Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडआपची मुसंडी, काँग्रेसचा कचरा

आपची मुसंडी, काँग्रेसचा कचरा


उत्तरप्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल लागले. यात चर्चा होवू लागली. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची. आपने दुसरे राज्य ताब्यात घेतले. तसेच या निवडणुकीत सगळ्यात जास्त नुकसान झालं ते काँग्रेस पक्षाचं. काँग्रेसचा अक्षरश ‘कचरा’ झाला. ज्या पंजाब राज्यात काँग्रेसची सत्ता होती, ते राज्य काँग्रेसच्या हातून गेलं. उत्तरप्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांनी चांगला जोर लावला होता. त्या ठिकाणी त्यांना काहीच यश आलं नाही. राहूल गांधी यांना अपयशावर अपयश येवू लागलं. पाच राज्यात काँग्रेस अगदी मापात नसल्यासारखंच आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाची इतकी वाईट अवस्था व्हावी, ही पहिलीच घटना असावी, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशात सत्तास्थानी असणारा काँग्रेस पक्ष इतका कसा ‘गळाला’ हा विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे.

काँग्रेसमध्ये काही वर्षापासून अंतर्गत धुसफुस सुरु आहे. काहींनी इतर पक्षाचा सहारा घेतला. जे काही नेते राहिले आहेत. त्यांचा तितका दबदबा राहिला नाही. संसदेत बोलून आणि भाषणबाजी करुन पक्ष कधी वाढत नसतो, याचा विसर एकेकाळी पक्षबांधणीत अग्रस्थानी असलेल्या काँग्रेसला पडला आहे. ग्रामीण भागात काम करणारे नेते काँग्रेसकडे राहिले नसल्याने प्रत्येक निवडणुकीत पराभवाला सामोरे जाण्याची वेळ काँग्रेसवर येवू लागली.
भाजपानं राखलं
भाजपाच्या वतीने ही निवडणुक प्रचंड चुरशीची करण्यात आली होती. या निवडणुकीतून पुढच्या लोकसभेचा मार्ग जातो. त्यातच उत्तरप्रदेश सारखं महत्वाचं राज्य दुसर्‍यांदा जिंकण्यासाठी भाजपा गेल्या एक वर्षापासून तयारी करत होता. निवडणुकीच्या आधीपासून उत्तरप्रदेशमध्ये रॅली आणि विविध उदघाटनाचे कार्यक्रम आयोजित करुन जनेतला विकास दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता. या राज्यात जाती, पातीचं राजकारण ही तितकंच महत्वाचं ठरत आलेलं आहे. जाती, धर्माचा आधार निवडणुकीत घेण्यात आला. आपल्याला फायदा होईल असे धु्रवीकरणाचे विधानं भाजपाचे नेते करत होते. एकीकडे विकास दाखवायचा, खोट्या विकासाचा योग्य मेळ बसत नसल्याचे लक्षात आले की, जातीचं अस्त्र बाहेर काढायचं ही भाजपाची ठरलेली राजकीय निती आहे, ती काही प्रमाणात उत्तरप्रदेशमध्ये फीट बसली. लोकांना विकास आणि विचारापेक्षा जात, धर्म महत्वाचा वाटत आलेला आहे. कोरोनाच्या काळात उत्तरप्रदेशमध्ये काय झालं याचा विसर लोकांना पडला? निवडणुकीत सगळं काही वाहून गेलं. असं असतांना उत्तरप्रदेश हे राज्य भाजपाच्या ताब्यात सहज आलं नाही हे ही तितकंच खरं आहे. गतवेळची निवडणुक अगदी सोपी होती, तशी यावेळची नव्हती. 51 जागा भाजपाच्या कमी झाल्या. विकास झाला तर इतक्या जागा कशा कमी झाल्या? पंजाबमध्ये भाजपाचं काहीच नाही. पंजाबमध्ये परिवर्तन झालं असतं तर मग भाजपाला मानलं असतं. शेतकरी आदोलनामुळे पंजाबच्या शेतकर्‍यांचा भाजपावर राग होता. तो त्यांनी काढला, त्यात काँग्रसेचीही धुळधाण उडाली. भाजपाला कसलाच असरा पंजाब राज्याने दिला नाही. याचं आत्मचिंतन भाजपाने केलं पाहिजे.
समाजवादीचा लढा!
समाजवादी पार्टीची खरी लढाई ही भाजपासोबत होती, गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीची मोठी नामुष्की झाली होती. प्रचंड बहुमताने भाजपाने उत्तरप्रदेश राज्य जिंकलं होतं. पाच वर्षात बरचं काही पुलावरुन पाणी गेलं होतं. उत्तरप्रदेश मधील काही घटना ह्या माणुसकीला काळीमा फासणार्‍या घडल्या होत्या. एका मुलीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर तिला मारहाण केली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या मृतदेहावर पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केले होते. दुसरी गंभीर घटना म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून काहींना ठार केले होते. यासह अन्य घटनेने उत्तरप्रदेश राज्य चांगलंच चर्चेत आले होते. ह्या घटना राजकीय मुद्दे बनले होते. अशा घटनामुळे आपलं सत्तास्थान धोक्यात येतं की,काय याची भीती भाजपाला नव्हती असं थोडंचं आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष नड्डा यांच्यासह अनेक नेते उत्तरप्रदेशमध्ये ठाण मांडून होते. निवडणुकीच्या तोंडावर अनेक बडे नेते भाजपाला सोडून गेले होते, त्याचा ही बराच फरक पडेल असं सांगितलं जात होतं. जातीय मत विभाजनाचा फायदा भाजपाला झाला. जवळपास शंभर उमेदवार सपाचे अगदी अल्पमतांनी पराभूत झाले. मायावती यांच्या बसपाची अवस्था संपल्यासारखी झाली. एकेकाळी उत्तरप्रदेश राज्य जिंकणार्‍या मायावती यांना दोन अंकी आकडा जिंकता आला नाही, हे दुर्देव म्हणावं लागेल. उमेदीची आणि परिवर्तनाची भाषा करणार्‍या खा. ओसीवी यांची एक ही जागा निवडून आली नाही. उलट एमआयएममुळे भाजपाला चांगला फायदा झाल्याचं दिसून आलं. एमआयएमच्या उमेदवाराला मिळालेले मते आणि सपा उमेदवारांचा झालेला अल्पमतांनी पराभव हे यातून दिसून येत आहे. अखिलेश यादव हे एकटेच लढले. त्यांच्या या निवडणुकीत तिपटीने जागा वाढल्या. त्यांच्या मताच्या टक्केवारीत वाढ झाली.
बदलावं लागेल
काँग्रेसचं काय होणार असा प्रश्‍न जो तो उपस्थित करत आहे. कॉग्रेसला पराभव नवा नाही, पराभवातून कॉग्रेस उठलेली आहे. असं काँग्रेसचे नेते नेहमीच भाषणात बोलत असतात. यापुर्वीच्या काँग्रेसची आणि आजच्या काँग्रेसची राजकीय परस्थिती वेगळी आहे. आज काँग्रेसला विरोधक प्रबळ झालेले आहेत. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर अनेक राज्यात प्रादेशीक पक्ष आहे. काही प्रादेशीक पक्ष आप-आपल्या राज्यात प्रभावी आहे. त्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष सहजा-सहजी संपवू शकत नाही. मात्र भाजपाने काँग्रेससह प्रादेशीक पक्ष संपवायचा विडा उचलेला आहे. काही पक्ष संपल्यातच जमा आहेत. पाच राज्यातील काँग्रेसच्या पराभवामुळे काँग्रसेने आत्मचिंतन बैठक बोलावली होती. या बैठकीत विशेष काही घडलं नाही. राहूल गांधी यांचेच नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. आम्ही राजीनामे देतोत हे सोनिया गांधी याचं वक्तव्य म्हणजे रणातून पळण्यासारखं आहे. राजीनामे दिल्याने प्रश्‍न सुटत नसतो. जो संकटाला सामोरे जातो, तोच खरा व्यक्ती असतो. राजकारण हे नेहमी फिरत असतं. आज सत्तेत असणारे कदाचीत उद्या विरोधात असू शकतात, किंवा अनेक वर्ष सत्तेत राहण्याची किमया काहींना जमू शकते. राजकारण करता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. काँग्रेसला स्वत: बदलावं लागेल. तेव्हा बदल होईल. नसता,कॉग्रेसच्या खात्यावर असेच शुन्याचे आकडे पडतील.
आपचा विजय
आम आदमी पार्टीचा जन्म तसा 2012 चा, केजरीवाल हे ज्येेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सोबत दिल्लीत आंदोलनाला बसले होते. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्ष काढला. हा पक्ष पहिल्यांदा दिल्लीच्या राजकारणात सत्तेच्या स्थानी पोहचला. पक्ष स्थापन केल्यानंतर स्वबळावर सत्तेत येणारा आम आमदी पक्ष हा पहिलाच आहे. केजरीवाल दोनदा दिल्लीत मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस आणि भाजपा सारख्या बलाढ्य पक्षांना हारवून हा पक्ष दिल्लीच्या तख्तावर विराजमान आहे. गत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून सत्ता खेचून घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र तसं यश विरोधकांना आलं नाही. केजरीवाल यांनी दिल्लीत चांगलं काम केलेलं आहे. शाळा,रुग्णालयांत त्यांनी विशेष प्राधान्याने कामे केल्याने दिल्लीकर त्यांच्या कामाचे कौतूक करत असतात. पाच राज्यातील निवडणुकीत आम आमदी पार्टी उतरली होती. एक राज्य आम आदमी पार्टीच्या ताब्यात येईल ते ही स्वबळावर असं अनेकांना वाटत नव्हतं. मात्र पंजाब सारखं मोठं राज्य आम आदमी पार्टीने जिंकल्याने आम आदमी पार्टीचीच सर्वत्र चर्चा होवू लागली. जशी की, ममता बॅजर्नी यांनी जेव्हा आपलं राज्य जिंकलं होतं. तशीच केजरीवाल यांच्या नावची चर्चा होत आहे. केजरीवाल यांच्या ताब्यात दोन राज्य असल्याने त्यांची ताकद वाढली आणि लोक आम आदमीकडे आकर्षीत होवू लागले. आम आदमी पार्टीची ताकद वाढणं हे देशभरातील प्रादेशीक पक्षाला व विशेष करुन काँग्रेसला धोक्याची घंटा वाटू लागली. लोक पर्याय बघू लागले. या पक्षाने कामे केली नाही,तर त्या पक्षाकडे जावू लागले. यात काँग्रेसचं सगळ्यात जास्त नुकसान होवू लागलं. भाजपा तर आता कुठं स्थिरावला आहे, पण त्याला काही राज्यात घरघर लागू लागली हे नकारुन चालणार नाही. आम आदमीने पंजाब जिंकल्याने देशातील आम आदमीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. येत्या डिेसेंबर मध्ये काही राज्यातील निवडणूका होत आहे. त्यात ही आम आदमी उतरणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी ताकदीने उरतली तर बरेच राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Most Popular

error: Content is protected !!