Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडएमआयएमची पतंगबाजी

एमआयएमची पतंगबाजी


राज्याच्या राजकारणात सतत राजकीय घडामोडी घडत असतात. भाजपावाले गेल्या तीन वर्षापासून राज्य सरकार पडणार असं म्हणत आहेत, पण सरकार काही पडलं नाही, ते सध्या तरी जेमतेम आहे. भाजपाने लाख कुटाणे केले सरकारला बदनाम करण्याचे, सरकार बदनाम झालं नाही, उलट जनतेच्या मनात घर करुन राहिलं. आता नवीच राजकीय चर्चा सुरु आहे, ती म्हणजे एमआयएमने महाआघाडीला ऑफर दिली. आम्ही सोबत यायला तयार आहोत. अशी पतंगबाजी खा. जलील यांनी हवेत सोडली. त्यांचा हा प्रस्ताव म्हणजे ‘दाल मे कुछ काला है‘ असचं म्हणावं लागेल. जलील यांच्या प्रस्तावाबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. काल पर्यंत हेच एमआयएमवाले कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या विरोधात बोलून मुस्लिम मताचं राजकारण करत होते, तेच आज आम्हाला महाआघाडीत सामील करुन घ्या म्हणुन पुढे येत आहे. खा. ओवीसी यांच्या सांगण्यावरुनच हा प्रस्ताव जलील यांनी मांडला असेल, असा परस्पर ते प्रस्ताव मांडणार नाहीत.
जनता कळून चुकली
लोकांची जितकी दिशाभूल करता येईल ती केली की, लोक त्याला भुलतात. जाती, धर्माच्या नावाने लोक तात्काळ एक होवून इतरांचा द्वेष करायला लागतात. लोकांत फुट पाडण्याचं काम आज जातीयवादी राजकारण करु लागलं आहे. एमआयएम हा हैद्राबादी पक्ष, ह्या पक्षाचं प्राबल्य आपल्या राज्या पुरतं मर्यादीत आहे. तेलंगणात हा पक्ष पुर्ण ताकदीने निवडणुकीत उतरत नाही, सहा ते सात विधानसभा निवडणुका आणि एक लोकसभेची जागा हा पक्ष लढवतो, पण इतर ठिकाणी तो निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरतो, हे असं का? मतांचे विभाजन करण्याकरीता, बिहारमध्ये या पक्षांने निवडणुक लढवली. त्या ठिकाणी चार आमदार निवडून आले. बर्‍याच मतदार संघात मतांचे विभाजन होवून त्याचा फायदा भाजपप्रणीत नितीश कुमार यांच्या पक्षाला झाला. थोड्या फरकाने तेजस्वी यादव यांचं बहुमत हुकलं. त्यांना पुर्ण बहुमत मिळू शकलं नाही. इतक्या कमी वयात तेजस्वी यांनी बिहारमध्ये मोठया प्रमाणात जागा निवडून आणल्या, या बद्दल यादव यांचं सर्वत्र कौतूक झालं होतं. बिहारच्या निवडणुकी नंतर पश्‍चिम बंगालची निवडणुक झाली. या निवडणुकीत बिहार पॅटर्न राबवण्यात आला. भाजपाने बंगालमध्ये मत विभाजनाचा भरपूर प्रयत्न केला. खा.ओवीसी मोंठया ताकदीने या निवडणुकीत उतरले. अनेक सभा त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या. तेथील मतदारांनी भाजपासह एमआयएमला नाकारले. बंगालने ममता बॅनर्जी यांना साथ देवून त्यांच्या ताब्यात हे राज्य दिले. आता नुकत्याच पाच राज्यातील निवडणुका पार पडल्या. सर्वाची नजर होती, ती उत्तरप्रदेश राज्याकडे, या राज्यात काय होईल याची उत्सूकता होती. ओसीवी यांनी उत्तर प्रदेशमध्ये जोर लावला. ओवीसी यांच्या उमेदवाराला काही ठिकाणी बरीच मते पडली. उमेदवार एक ही निवडून आला नाही. नुकसान मात्र सपाचं बरचं झालं. या ठिकाणी एमआयएम भाजपाच्या मदतीला धावून आला. तरी भाजपाच्या पन्नास जागा गत निवडणुकी पेक्षा कमी झाल्या. एमआयएममुळे भाजपाला चांगला फायदा झाला हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे.
शिवसेनेेने धुडकावले
एमआयएमने प्रस्ताव ठेवल्यानंतर काही अशा आणि तशा प्रतिक्रीया राजकीय नेत्याकडून येवू लागल्या. एमआयएम हा पक्ष महाआघाडीत सहभागी झाला तरी त्याचा तितका फायदा महाआघाडीला होईल असं काही नाही. या पुर्वीच्या निवडणुकीत एमआयएमने स्वतंत्र निवडणुक लढवली होती. काही मतदार संघात त्याचा फटका बसला इतर ठिकाणी त्याचा परिणाम जाणवला नाही. ज्या ठिकाणी एमआयएमने पुर्वी चांगली मते घेतली होती. तेथे नंतर एमआयएम भुई सपाट झालेली आहे. कधी,कधी लोक भावनेच्या भरात नको ते निर्णय घेत असतात. तसाच प्रकार एमआयएमच्या बाबतीत होत आहे. आज जर एमआयएमने स्वतंत्र निवडणुक लढवली तर गत निवडणुकीच्या कितीतरी कमी मते एमआयएमला पडलेले दिसतील. जाती, धर्माच्या आधारे नेतृत्व कधीच उभा राहू शकत नाही. एखाद वेेळेस जाती, धर्माच्या नावाने फुट पाडता येते, पण सक्षम नेतृत्व उभा राहू शकत नाही. खा. जलील यांच्या प्रस्तावा बाबत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जलील यांनी स्वत: एमआयएमचा राजीनामा देवून राष्ट्रवादीत प्रवेश करावा. म्हणजे राष्ट्रवादी एमआयएमला सोबत घेण्यास तितकी सकारात्मक नाही. कॉंग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कट्टर वादाला आपल्याकडे थारा नसल्याचे म्हटले आहे. एमआयएममुळे सगळ्यात जास्त नुकसान कॉंग्रेस पक्षाचं झालं. त्यामुळे कॉंग्रेस एमआयएमला स्विकारणार नाही. शिवसेनेने यावर तिकट प्रतिक्रिया व्यक्त करत एमआयएमला कदापी महाआघाडीत सहभागी करुन घेणार नसल्याचे सांगितले आहे. शिवसेनेने वेळोवेळी एमआयएमचे राजकीय ‘कावे’ कसे आहेत हे समोर आणलेले आहेत. भाजपाला हा पक्ष कसा मदत करतो याचं विश्‍लेषण खा. संजय राऊत यांनी वेळोवेळी केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेला हा प्रस्ताव कधी ही मान्य होणार नाही.
उघडं पाडलं
एमआयएम ज्या पध्दतीने बोलत असतो, त्यांची भाषा भाजपाच्या वाचाळ नेत्यासारखीच आहे. राज्यातील भाजपाचे काही नेते शिवसेनेवर खालच्या पातळीवर जावून टिका करत असतात. शिवसेनेला ते आपला राजकीय ‘वैरी’ समजतात, जेणे करुन कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत सख्य असणार्‍या भाजपाला शिवसेनेची ऍलर्जी असल्यासारखीच आहे. मी पुन्हा येईल ही घोषणा फडणवीस विसरले नाहीत. राज्यात भाजपाला सत्तेवर येवू देणार नाही असं खा. शरद पवार यांनी म्हटल्यानंतर आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार असा फुकटचा आव देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आणला आहे. शिवसेनेचे आमदार फुटणार अशी पोकळ अवाई सुध्दा भाजपावाले उठवत असतात, त्यांच्या या अवाईत कुठलीही हवा नसते, पण तशी हवा भरण्याचा प्रयत्न केला जातो. काही आमदार नाराज आहेत, असं मोघमपणे बोलून राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देण्याचा प्रयत्न केला जातो. शिवसेनेत पुर्वी सारखा दम राहिला नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने एमआयएमशी युती करावी असं वक्तव्य खा. इम्तियाज जलील याचं आहे. त्यांची ही भाषा म्हणजे फडणवीस यांचीच आहे असं दिसून येत आहे. खा. जलील हे राजकीय द्वेषातून वक्तव्य करत आहे असं वाटू लागलं. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे शिवसेनेला उठसुट हिंदूत्वाचे डोस पाजत असतात. जणू काही भाजपावाले खरेखुरे आणि शिवसेना नकली असा त्यांचा समज असतो. याचा अर्थ असा होतो की, नवख्या भाजपावाल्यांना शिवसेना समजलीच नाही. त्यांना शिवसेना समजून घेण्यासाठी पाठीमागे जावे लागेल. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयीसह अन्य नेत्यांचे शिवसेने सोबत कसे संबंध होते ते पाहावे लागेल. जुना इतिहास त्यांना जाणुन घ्यावा लागेल. इतिहासातून काही बोध न घेताच फडणवीस आणि चंद्रकांत पाटील बेफाम आणि बेताल बोलत असतात. त्यांच्या बोलण्याला कसलाही वैचारीक अर्थ नाही.
कट असू शकतो?
आपण किती ही रिकामे ओरडलो तरी त्याचा काही परिणाम महाआघाडी सरकार होत नाही याची सल भाजपाच्या मनात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे जणु भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असल्यासारखे वागत असतात. १२ आमदारांच्या नियुक्ती बाबत राज्यपाल बोलायला तयार नाहीत. ते निर्णय घेत नाहीत, हे प्रकरण त्यांनी तसचं ठेवलं आहे. कोर्टाने अनेक वेळा त्यांना या प्रकरणी फटकारलेले आहे, तरी त्यांच्यावर कसलाही परिणाम झाला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या समोर ना. अजित पवार यांनी संविधानीक पदावर बसलेले काही व्यक्ती व्यवस्थीत काम करत नसल्याचे बोलून दाखवले होते, कोश्यारी यांना केंद्रातील भाजपाचा आर्शीवाद आहे, त्यामुळे ते राज्यात कुणालाच दाद देत नाहीत. तुम्हाला जे करता येईल ते करा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत असं कोश्यारी यांना भाजपाने सांगितलेलं असावं? म्हणुन राज्यपाल नको तसं वागू लागले. एमआयएम हा चांगला मोहरा भाजपाच्या हाती लागलेला आहे. संकटाच्या काळात एमआयएम धावून येतो. एकीकडून ओवीसी बोलत असतात. दुसरीकडे भाजपाचे नेते बोलतात. जणू काही खरचं वादावादी होते असं वातावरण निर्माण केलं जात आहे. विशेष करुन निवडणुकीत जास्त पेटवलं जातं. सगळे मुद्दे बाजुला राहतात आणि ओवीसी काय म्हणाले, भाजपाचे नेते काय म्हणतात, याची चर्चा इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडीयात होत असते, आपलीच चर्चा व्हावी असं जाणीवपुर्वक षडयंत्र रचले जात आहे. बराच मीडीया भाजपाच्या इशार्‍यावरच नाचत असतो. सोशल मीडीयावर तर भाजपाचे पेड कार्यकर्ते असतात, ते वादग्रस्त मुद्यांना हवा देण्याचं काम करत असतात. एमआयएमचा प्रस्ताव हा एक राजकीय कटाचाच भाग असू शकतो? एमआयएमने प्रस्ताव ठेवल्यास शिवसेनेला कोंडीत पकडता येतं. अशी भाजपाची खेळी असू शकते? ऐरवी शिवसेना खुपच बोलत असते. एमआयएम महाआघाडी सोबत गेल्यास आपल्याला बेताल आरोप करता येईल असं फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल? तशी त्यांनी तयारीच करुन ठेवली असेल? हीच चांगली संधी आहे, शिवसेनेला बदनाम करण्याची याचा विचार राज्याचे भाजपावाले करत असतील. एमआयएमला सोबत घेणं हे आघाडीसाठी फायद्याचं नाही तर नुकसानच ठरू शकते हे शिवसेनेला माहित आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राष्ट्रवादीने ही एमआयएमला नकार दिला. पवार ‘चाणक्य’ आहेत, त्यांना दांंडगा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे ते कदापी एमआयएमला सोबत घेणार नाहीत. भाजपाने किती ही खेळी केली तरी त्यांची ही खेळी यशस्वी होईल असं दिसत नाही. येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कटकारस्थान रचले असावं असा कयास काढला जावू लागला. एमआयएमने पतंग हवेत तर सोडला पण तो उडेल असं वाटत नाही.

Most Popular

error: Content is protected !!