बीड (रिपोर्टर) केंद्र सरकारने कामगार विरोधी धोरण सुरू केल्याने याचा निषेध करण्यासाठी पोस्ट कार्यालयातील कर्मचार्याने दोन दिवसाचा संप पुकारला आहे. तर महसूल कर्मचारी संघटनेनेही आपल्या विविध मागण्यासाठी आज आंदोलन केले. पंचायत समितीच्या ग्रामसेवकांनी पं.स.कार्यालयासमोर आंदोलन केले. केंद्र सरकारने गॅसचे दरवाढ वाढवल्याने त्याचा निषेध करण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर खिचडी शिजवली. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एका शेतकर्याचे आमरण उपोषण सुरू आहे यासह अन्य आंदोलनाने आजचा दिवस गाजला.

केंद्र सरकार हे कामगार विरोधी धोरण राबवत असल्याने केेंद्राचा निषेध करण्यासाठी पोस्ट कार्यालयाच्या कर्मचार्यांनी आज आणि उद्या संप पुकारला आहे.

आज पोस्टातील कर्मचार्यांनी आपल्या कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सज्जाद शेख, धनंजय शेंडगे, शिवाजी नवले, विष्णू वीर, नितीन आमटे, किरण सावंत, दिपक कुडके, खडकीकर, आदवंत, हेमंत पानखडे, सचिन रसाळसह आदिंची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या निषेधार्थ चुलीवर स्वयंपाक करून महागाईचा निषेध करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, अॅड.करूणा टाकसाळ, रामनाथ खोड, शेख युनूस, चराटकर, हमिद खान पठाण, अशोक कातखडे, नितीन सोनवणे, डॉ.संजय तांदळे, मोहम्मद मोहिजोद्दीन, शेख मुबीन, सय्यद आबेद, अंकुश दहे आदि उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यावर केलेली कारवाई सुडबुध्दीची असून त्यांच्यावरील कारवाई रद्द करावी या मागणीसाठी विवेक कुचेकर यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दलित युथ पँथरने याला पाठींबा दर्शवला आहे. महसूल कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले.

यावेळी संजय हांगे, गाडे, जाधव, खेडे, चौधरी, वैशाली बहिरवाळ यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. धारूर तालुक्यातील कारी येथील सुदाम कुंडलिक मोरे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

सावकारकीला त्रस्त झाल्याने त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली. माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील रोहिदास राठोड हे ही आंदोलन करत आहेत. खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रामहरी सिताराम शेरकर हे ही खाजगी सावकाराच्या विरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत.

धारूर तालुक्यातीलच विठाबाई दत्तात्रय मोरे, दत्तात्रय रामकिसन मोरे यांचेही आंदोलन सुरू आहे. बीड पंचायत समिती अंतर्गत काम करणार्या ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यासाठी तिव्र निदर्शने केली. एकूणच या सर्व आंदोलनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजून गेला होता.