नेकनूर(रिपोर्टर): नेकनूरच्या कुटीर रुग्णालयात विविध सुविधा नसल्याने महिलांना जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात कायमस्वरुपी बालरोग तज्ञ देऊन विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आज सकाळपासून भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत कायमस्वरुपी बालरोग तज्ञ मिळत नाही तोपयर्ंत उपोषण सोडणार नसल्याचा पावित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
नेकनूर येथील कुटीर रुग्णालयामध्ये कायमस्वरुपी बालरोग तज्ञ नाही, भुलतज्ञ नाही व सोनोग्राफी मशीन नसल्याने नेकनूरसह परिसरातील माता-भगिनींना सोनोग्राफीसाठी जिल्हा रुग्णालय आणि बीड शहरात यावे लागत आहे. याच ठिकाणी जर सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून दिली तर रुग्णांचा मोठा त्रास कमी होईल शिवाय या ठिकाणी कायमस्वरुपी बालरोग तज्ञ, भुलतज्ञ नसल्याने छोट्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना जिल्हा रुग्णांना यावे लागत आहे. येथील कुटीर रुग्णालय इमारत भलीमोठी आहे मात्र त्यामध्ये सुविधाच नसल्या तर तिचा उपयोग काय? याच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुटीर रुग्णालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये आकाश काळे, शेख अरबाज, भागवत करडे, संकेत ढेरे, बंकट शिंदे, गणेश काळे, कृष्णा शिंदे, पवन काळे, शेख आसिफ, शेख फैजान, शेख शाकेर, शेख परवेज यांच्यासह आदींची उपस्थिती होती.