथील एका व्यवसायिकाला अज्ञात पाच ते सहा जणांनी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले. दरम्यान तोंडात बोळा व हातपाय बांधून बेदमपणे मारहाण करत सदरील व्यक्तीस वडीगोद्रीजवळ फेकून दिले. तसेच अपहरणकर्त्यांची एक स्कार्पिओ बंद पडल्याने त्यांनी ती तेथील पाटात ढकलून देवून अन्य एका स्कार्पिओमधून पोबारा केला. हि घटना बुधवारी रात्री घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. कैलास शिंगटे (रा.मादळमोही) असे अपहरण केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मादळमोही येथील उद्योजक कैलास शिंगटे यांच्या दुचाकीला बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या स्कार्पिओने धडक दिली. यावेळी स्कार्पिओतील अपहरणकर्त्यांनी शिंगटे यांना उचलून स्कार्पिओमध्ये टाकले. यानंतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधले. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण करत तब्बल 2 कोटींची मागणी केली. यावेळी 2 कोटी देण्यास नकार दिल्याने दाबणाने त्यांच्या शरीरावर जखमा करुन छळ केला. दरम्यान वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याजवळ सदरील स्कार्पिओ बंद पडल्याने ती कालव्यात ढकलून दिली. याठिकाणी शिंगटे यांच्या खिशातील आधार कार्ड, पँन कार्ड व अन्य काही कागदपत्रे टाकली, व अन्य एका स्कार्पिओमध्ये शिंगटे यांना टाकून पुढे काही अंतरावर शिंगटे यांना देखील चालत्या स्कार्पिओमधून बाहेर फेकले. यावेळी रात्रीचे 9 वाजले होते. दरम्यान कालव्यात पडलेली स्कार्पिओ काही जणांच्या निदर्शनास आल्यानंतर याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदरील ठिकाणी शिंगटे यांचे काही कागदपत्रे आढळून आले. त्यानुसार शिंगटे यांच्या कुटूंबांशी संपर्क साधला असता, त्यांची दुचाकी साठेवाडी याठिकाणी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तर काही वेळात शिंगटे यांचा त्यांच्या वडिलांना फोन गेल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची आपबीती सांगून मी वडीगोद्रीजवळ असलेल्या एका हाँटेलवर असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांना माहिती देताच त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी शिंगटे यांचा गोंदी पोलिसांनी जवाब नोंदवला असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चकलांबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती असून चकलांबा पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!