अधिकृत अधिकारी असताना पैसे घेऊन बेकायदेशीर परवाने देणार्यांवर कारवाई करा
बीड (रिपोर्टर): शासन व्यवस्था नसल्याने प्रशासन व्यवस्थेच्या अधिपत्याखाली सुरू असलेला बीड नगरपालिकेचा कारभार अत्यंत ढिसाळ आणि भ्रष्टाचारी पद्धतीने सुरू असल्याचे उघड होत आहे. गुंठेवारी, करभरणा, बांधकाम परवाना, लेआऊट यासह अन्य प्रमुख गोष्टींसाठी जे काही ऑनलाईन परवाने देण्यासाठी लॉगींग कोड अधिकृत व्यक्तींकडे असतो. मात्र बीड नगरपालिकेमध्ये दोन व्यक्ती अधिकृत असताना तो कोड एका ज्यूनिअर इंजिनिअरकडे दिल्याचे सांगण्यात येते. त्या इंजिनिअरशी लॉगिंनबाबत विचारणा केली तर तो आपल्याला अधिकार नसल्याचे सांगतो. मात्र सर्व परवाने, गुंठेवारी, लेआऊट नगरपालिकेत होते, मग ही लॉगिंग नेमकी कोण करतो? नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी या लॉगिंगसाठी त्रयस्त नेमका कोण नेमला? बीड नगरपालिकेची आर्थिक भ्रष्टाचाराची गुंडी कोणाच्या हाती? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्या त्रयस्त व्यक्तीने लॉगिन कोडच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा हाते असून या गंभीर बाबीची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक असे की, मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या कार्यकाळात बीड नगरपालिकेमध्ये मोठा अनागोंदी कारभार सुरू आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या पद्धतीने सर्रासपणे बेकायदा कामे बीड नगरपालिकेमध्ये होताना दिसून येत आहेत. नगरपालिकेअंतर्गत शहरवासियांना जे जे महत्वाचे परवाने लागतात ते परवाने अधिकृत अधिकार्यांकडून न मिळता त्रयस्त व्यक्तीच्या माध्यमातून मिळत आहेत. विशेष म्हणजे जिथे अवैध काम आहे तिथे ते तात्काळ दिले जातात आणि जिथे कायदेशीर कामे आहेत तिथे परवाने दिले जात नसल्याची ओरड होते. गुंठेवारी, कररचना, बांधकाम परवाना, लेआऊट यासह अन्य बाबींसाठी ऑनलाईन पद्धतीने काम करावे लागते. त्यासाठी एक लॉगिन कोड असतो. तो कोड रचनाकाराकडे अधिकृतपणे द्यावा लागतो. बीड नगरपालिकेत त्या हुद्यावरचे दोन अधिकारी आहेत, मात्र मुख्याधिकार्यांनी त्या अधिकार्यांकडे तो कोड न देता बांधकाम विभाग पाहणारे ज्युनिअर अखिल फारोकी यांच्याकडे दिल्याचे सांगितले. रिपोर्टरने फारोकी यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले, लॉगिन कोड आपल्याकडे नाही आणि तो अधिकारही आपला नाही, मग गुंठेवारी, बांधकाम परवाने, लेआऊट याचे परवाने तर दिले जातात, ते कोण देतो? याचा शोध घेतला असता मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत नगरपालिकेतीलच एका त्रयस्तास तो लॉगिन कोड दिला, त्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात असून तो त्रयस्त व्यक्ती मोठ्या प्रमाणावर लाच घेऊन लेऊटसह अन्य बाबींचे परवाने बेकायदेशीर पद्धतीने सर्रासपणे देतो. या गंभीर बाबीची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.