रेवकी-देवकीत १४ वर्षीय मुलीचा मृत्यू
गेवराई (रिपोर्टर) रेवकी-देवकीपासून काही अंतरावर असलेल्या एका वस्तीवर चौदा वर्षीय मुलीचा खून झाल्याची माहिती पोलीस यंत्रणेला झाल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह कर्मचार्यांनी भेट दिली असता मुलीचा मृत्यू झाला. ही बातमी खरी मात्र वाद अथवा खुनासारखी घटना घडली नसल्याची माहिती पोलिसांनी रिपोर्टरला दिली.
याबाबत अधिक असे की, गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकीपासून काही अंतरावर असलेल्या एका वस्तीवर मुलीचा वादातून खून झाल्याची माहिती माध्यमांसह पोलिसांना मिळाली. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह गेवराई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेवकी-देवकीच्या विठ्ठलनगर येथे सदरचा प्रकार घडलेला होता. मात्र प्रत्यक्षात वाद अथवा खुनासारखी घटना घडली नसल्याचे पोलिसांना दिसून आले. परंतु १४ वर्षीय मुलीचा मृत्यू मात्र झाल्याचे घटनास्थळी गेल्यावर समजले. १४ वर्षीय मयुरी नवनाथ चव्हाण ही मुलगी आई-वडिल बाहेरगावी गेल्यामुळे तिच्या आत्यासोबत राहत होती. रात्री त्या दोघी जेवण करून झोपल्या, पहाटेच्या दरम्यान दोघेही लघुशंकेसाठी उठल्या मात्र सकाळी चौदा वर्षीय मयुरी ही मरण पावलेली दिसून आली. शवविच्छेदनासाठी मयुरीचा मृतदेह गेवराईच्या रुग्णालयात आणण्यात आला आहे. वाद अथवा खून झाला नसल्याचे पोलिसांनी रिपोर्टरला सांगितले. घटनास्थळी डीवायएसपी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक पेरगुलवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, देशमुख, अमर खटाणे यांनी भेट दिली.