बीड (रिपोर्टर) भरधाव वेगातील ईर्टिकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले असून एक बारा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर इर्टिकामधील चार महिला आणि चालक जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजता पात्रुड ते माजलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी येथे घडली.
शिंदेवाडी येथील सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव (वय 34) आणि लक्ष्मण भीमराव विघ्ने (वय 49) हे दोघे एका बारा वर्षाच्या मुलासह शिंदेवाडी येथे जात असताना शिंदेवाडी फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इर्टिका गाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सिद्धेश्वर जाधव आणि लक्ष्मण विघ्ने या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहे तर इर्टिका गाडीमधील चार महिलांसह चालक जखमी झाला आहे. हा अपघात शिंदेवाडी फाट्याजवळ घडला. याची माहिती माजलगाव ग्रामीण ठाण्याचे एपीआय विजयसिंग जोनवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.