Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- महागाईचा भस्मासूर सत्तेतली अवदसा

अग्रलेख- महागाईचा भस्मासूर सत्तेतली अवदसा


गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

पाच राज्यातल्या निवडणुका संपल्या, अपेक्षेनुसार दिल्लीश्वराने पुन्हा अखंड भारताच्या जनतेसमोर कमरेचं सोडून मस्तकाला बांधल्याचे चित्र गेल्या पाच दिवसांच्या कालखंडात उभ्या देशाने पाहितलं, जी इंधनाची दरवाढ पाच महिने झाली नाही, ती दरवाढ गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा सुरू झाली आहे. हे अपेक्षितच होतं. निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि सत्ताकारणाचे गणित जुळवणारे भाजपेयी सातत्याने देशातल्या जनतेला मुर्खात काढण्यात यशस्वी होत आले आहेत. आताही तेच झाले. पाच राज्यातल्या निवडणुका होत होत्या, त्या काळात जणू कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत स्थिर होत्या आणि निवडणुका संपल्या, निकाल लागले की, कच्च्या तेलाच्या किमतींना उफाळी आली. असो, भाजपाला हे चांगलं माहित आहे, शेतात काय पिकतय हे पाहण्यापेक्षा बाजारात काय विकतय याला अधिक महत्व दिलं अन् हिंदूत्वाचं सोनं पांघरुण चिंध्या विकायला बसलं, तरीही आपला ‘धंदा’ होतोच. त्यामुळेच भाजपा आज सर्वत्र यशस्वी म्हणावी लागेल. सत्ताकारणाच्या गणितासाठी देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या गळ्याला फास लावणे हाच जर भाजपाचा विकास असेल आणि देशातील जनतेसाठी दिले गेलेेले अच्छे दिसन असतील तर आज जनता जात्यात आहे आणि भाजप सुपात आहे. सुपातल्याला जात्यात यायला वेळ लागत नसते. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले. चार राज्य भाजपाने आपल्या ताब्यात घेतले. या यशाचा खरा शिलेदार सर्वसामान्य मतदार असेल. त्या खर्‍या शिलेदाराला यशाचं बक्षिस त्याच्या बोकांडीवर महागाईचा भस्मासूर सोडून भाजप देत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते काहीच नसेल.


निवडणुका जिंकणं
हा प्रमुख उद्देश भारतीय जनता पार्टीचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उधळलेल्या अश्‍वाने जगाच्या पाठीवर भारताला बलवान केल्याचे भाजपेयी सातत्याने सांगतात. निवडणुका आल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाती किती निधडी आहे, विचार किती दूरदृष्टी आहे, त्यांच्यात किती हिम्मत आहे हे सांगताना मोदी युगपुरुष असल्याचे दाखले दिले जातात, रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान घेतलेली भूमिका आणि या भूमिकेमुळे रशियाशी आपले संबंध सुधारतील आणि या संबंधातून कमी किमतीत आपल्याला पेट्रोल आणि डिझेल मिळेल, असा भंपक दावाही मध्यंतरी अंधभक्तांकडून करण्यात आला. निवडणुका संपल्यानंतर अपेक्षेनुसार महागाईचा भास्मासूर सर्वदूर उधळत सुटला. गोरगरिबांच्या मानगुटीवर थयाथया नाचत त्याला मरण यातना देत राहिला. तरी भाजपाा अथवा ना खाऊँगा ना खाने दुँगा म्हणणार्‍या मोदींना त्या सर्वसामान्य माणसाची दया आली नाही. गेल्या पाच दिवसांच्या कालखंडामध्ये पेट्रोल ४ रुपयांच्या आसपास तर डिझेल साडेतीन रुपयांच्या आसपास वाढले आहे. येत्या पंधरा दिवसांच्या कालखंडात पेट्रोल २५ रुपयांच्या आसपास आणि डिझेल २३ रुपयांच्या आसपास वाढणार असल्याने यापुढे पेट्रोल १२५ रुपयांपेक्षा जास्त रुपयांनी आणि डिझेल १२३ रुपयांपेक्षा जास्त रुपयाने जेव्हा खरेदी करावे लागणार आहे तेव्हा त्याचा फटका सर्वच क्षेत्रातल्या बाजार पेठांना बसणार आहे. सुईपासून सोन्यापर्यंत आत्तापेक्षा २० ते २५ टक्के महागाई होणार आहे. हे सर्वश्रूत असताना दस्तुरखुद्द पंतप्रधान पेट्रोल दरवाढ करण्याच्या चार दिवस अगोदर इंधन दरवाढ आपल्याला सहन करावी लागणार असल्याचे सांगतात. नितीन गडकरीसारखे कर्तव्यात कठोर असणारे कर्म आणि श्रमात माहिर असणारे मोदी सरकारमधील मंत्री जेव्हा इंधन दरवाढ रोखताच येणार नाही, हे सांगतात तेेव्हा २०१४ पुर्वीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषणे आठवतात, २०१४ नंतर विजयी रथावर आरुढ होऊन ‘पेट्रोल के दाम कम हुए के नही’, ही आत्मविश्वासी घोषणा नव्हे सवाल आणि समोर बसलेल्यांकडून मिळत असलेली दाद पुन्हा पुन्हा आठवते. पेट्रोल, डिझेलच्या कच्च्या तेलाचे
दाम कमी असो
वा जास्त

त्याचा फायदा देशातल्या सर्वसामान्य जनतेला भाजप सरकारने कधीच मिळू दिला नाही. आज कच्च्या तेलाच्या बॅरलचे भाव गगनाला भिडले म्हणून पेट्रोल-डिझेल महाग होत असल्याचे स्पष्टीकरण भाजपेयींकडून दिले जात असले तरी मध्यंतरीच्या काळामध्ये अंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या बॅरलचे दर कमालीचे कमी झाले होते. चहाच्या कपाच्या किमती एवढे त्याचे भाव होते तरीही अखंड भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव केंद्रातल्या मोदी सरकारने कमी केले नव्हते. आज ज्या पटीने कराच्या माध्यमातून केंद्र सरकार पैसा जमा करत आहे आणि तो लोकहिताच्या सत्‌कर्मासाठी वापरला जात आहे, असे जर दावे होत असतील तर लोकांना मृत्यूच्या दरीत ढकलून मोदी सरकारला नेमका विकास काय करायचा? हे समजायला मार्ग उरत नाही. निवडणुका आल्या की, सर्वकाही स्थिर असतं, लोकांच्या मुलभूत गरजांचा विषय चर्चीला जातो, त्यांचं दारिद्रय दिसतं, शिक्षण दिसतं, निवडणुका संपल्या की, पुन्हा जैसे थेच धोरण आखलं जातं. देशभरात भाजपाचा वरचष्मा असताना आणि मध्यंतरी भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिजेलवरचे कर कमी केल्यानंतर काहीसे दर खाली आले मात्र महाराष्ट्र गेल्या कित्येक दिवसांपासून केेंद्र आणि राज्याच्या कर प्रणालीच्या चरखात अक्षरश: चोतरी होतय. केेंद्र करप्रणाली कमी करायला तयार नाही आणि राज्यानेही हात वर केले आहेत त्यामुळे देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल हे महाराष्ट्रात मिळताना दिसून येते. महागाईच्या भस्मासुराचा जन्मदाता जसा भाजप आहे तशी
ठाकरेंची अवदसा
सध्या महाराष्ट्राला आणि तेथील जनतेला वेठीस धरीत आहे. पेट्रोल-डिझेलचे दरवाढ सातत्याने होत असताना मध्यंतरी केंद्र सरकारने एक-दोन रुपयांची करप्रणाली कमी केली असताना राज्यातल्या ठाकरे सरकारने इंधनावरचे कर अद्यापही कमी केल्याचे दिसून येत नाही. दोन-पाच रुपयांनी अथवा दहा रुपयांनी महाराष्ट्र सरकारने कर कमी करून आपलं दायित्व जिथं दाखवायला हवं, तिथं न दाखविता अवलक्षणीय अवदसा दाखवता आमदारांना मोफत घरे देण्याची जेव्हा गोषणा होते तेव्हा महाराष्ट्रातील जनता पायताण काढण्याची भाषा करते. महागाईने जनता होरपळत आहे, शिक्षणाचे वांदे आहेत, बेरोजगारी टोकाला गेली आहे, अशा परिस्थितीमध्ये लोकांचे लोकहित जपण्यापेक्षा स्वहित जपण्याहेतू ठाकरे सरकारचा खरा चेहरा दोन दिवसांपूर्वी समोर आला. एकीकडे इंधनावरचे टॅक्स कमी करायचे नाही, दुसरीकडे मात्र आमदारांना घरं मोफत देण्याची घोषणा करायची, ठाकरेंचं असं वागणं म्हणजे आपला तो बाब्या… असल्यागत म्हणावा लागेल. मोदी सरकार काय आणि ठाकरे सरकार काय जनतेच्या नशिबी ‘हमाम मे सब नंगे’ असेच म्हणावे लागेल. आजची परिस्थिती बिकट आहे, दोन-अडीच वर्षे कोरोनाने उद्ध्वस्त केले. लोकांकडे आज उत्पन्नाच्या बाजु कमी आहेत. कमी उत्पन्न आणि खर्च जास्त वाढल्याने सर्वसामान्यांना जगणं मुश्किल होऊन बसलं आहे, अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकारने जनतेचं जगणं खुशहालीचं करणं महत्वाचं आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!