Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडतुमचं ठरलं पण कितीने? त्या बापलेकाचं काय ठरलं?, ते पाच पांडव तर...

तुमचं ठरलं पण कितीने? त्या बापलेकाचं काय ठरलं?, ते पाच पांडव तर कौरव कोण?


या पाच जणांना कोणाला पाडण्यासाठी संदिपकडे पाठवलं होतं? दोन्ही क्षीरसागर हे एकच, क्षीरसागरांचा हा ड्रामा; बीडमध्ये जे काम झाले ते देवेंद्र फडणवीसांच्या काळात; आमदाराविरोधात शरद पवारांकडे तक्रार करणार, आ.विनायक मेटेंनी क्षीरसागर कुटूंबियांवर केला हल्लाबोल


बीड (रिपोर्टर) परवा बीडकरांना नौटंकी पहायला मिळाली. त्यात अनेक पात्र होती. ज्या लोकांनी प्रवेश केला त्या लोकांचे मागील तीन वर्षातले स्टेटमेंट पाहिले आणि आजचे स्टेटमेंट पाहिले तर या सर्वांनी मिळून बीडकरांना फसवल्याचे दिसून येते. बीडमध्ये जे काम सुरू आहे त्यामध्ये या दोघांचा म्हणजेच विद्यमान आमदार आणि माजी मंत्र्यांचा काही संबंध नाही. हे सर्व कामे फडणविसांच्या काळात झाले. दोघे भाऊ केव्हा माझ्याकडे आणि पंकजा मुंडेंकडे सातत्याने यायचे, बीडचा विकास व्हावा म्हणून आम्ही ते मंजूर केले, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे म्हणत आ.विनायक मेटेंनी क्षीरसागरांच्या घरावर हल्लाबोल केला. हे पाच पांडव आहेत तर मग कौरव कोण? असा सवाल विचारत क्षीरसागर आतून एकच आहेत, हा सर्व फॅमिली ड्रामा आहे. आमचं ठरलं पण काय ठरलं? कितीने ठरलं? कुठं ठरलं? असे म्हणत त्या बापलेकांनी काय ठरवलं? हा आमचा सवाल आहे. सुरूवातीला या पांडवांना संदिपकडे कुणी पाठवलं? कुणाचा पराभव करायचा होता? आता कोणाची लॉचिंग करण्यासाठी त्यांना इथं आणलं? जयदत्त यांना बीडच्या बाहेर हाकलण्यासाठी तर नव्हे.. असे एक ना अनेक सवाल विचारत शिवसंग्रामचे सर्वासर्वे आ.विनायक मेटेंनी प्रवेशासह बीडच्या तथाकथीत विकासाच्या राजकारणाची पोलखोल केली.
ते शिवसंग्रामच्या मुख्यालयात पत्रकारांसमवेत बोलत होते. यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, खालेक पेंटर, घुमरे, सुहास पाटील यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ.विनायक मेटे म्हणाले की, चालु अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्‍नासह बीडच्या महत्वाच्या प्रश्‍नांना उपस्थित करून न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. बीड नगरपालिकेवर प्रशासक आल्यानंतरतरी काही सुधारणा होईल असे वाटत होते. मात्र बीडमध्ये तीच अस्वच्छता, पाण्याचे नियोजन नाही, भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले आहे, जे निगरगठ्ठ अधिकारी सरकार आणि मंत्र्यांचेही ऐकत नाही त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली. आता नगरपालिकेची चौकशी लावण्यात आली आहे. या चौकशीत या अधिकार्‍यांनी मदत केली नाही तर त्यांना बडतर्फ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे म्हणून आ.मेटेंनी आ.क्षीरसागरांनी महसूलला दिलेल्या पत्राचा पुर्नउच्चार करत तहसिलदार आणि आमदाराच्या संगनमताने बीडमध्ये जे काही जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार होत आहेत. त्याची माहिती मागवून त्यांना काय साध्य करायचे? लोक यामुळे भयभित आहेत. परंतू लोकांनो भिवू नका, तुमच्या पाठीशी शिवसंग्राम आहे, तुमच्या मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी शिवसंग्राम घेईल. आक्षेप अर्ज टाकून जो काही धंदा चालु केला आहे त्या धंद्याची कागदपत्रानूसार तक्रार राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासह एसपी, कमिशनरकडे करणार असल्याचे मेटेंनी यावेळी सांगितले. जिल्हा स्टेडीयमला श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव अधिकृतरित्या करण्यासाठीही क्रिडा मंत्र्यांनी आश्‍वासन दिल्याचे सांगून बीडमध्ये पैलवानांसाठी तालिम होणार असल्याचे म्हटले. बीडच्या अतिरिक्त ऊसाबाबत बोलताना ज्याप्रमाणे तत्कालिन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी अतिरिक्त ऊस उत्पादकांना 50 हजार हैक्टरी मदत दिली होती त्याप्रमाणे राज्य सरकारने बीड जिल्ह्यातल्या अतिरिक्त ऊस उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी 75 हजार रूपयाचा मदत द्यावी असेही मेटेंनी यावेळी म्हटले. मराठा आरक्षणाबाबत समिती स्थापून उपयोग नाही. त्यासाठी डेलिकेटेड आयोग तोही निवृत्त न्यायाधीशांचा नेमावा. असे म्हणून या सरकारने ओबीसीलाही फसवल्याचे म्हटले. बीडची नवीन शिवसेना ही मुस्लिमांना बेगडं प्रेम दाखवत आहे. अनं जुनी शिवसेना त्यांच्या बॅगा उचलत आहे. अशी टिकाही त्यांनी यावेळी करून परवा झालेल्या पक्षप्रवेशावर आ.विनायक मेटेंनी हल्लाबोल करत ही सर्व नौटंकी आहे. मिलीभगत आहे. हे सर्वजण एकत्र असल्याचे म्हटले. पाच जणांनी प्रवेश केल्यानंतर त्यावर आ.संदिप क्षीरसागरांनी काहीतरी बोलायला पाहिजे होते, ते बोलल्याचे दिसत नाही याचाच अर्थ हे सर्व एक असल्याचे सांगून ते पाच पांडव तर यातले कौरव कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आणि हे सर्व आमदारकीसाठी डिलिंग झालेली होती असेही त्यांनी यावेळी म्हटले. शेवटी बीड शहरातले हे तीन घरे म्हणजेच जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, रविंद्र क्षीरसागर यांना वगळून बीडच्या सर्व पक्ष संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सुजान सृजनशिल नागरिकांना आपले आवाहन आहे या, आवाज उठवा, एकत्रीत या आणि क्षीरसागरांविरूध्द लढण्यासाठी तयार रहा, शिवसंग्राम या सर्वांना घेवून आगामी नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!