मुंबई (रिपोर्टर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत नाही तोच सक्तवसुली संचलनालयाने शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि जमिनींचा समावेश असल्याचे समजते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.
काही महिन्यांपूर्वी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी केली होती. मात्र, मध्यंतरी हा तपास थंडावला होता. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त करत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.