गेवराई (रिपोर्टर) गोदा पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे फावत आहे. रात्री कुमावतांच्या पथकाने खामगाव शिवारातील गोदापात्रात छापा टाकून दोन हायवा, एक मोठा ट्रक वाळू उपसा करणारे रोटर, केन्या असा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गेवराई तालुक्यात गोदापात्रातून वाळू माफिया रात्रंदिवस पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा करतात. यामुळे पर्यावरणाचा र्हास तर होतोच नाहक अनेकांचे बळीही जात आहेत. याचे पोलीस प्रशासनाला सोयरसुतक नाही. गोदापात्रातील खामगाव परिसरात वाळू उपसा करून त्याची वाहतूक होत असल्याची सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली. सकाळी सात वाजता खामगाव शिवारात छापा टाकला असता तेथे वाळू माफियांनी वाळू उपसण्यासाठी केन्या, रोटर आदी सामग्री मिळून आली. गेवराई तालुक्यातील खामगाव व शहागडच्या पुलाखाली दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करून त्याची तस्करी केली जाते. सकाळी सात वाजता दस्तुरखुद्द सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह तेथे छापा मारला. या वेळी त्यांना वरील मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिसात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.