गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
तो काळ परावचक्राचा, तेवढाच दहशतीचा आणि अज्ञानाचा. एकीकडून चार पातशाह्या महाराष्ट्राचे लचके तोडायच्या तर दुसरीकडून इंग्रज, डच, पोर्तुगुज आपआपल्या परीने घुसखोरी करायचे. इथली रयत ही परावचक्रापुढे दुबळी पडायची. निधड्या छात्या असायच्या, आजच्या भाषेत छप्पन इंचाची छाती. परंतु त्याच छात्या आणि त्या छात्या वाल्यांचे सळसळते मनगट दहशत निर्माण करणार्यांसमोर मुजरे घालायचे. आतापर्यंत आपण तो कुठला काळ ओळखळच असेल, ते होतं सोळावं शतक. तेव्हा तलवारीच्या टोकावर जेवढा दहशतवाद माजवला जायचा त्यापेक्षाही अधिक धार्मिक दहशतवाद आप्तस्वयीक म्हणणार्या धर्म मार्तंडांकडून राबवला जायचा. घरात काय खायचं, काय प्यायचं, शेतात काय पिकायचं, इथपर्यंत पंचांग पाहून जे ते केलं जायचं. परावचक्राराच्या शक्तीला तलवारीने उत्तर देण्यासाठी जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तसाच या मराठी मातीमध्ये धार्मिक दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी जगद्गुरू संत तुकोबांचा जन्म इथेच झाला. आज त्याच जगद्गुरू तुकोबांची तुकाराम बीज आहे. त्या अनुषंगाने आपण विज्ञानवादी तुकारामांना समजून घ्यायला हवे. काल-परवा एका चित्रपटाच्या विषयातून चर्चेचा जन्म झाला तेव्हा माणसाला माणूस म्हणून माणसासारखं वागण्याची भूमिका असलेल्या एकाने म्हटले, वारकरी संप्रदाय नसता तर आज तुम्ही-आम्ही हिंदू म्हणून राहिलो असतोत का? त्याच्या या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी आम्हाला जगद्गुरू संत तुकोबांच्या वारकरी संप्रदायाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांच्या हिंदुत्वावर गर्व असल्याचे सांगावे लागेल आणि ते सत्यच आहे. मनुचा हिंदू धर्म हा माणसाला माणसापासून दूर करणारा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, जगद्गुरू संत तुकोबांचा हिंदू धर्म हा माणसाला माणसासोबत जोडणारा आहे. हे स्वराज्य निर्माण करून उभ्या जगाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मात्र आजची हिंदुत्वाची व्याख्या ही माणसाला माणसापासून दूर करणारी आहे. जगद्गुरू संत तुकोबांनी आपल्या उभ्या आयुष्यात जात-पात-धर्म-पंथ याला कुठेही थारा दिला नाही. उलट जेव्हा केव्हा धार्मिक दहशतवाद माजवण्याचा धर्म मार्तंडांनी प्रयत्न केला, शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा जगद्गुरू संत तुकोबांनी
धर्मपिठाला आव्हान
दिले. संत तुकाराम आपल्या काव्यातून, आपल्या लेखणीतून जे अभंग लिहायचे, जे कवित्व करायचे, ते कवित्व ईश्वराची, विठ्ठलाची जेवढी ओवाळणी असायची तेवढीच सामाजिक अस्थिरतेवर, कर्मकांडांवर, अधिकारांवर आसुडही ओढलेले असायचे. तोबा हे एखाद्या आरशाप्रमाणे हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखण्याचा समाजाला प्रयत्न करायचे. त्यांच्या कीर्तनाला वाढत असलेला जनतेचा प्रतिसाद आणि त्यांच्या किर्तनातून होत असलेले समाज प्रबोधन आणि त्या समाज प्रबोधनातून वाढत चाललेल्या प्रश्न विचारणार्यांच्या संख्येला तथाकथीत धर्ममार्तंड दहशतीकाली आले होते. आपल्या दुकाना बंद होतील, लोक हुशार झाले तर धार्मिक दहशतवाद माजवता येणार नाही आणि धार्मिक दहशतवाद माजवला गेला नाही तर आपली पोट भरणार नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा तुकोबांच्या गाथेला आणि कवित्वाला आव्हान देण्याहेतू तुकोबांना धर्मपिठासमोर उभे केले गेले. तेव्हा तुकोबा डगमगले नाही, धर्मपिठाला आव्हान देत
सत्य आम्हा म्हणी, नव्हे गभाळ्याचे धनी
देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावियासी बरे
असे म्हणत आपल्या कवित्वाच्या भूमिकेचा आणि इथे सर्वांनाच लिहिण्याचा, शिक्षणाचा अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले. तरीही धर्मपिठाने तुकोबांच्या गाथेला अग्निदिव्याची शिक्षा दिली, ती नंतर जलदिव्यात अमलात आणली. तात्पर्य काय, तर तेच धर्ममार्तंड आणि धर्ममार्तंडांची मनुस्मृतीची भूमिका सोळाव्या शतकातही सर्वसामान्यांना वेठीस धरत होती आणि आजही त्यांची पिलावळे सर्वसामान्यांना वेठीस धरत आहे. आज परावचक्राच्या दहशतवादाखाली तुम्ही-आम्ही नसलो तरी परावचक्राचा दहशतवाद उत्पन्न होईल याची भीती दाखवून तथाकथीत धर्माचा जागर करण्याचा जो प्रयास केला जातो तो एखाद्या धार्मिक दहशतवादासारखाच म्हणावा लागेल. तेव्हाही जगद्गुरू संत तुकोबांनी
सर्वांगीन विकास
हा दृष्टीकोन समोर ठेवला. सर्व जात-पात-धर्म-पंथातील लोकांना शिक्षण घेता आलं पाहिजे. ‘आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे ’ असं म्हणत शब्दाची ताकद किंवा अक्षर ओळखीची किंमत तुकोबांनी रत्न आणि शस्त्र असा उल्लेख करून सांगितली. जी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती, महाराष्ट्र मुलखातला माणूस हा सर्वसमान असायला हवा आणि छत्रपतींची भूमिकाही सर्वास पोटास लावणे आहे, अशी होती. तशीच भूमिका जगद्गुरू संत तुकोबांनी आपल्या कीर्तनातून सातत्याने मांडली. ही भूमिका मांडताना महाराष्ट्रातल्या वाडी-वस्ती-तांड्यावरील, गावागावांतील सह्याद्रीच्या दर्याकोर्यातील नागरिकांना आपलीशी वाटली. परंतु माणसाने माणसासारखी वागणारी भूमिका धर्ममार्तंडांना मात्र तेव्हाही पटली नाही म्हणूनच तुकोबांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. जो लोक दक्षणासाठी रयतेला पिचायचे आणि धर्माचे रक्षक असल्याचे सांगायचे त्या उलट जगद्गुरू संत तुकोबांनी देशातील
पहिली कर्जमाफी
केली. तुकोबांचे वडील बोल्होबा अंबिले (मोरे) यांच्याकडे पिढीजात महाजनकी होती, सावकारकी होती. जेव्हा तुकोबांच्या हाती घरचा कारभार आला आणि त्याकाळी दुष्काळ पडला तेव्हा तुकोबांनी घरातली सर्व कर्जखाती इंद्रायनीत बुडवून टाकली. आज तुम्ही-आम्ही कर्जमाफीचे डांगोरे पिटवतो, राज्यात ज्याची सत्ता आहे ते सत्ताधारी शेतकर्यांचं कर्ज माफ करतात तेव्हा आपल्या बापाच्या दवलतीतून कर्ज माफ केल्याचा देखावा निर्माण करून स्वत:ची पाठ थोपटून घेतात, टिर्या बडवून घेतात मात्र जगद्गुरू संत तुकोबांनी स्वत:च्या मालकीचे पैसे माफ केले, ते सांगायलाही पुढे आले नाहीत. याचाच अर्थ तुकोबा हे धार्मिक दहशतवाद मिटवण्याबरोबर आर्थिक दुर्बलता मिटवण्यासाठीही पुढारलेले होते. तुकोबांची शिक्षणाबद्दलची भूमिका, अर्थकारणाबद्दलची भूमिका आणि समाजकारणाबद्दलची भूमिका पाहितली तर व्यवहारीक दृष्टीकोनातून हिंदू धर्माचा ध्वज अटकेपार नेणारी होती, मात्र इथेही तुकोबांना जिथे तिथे विरोध करण्याचा प्रयत्न तथाकथीत धर्ममार्तंडांनी सातत्याने केला आणि
तुकोबा वैकुंठी
गेले असे डांगोरा पिटून सांगण्यात येऊ लागले. धर्मपिठाने जेव्हा तुकोबांच्या कवित्वाला जलदिव्याची शिक्षा दिली, त्यांचे लिहिलेले अभंग एक गाठोडं बांधून इंद्रायणीमध्ये बुडवले तेव्हा तुकोबा त्याठिकाणी उपोषणाला बसले, सात दिवसाच्या निर्जळानंतर इंद्रायणी मातेने तुकोबांच्या अभंगाच्या वह्या तुकोबांना स्वाधीन केल्या, असे सांगितले जाते अथवा मांडले जाते आणि त्याच दिवशी तुकोबांना नेण्यासाठी आकाशातून विमान आलं आणि तुकोबा त्या विमानात बसून वैकुंठाला गेले, असे सातत्याने सांगण्यात आले मात्र विज्ञानाच्या आविष्काराने प्रफुल्लीत झालेल्या आजच्या युगात तुकोबा वैकुंठाला गेले की नाही यावर संशय व्यक्त केला जातो. नव्हे नव्हे तर जगद्गुरू संत तुकोबांची हत्या झाल्याचेही थेटपणे आरोप केले जातात आणि तुकोबांची हत्याही धर्ममार्तंडांनीच केली, असेही सांगितले जाते. जो व्यक्ती विज्ञानवादी होता ‘अनुरेणु तोडका तुका आकाशाएवढा,’ असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीने सोळाव्या शतकात अनुरेणुचा सिद्धांत मांडला, ज्याला शिक्षणाचे महत्व कळले, जो माणूस जात-पात-धर्म-पंथापेक्षा माणूस धर्माला अनन्यसाधारण महत्व देत होता, कर्मकांडांवर, अंध-श्रद्धेवर आसूड ओढत होता तो माणूस असा अलगदपणे जाईलच कसा? हा वादाचा, बोधाचा आणि बुद्धी भेदाचा विषय आहे. त्यावर आम्ही जास्त भाष्य करणार नाही, आमच्यासाठी तुकोबांचं जन्म महाराष्ट्रात झाला याचा आम्हाला अभिमान आहे. तुकोबांची गाथा ही आमच्यासाठी शिक्षणाचं साधन आहे आणि याच शिक्षणाच्या साधनेतून तुकोबांच्या विद्यापीठातून आमचं शिक्षण होतय, याचा आम्हाला प्रचंड गर्व आहे. आज तुकाराम बिजेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुणांनी
गाथेने माथा
जागेवर आणावा
पुस्तकाने मस्तक सुधारते, असं आपल्याकडे म्हटलं जातं आणि तेही त्रिवार सत्य आहे. आम्ही तर जगद्गुरू संत तुकोबांच्या गाथेने माथा जागेवर येतं, हे स्पष्यपणे म्हणू. त्या गाथेत आणि त्या गाथेतल्या अभंगात खरा ईश्वर दिसून येतो, खरा धर्म दिसून येतो, माणसातलं माणूसपण काय असतं, धर्माचं आचरण कधी आणि कुठं करायचं असतं, शेती कशी करावी, शिक्षण कसं असावं, नवर्याने बायकोसोबत कसं राहावं, बायकोने नवर्यासोबत कसं राहावं, सासू-सुनेचं नातं कसं असावं, माय-लेकीचा नाता कसा असतो, राजा आणि गुरू कसा असतो, राजाचं वर्तन काय असतं, प्रजेने कसं राहावं, अशा एक ना अनेक गोष्टी शिकता येतील. मस्तकात ज्या जातीयतेच्या अळ्या वळवळतायत त्या गाथेने मरून जातील. आज जो एखाद्या विषयाचा प्रपोगंडा करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला उत्तर द्यायला गाथेतून शब्द सूचतील त्यामुळे खरंतर तुकोबांची गाथा ही आजच्या पिढीसाठी अभ्यासक्रमात असायला हवी म्हणजे केव्हा-कुठेही कधीच्याही ‘फाईल’ बाहेर आल्या तरी त्यातलं सत्य आणि वर्म कळण्याची ताकद त्या तरुणामध्ये येईल.
अग्रलेख- नव्हे गभाळ्याचे धनी…
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.