अनेक गावांचे संपर्क तुटले, बीड जिल्ह्यात 36 तासांपासून सुर्यदर्शन नाही, सर्वदूर झालेल्या पावसाने जिल्ह्यातला शेतकरी सुखावला
बीड/औरंगाबाद/नांदेड/हिंगोली/परभणी (रिपोर्टर) गेल्या 36 तासांपासून मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची कोळसधार सुरू असून नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवून सोडला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात अनेक गावांचे संपर्क नद्यांना आलेल्या पुरामुळे तुटले आहेत. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात रिमझीम पाऊस पडताना दिसून येत आहे तर गेल्या 36 तासांपासून बीड जिल्ह्यात सुर्यदर्शन नाही. हलक्याश्या संततधार पावसाने बीड जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री चालू झालेल्या मुसळधार पावसामुळं अक्षरशः हाहाकार घातला आहे. सायंकाळी सुरु झालेल्या या ढगफुटीसदृश्य पाऊसामुळं हजारो हेक्टरावरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. तर शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळं अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकर्यांना पुन्हा तिबार पेरणीचे संकट उभं राहिलं आहे. तर अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरलं असून गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. दरम्यान, आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतकर्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यामुळं पिकांसह शेतीही खरडून गेली आहे. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर तिकडे परभणी जिल्हात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे . परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने जवळपास 14 गावांचा संपर्क तुटला आहे. फळा,आरखेड, घोडा,सोमेश्वर, उमरथडी, सायळा, पुयणी, वन भुजवाडी,आडगाव, तेलाजपुर, कांदलगाव यासह इतर 3 गावांचा पालमपासूनचा संपर्क तुटला आहे. दिवसभर हे पाणी ओसारण्याची शक्यता नसल्याने आज दिवसभर या14 गावातील नागरिकांना शहरात जाता येणार नसून गावातच अडकून बसावे लागणार आहे. तर इकडे बीड जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरणासह रिमझीम पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हावासियांना गेल्या 36 तासांपासून सुर्यदर्शन झालेले नाही. जिल्ह्यातल्या सर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.