बीड (रिपोर्टर) मित्राच्या लग्नामध्ये बेधुंद नाचलेल्या एका 25 वर्षीय तरूणाचा र्हदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शिंदेवाडी येथे काल सायंकाळच्या दरम्यान घडली. या घटनेने लग्नावर शोककळा आली.
रविवारी सायंकाळी शिंदेवाडी या गावात माने कोळसे शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात नवरा नवरी दोघेही गावातीलच होते. नवरदेव अक्षय माने यांच्या विवाहाला त्याचे माजलगाव येथील काही मित्र आले होते. त्यात रामभाऊ राऊत हा होता. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान लग्नापूर्वी मारोतीला पाया पडण्यासाठी नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी सुरू असलेल्या वाद्याच्या तालावर सर्व तरूण मंडळी बेधुंद नाचत होती. आधीच उन्हाचा पारा अन त्यात ही तरूणाई बराचवेळ नाचत होती. मिरवणूक लग्नस्थळी येताच वैभव राऊत मित्रासह खुर्चीवर बसला व तेथे बसून त्याने तात्काळ घटाघटा पाणी पिले. त्यानंतर त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला र्हदयविकाराचा झटका आला. त्यास माजलगाव येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेने गावावर शोककळा पसरली होती.