बीड (रिपोर्टर) बीड नगरपालिका हद्दीत असलेल्या डॉ.मनोज मुंडे यांच्या कृष्णा हॉस्पिटलच्या अनाधिकृत बांधकामाविरोधात नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असता या कारवाईविरोधात डॉ.मुंडेंनी स्थगिती मिळवली होती. मात्र आता ती स्थगिती उठवण्यात आली असल्याने नगरपालिका कुठल्याही क्षणी डॉ.मुंडेंच्या कृष्णा हॉस्पिटलमधील अनाधिकृत बांधकामावर हातोडा मारू शकते. स्थगिती उठल्यामुळे बीड नगरपालिका डॉ.मुंडेंचे अनाधिकृत बांधकाम तोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक असे की, बीड नगरपालिका हद्दीत असलेल्या घर क्र.1-3-217 मध्ये डॉ.मनोज मुंडे यांनी कृष्णा हॉस्पिटलचे बांधकाम केले. त्यातील बांधकाम हे अनाधिकृत असल्याने नगरपालिकेने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. दवाखाना उभारण्यावेळेस शासनाचे अनेक नियम आहेत त्यामध्ये रूग्णासाठी लागणारी रूग्णवाहिका, रूग्णांची वाहने इ.साठी वाहनतळ असणे, सर्व बाजूने वायु व्हिजनसाठी समांतर अंतर बंधनकारक असते मात्र या सर्व नियमांचे उल्लंघन करून नियम डावलून नगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता डॉ.मुंडे यांनी बांधकाम सुरू केले होते. त्यावेळी नगरपालिकेने बांधकाम परवानगीही नाकारली होती. मुंडेंच्या बांधकामावर कारवाईचा बडगा उगारून अवैद्य अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीसही देण्यात आल्या होत्या. बीड नगरपालिकेच्या या कारवाईविरोधात डॉ.मुंडे यांनी नगरविकास मंत्रालयाकडून स्थगिती मिळवली होती. हि स्थगिती उठली असून त्याबाबतचा अहवाल नगरपालिका सादर करून मुंडे यांच्या अनाधिकृत बांधकामावर बीड नगरपालिकेच्या कारवाईचा हातोडा पडणार आहे.