चार को.प. बंधार्याचे उच्च पातळी बंधार्यात रुपांतर करण्याच्या कामास मिळाली मंजुरी
नाथापूर, कुक्कडगाव, डिग्रस व औरंगपूर को.प. बंधार्याचे उच्च पातळी बंधार्यात रुपांतर होणार
गेवराई (रिपोर्टर) माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सिंदफणा नदीवरील नाथापूर, कुक्कडगाव, डिग्रस -खुंड्रस व औरंगपूर या चार को.प.बंधार्याचे उच्च पातळी बंधार्यात रुपांतर करण्याच्या कामास मंजुरी दिली आहे. या कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषण कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामामुळे 984 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार असल्याची माहिती अमरसिंह पंडित यांनी दिली आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
गेवराई विधानसभा मतदार संघातून वाहणार्या सिंदफणा नदीला पाणीदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, यापूर्वी टाकळगाव (हिंगणी) को.प. बंधार्याचे उच्च पातळी बंधार्यात रुपांतर करण्याच्या कामास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली होती. त्यानंतर नाथापूर पुल वजा बंधार्यासह डिग्रस- खुंड्रस को.प.बंधारा, कुक्कडगाव को.प.बंधारा आणि औरंगपूर को.प.बंधारा यांचे नुतनीकरण, विस्तार व सुधारणा करण्याच्या माध्यमातून त्याचे उच्च पातळी बंधार्यात रुपांतर करून जास्तीत जास्त पाणीसाठा वाढविण्याचे प्रयत्न अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून सुरु होते. जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या विनंतीवरून या कामांना मंजुरी दिली आहे. सिंदफणा नदीपात्रात 4.652 द.ल.घ.मी. एवढा प्रकल्पीय पाणीसाठा होणार असून त्यामुळे सिंदफणा नदीकाठावर 984 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे. एकंदरीतच माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नांमुळे गेवराई विधानसभा मतदार संघाच्या सिमेवर सिरसमार्ग पासून नाथापूर पर्यंत सिंदफणा नदी पाणीदार होणार असून सतत नदीपात्रात या प्रकल्पामुळे पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
या बाबत माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाने नाथापूर, कुक्कडगाव, डिग्रस- खुंड्रस व औरंगपूर या चारही को.प.बंधार्याच्या उच्च पातळी बंधार्यात रुपांतर करण्याच्या कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषण कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात या कामाच्या निविदा प्रसिध्द होवून लवकरच सर्व्हेक्षणाच्या कामास शुभारंभ होणार आहे. याकामी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कामास मंजुरी दिली आहे. या भागातील सततची दुष्काळी परिस्थिती संपुष्टात येवून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचे आपण आभार मानत असल्याच्या भावना त्यांनी शेवटी व्यक्त केल्या. सिरसमार्ग निम्न पातळी बंधार्याच्या धर्तीवर यापूर्वी टाकळगाव येथे मोठा सिंचन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने मंजुर केला, त्यानंतर आता सिंदफणा नदीपात्रातील नाथापूर, कुक्कडगाव, डिग्रस व औरंगपूर को.प.बंधार्याचे उच्च पातळी बंधार्यात रुपांतर केल्यामुळे सिंदफणा नदीकाठचा शेतकरी आनंदी झाला आहे. या भागातील शेतकर्यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.