Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeबीडक्लिनरच्या गळ्याला चाकू लावून चार गाड्यातील डिझेल काढले

क्लिनरच्या गळ्याला चाकू लावून चार गाड्यातील डिझेल काढले


पाडळसिंगी टोलनाक्यावर थरार; सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यासाठी आयआरबीकडून नकार
बीड (रिपोर्टर) टोलनाक्यावर पोलिस असतात, सीसीटीव्ही कॅमेरे असतात, 24 तास वर्दळ असते म्हणून लाईनवरील गाड्याचालक तेथे उभ्या करून थोडा आराम करतात. मात्र पाडळसिंगीचा टोलनाका रामभरोसे असून पहाटे याठिकाणी स्कॉर्पिओ मधून आलेल्या चार ते पाच जणांनी चार गाड्यामधील 63 हजाराचे डिझेल काढून घेतले. यावेळी एका क्लिनरने त्यांना हटकवले असता त्याच्या गळ्याला चाकू लावून त्याला गढीच्या ब्रिजवर सोडून देण्यात आले. ही थरारक घटना पाडळसिंगी टोलनाक्यावर काल पहाटे घडली. याबाबत आयआरबीकडून सीसीटीव्ही दाखवण्यास चालकांना नकार देण्यात आला. तर तेथे असलेल्या पोलिसांना या घटनेची माहिती होवूनही आमची गाडी जास्त पळत नाही म्हणून आम्ही चोरट्यांचा पाठलाग केला नसल्याचे डिझेल चोरी झालेल्या गाड्याच्या चालकांना सांगण्यात आले.
महामार्गावर लुटमारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे लाईनवरील वाहनचालक हॉटेल, धाब्याचा आश्रय घेतात मात्र तेथेही त्यांच्या गाड्या असुरक्षीत असतात. टोलनाक्यावर 24 तास पोलिस आणि माणसांची रेलचेल असते. त्यामुळे अनेक वाहनधारक टोलनाक्यावर गाड्या उभ्या करून थोडा आराम करतात. पाडळसिंगी टोलनाक्यावर काल पहाटे पाच वाजता गाड्या उभ्या करून काही चालक आराम करत असतानाच विना नंबरच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या पाच जणांनी ट्रक क्र. एम.एच.12 एन.एक्स.9855 मधून 103 लिटर डिझेल काढले, ट्रक क्र.एम.आर.55 6125 मधून अंदाजे 350 लिटर, ट्रक क्र. एम.एच.21 बी.एच.3191 मधून अंदाजे 120 लिटर तर माल वाहतूक ट्रक क्र.डी.एन.09 के.9991 या मधून अंदाजे 120 लिटर असे चार वाहनातून 693 लिटर डिझेल याची किंमत 63 हजार 811 रूपये आहे. हे डिझेल काढून स्कॉर्पिओमध्ये असलेल्या कॅनमध्ये भरत होते. यावेळी एका ट्रकचा क्लिनर जागा झाला. त्यांनी त्यांना हटकवले असता त्याच्या गळ्याला चाकू लावून त्याला स्कॉर्पिओमध्ये बसून ठेवले आणि त्याला गढी येथील ब्रिजखाली चालत्या स्कॉर्पिओमधून ढकलून दिले. याची माहिती तेथील काही चालकांनी महामार्ग पोलिसांना दिली. मात्र आमची गाडी खराब आहे, त्यांचा पाठलाग करता येणार नाही असे म्हणून पोलिसांनी आपली जबाबदारी झटकली. याप्रकरणी रमेश महादेव जाधव या कंटेनर चालकाने गेवराई पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्गावरील पोलिस
फक्त वसुलीसाठीच का?

पाडळसिंगी टोलनाक्यावर पहाटे पाच वाजता चालकाच्या गळ्याला चाकू लावून गाड्यातील डिझेल काढले जाते. एक दोन नव्हे तर तब्बल चार गाड्यातील डिझेल काढून चोरटे स्कॉर्पिओमधून धुम ठोकतात. हा सर्व प्रकार पोलिसांच्या जवळ घडत असतानाही पोलिसांना याची कल्पना लागत नाही. चोरटे डिझेल घेवून पळ काढतात तेव्हा झोपलेल्या पोलिसांना उठवल्यानंतर आमची सुमो स्पीडने पळत नाही त्यामुळे आम्ही त्यांचा पाठलाग करू शकत नाही. असे म्हणून पोलिस आपली जबाबदारी झटकून देतात. त्यामुळे पाडळसिंगी टोलनाक्यावरील पोलिस हे फक्त सकाळी वसुलीसाठीच नेमण्यात आले आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!